झिगझॅग पद्धतीच्या गट गण रचनेने नवीन राजकीय गणिते मांडण्यास सुरवात

झिगझॅग पद्धतीच्या गट गण रचनेने नवीन राजकीय गणिते मांडण्यास सुरवात 

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांसाठी गट-गणांचा प्रारूप आराखडा काल (गुरुवारी) प्रसिद्ध झाला. झिगझॅग पद्धतीने झालेल्या रचनेत गट-गणांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना नवीन राजकीय गणिते मांडावी लागणार आहेत. या नवीन राजकीय गणिते मांडण्याची तयारी सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेचे 85 गट व पंचायत समितीच्या 170 गणांचा प्रारूप आराखडा 25 मे रोजी विभागीय महसूल आयुक्तांना जिल्हा प्रशासनातर्फे महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी सादर केला. त्यात पूर्वीच्या गटांच्या 73 या संख्येत नव्याने 12 गटांची, तर 146 गणांच्या संख्येत 24 गणांची वाढ करण्यात आली. त्यामुळे कोणते गाव कोणत्या गणात व गटात राहणार, कोणते गाव अन्य गण- गटात जाणार, याबाबत गावागावांत उत्सुकता शिगेला पोचलेली होती. आता गट व गणांचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्याने इच्छुकांचा जीवात जीव आला आहे. हक्काची गावे दुसऱ्या गटात व गणात गेल्याने मागील पाच वर्षे काम करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी गट-गणांचा प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांच्या काही हरकती व सूचना असल्यास त्यांनी आठ जूनपर्यंत जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्याकडे त्या सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणी होऊन विभागीय आयुक्तांकडून 22 जूनला गट-गण रचना अंतिम करणार आहे. 27 जूनला अंतिम गट-गण रचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या 36 लाख चार हजार आहे. जिल्हा परिषदेच्या गटासाठी 43 हजार 407 लोकसंख्या गृहीत धरली आहे, तर पंचायत समितीसाठी 21 हजार लोकसंख्येवर गणाची निर्मिती करण्यात आली आहे.

नागरदेवळे झेडपीमध्येच

नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळी या तीन ग्रामपंचायतींची मिळून नागरदेवळे नगरपालिका अस्तित्वात आली आहे. तसा अध्यादेश निघाला आहे. त्यामुळे नागरदेवळे वडारवाडी, बाराबाभळी ही तीन गावे जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गण रचनेतून वगळली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्यावर ही गावे तूर्त तरी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात राहणार आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नव्याने झालेल्या प्रारूप गट-गण रचनेत निंबळक गटाची नव्याने निर्मिती कण्यात आली आहे. जेऊर, नागरदेवळे, दरेवाडी, चिचोंडी पाटील हे स्वतंत्र गट करण्यात आले आहेत.

नगर तालुक्यात सात गट अन् 14 गण

मागील निवडणुकीवेळी नगर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट व 12 गण होते. यंदा सात गण व 14 गण झाले आहेत. चिचोंडी पाटील, नागरदेवळे जेऊर, देहरे, वाळकी, दरेवाडी, नवनागापूर हे सात गट असून, देहरे पिंपळगाव माळवी, जेऊर, शेंडी, नागरदेवळे, बुऱ्हाणनगर, केकती, चिचोंडी पाटील, दरेवाडी, अरगणगाव, निंबळक, वाळकी, गुंडेगाव हे 14 गण असतील.

तालुकानिहाय गट (कंसात गण संख्या)

अकोले 6 (12), नगर 7 (14), राहुरी 6 (12), पारनेर 6 (12), श्रीगोंदे 7 (14), कर्जत 5 (10), जामखेड 3 (6), संगमनेर 10 (20), कोपरगाव 6 (12), श्रीरामपूर 5 (10), नेवासे 8 (16), राहाता 6 (12), शेवगाव 5 (10), पाथर्डी 5 (10) असे आहेत.



Post a Comment

0 Comments