विधवा प्रथेविरुद्ध रुंभोडी ग्रामसभेचा अकोल्यात पहिला ठराव

विधवा प्रथेविरुद्ध रुंभोडी ग्रामसभेचा अकोल्यात पहिला ठराव

वेब टीम अकोले : विधवा प्रथा गावात बंद व्हावी हा  हेरवाड (कोल्हापूर)ग्रामपंचायतीने केलेला ठराव आज अकोले तालुक्यातील  रुंभोडी येथील ग्रामसभेने करून अकोले तालुक्यात या मोहिमेची सुरुवात केली.या ठरावासाठी मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित होत्या. हा ऐतिहासिक व समाजप्रबोधनपर ठराव केल्याबद्दल ग्रामसभा संपल्यानंतर कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे हेरंब कुलकर्णी व ललित छल्लारे यांनी गावकऱ्यांसमोर सरपंच रविंद्र मालुंजकर यांचा सत्कार केला व गावाचे अभिनंदन केले.

पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढणे यासारख्या प्रथांचे आजही पालन केले जाते. तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत असल्याने ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा व प्रबोधन करण्याचा ठराव करण्यात आला.

. माजी सरपंच शांताराम मालुंजकर यांनी या ठरावानंतर आता गावात प्रबोधन करण्याची गरज आहे असे सांगितले.सुखबाई सावंत यांनी या ठरावाबद्दल समाधान व्यक्त करून धार्मिक क्षेत्रात  विधवा परित्यक्ता महिलांना जी वागणूक दिली जाते ते प्रसंग सांगितले.

सरपंच रविंद्र मालुंजकर यांनी ठरावाची अंमलबजावणी गावात होऊन विधवा म्हणून गावात कोणत्याही महिलेला अवमानित होऊ न देता सन्मानानेच वागवले जाईल व तालुक्यात हे ठराव करण्यासाठी सरपंच परिषदेमार्फत प्रयत्न करू असे सांगितले.

गावाचे अभिनंदन करताना हेरंब कुलकर्णी यांनी रुंभोडी गावाने तालुक्याचे  आजपर्यंत पुरोगामी नेतृत्व केले आहे,त्यामुळे हा ठराव सर्वप्रथम रुंभोडीने केल्यामुळे सर्व तालुक्यात हा विचार प्रसारित होईल असा विश्वास व्यक्त केला.

पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या ठरावाबद्दल सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांचे आभार मानले.(फोटो - रुंभोडी) 

Post a Comment

0 Comments