स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त थेट संवाद कार्यक्रमाचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त थेट संवाद कार्यक्रमाचे आयोजन

वेब टीम नगर :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३१ मे २०२२ रोजी दूरदृश्य प्रणाली माध्यमातून ‘प्रधानमंत्री’ नावाने सुरू असलेल्या १३ केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी शिमला येथून थेट संवाद साधणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या ५ लाभार्थी शेतकऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट संवाद साधणार आहेत. अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज येथे दिली.

आझादीका अमृतमहोत्सवानिमित्त या संवाद कार्यक्रमाचे देशपातळीवर आयोजन करण्यात आले आहे‌. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमाचे राष्ट्रीय प्रसारण दूरदर्शन वरून थेट केले जाणार आहे. अहमदनगर येथे ही या योजनेच्या लाभार्थ्यांना सदर कार्यक्रमाचे थेट प्रसारण पहाता येणार आहे‌. यासाठी या योजनेचे २६० लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. माऊली सभागृहात सकाळी १०‌ वाजल्यापासून हा संवाद कार्यक्रम सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक इंटरनेट कनेक्टिव्हिटी व इतर सर्व तांत्रिक बाबींची प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे‌.

या थेट संवाद कार्यक्रमात देशातील प्रत्येक जिल्ह्याने लाभार्थ्यांसह सहभागी होण्याच्या सूचना केंद्रीय सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण/शहरी), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, मातृवंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण/शहरी), जल जीवन मिशन, अमृत स्वनिधी योजना, एक राष्ट्र एक रेशनकार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्यमान भारत हेल्थ अॅंड वेलनेस सेंटर, मुद्रा योजना या ‘प्रधानमंत्री’ या नावाने सुरू होणाऱ्या १३ केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक योजनेचे २० असे २६० लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत . त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील पीएम किसान योजनेच्या ५ लाभार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत.असे राज्याच्या कृषी विभागाने अहमदनगर जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.

जिल्हाधिकारी डॉ.भोसले म्हणाले, ऑनलाईन थेट संवादात राज्यस्तरावर राज्यपाल व मुख्यमंत्री यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तर जिल्हास्तरावरील कार्यक्रमासाठी २६० लाभार्थ्यांसोबत केंद्र व राज्याचे मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, स्वातंत्र्यसैनिकांची कुटुंबे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी, नागरी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बँकेचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या दिवशी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा ११ वा हप्ता ही शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे.सामाजिक-आर्थिक-जातनिहाय जनगणनेत मागास ठरलेल्या प्रत्येक वंचित घटकाला या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली पाहिजे. हा मुख्य उद्देश या योजनांचा आहे. यादृष्टीने या योजनेची यशस्विता व उपयोगिता जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. असेही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले.   

Post a Comment

0 Comments