एकमेकांकडे पाहण्यावरुन दोन गटात तुफान हाणामारी
दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल
वेब टीम पुणे : एकमेकांकडे पाहण्याचा वाद तसेच वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवार पेठेत घडली. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
मंगळवार पेठेतील शेलार हाईट्स इमारतीसमोर एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन अक्षय जंगम (वय २३, रा. मंगळवार पेठ) आणि त्याचा मित्र शुभम झाेळ यांना कोयत्याच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. जंगम याने या संदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार हर्षल विठ्ठल शेलार (वय ३२), पवन विठ्ठल शेलार (वय ३२, रा. शेलार हाईट्स, मंगळवार पेठ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेलार याने दहशत माजवून मारहाण केल्याचे जंगम याने फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, हर्षद शेलार याने परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम सुरेश झोळ (वय २३), अक्षय संतोष जंगम (वय २३, दोघे रा. मंगळवार पेठ) यांच्यासह तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी वडील विठ्ठल आणि भाऊ पवन यांना मारहाण केल्याचे हर्षद शेलार याने फिर्यादीत म्हटले आहे. दहशत माजवून मारामारी तसेच दुखापत केल्या प्रकरणी आरोपी शेलार, झोळ, जंगम यांना अटक करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे आणि उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करत आहेत.
0 Comments