लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात

लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात

वेब टीम नगर :  राज्यात राजकीय वाद शिगेला पोहोचला असतानाच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही लोकायुक्त कायद्यासाठी आक्रमक झाले आहेत. ‘अडीच वर्षांपूर्वी लोकायुक्त कायदा करू, असे लेखी आश्वासन देणारे मुख्यमंत्री आता याविषयी बोलतही नाहीत. याचा अर्थ यामागे नक्कीच काही तरी घडलंय’, असा आरोप करत हजारे यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. हजारे यांनी आंदोलनाची नेमकी तारीख अदयाप जाहीर केली नाही. 

एकाचवेळी राज्यभर आंदोलन

राज्यातील ३५ जिल्हे आणि २०० तालुक्यात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या समित्या पुन्हा कार्यरत करण्यात आल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून एकाचवेळी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी दिला.

हजारे म्हणाले, ‘एकतर कायदा करा, अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, असे आता आमचे आंदोलन असेल. राज्यात जिल्हास्तरावर बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यातील ३५ जिल्हे आणि कमीत कमी दोनशे तालुक्यांत काम सुरू झाले. त्यांच्या माध्यमातून एकाचवेळी हे आंदोलन उभे केले जाणार आहे. आता लोकायुक्त कायदा झालाच पाहिजे, होणार नसले तर या सरकारने पायउतार व्हावे, अशी आमची मागणी आहे,’ असेही हजारे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments