आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार

आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार; 

एकाच आदिवासी समाजातील असल्याने मुख्य आरोपीला लग्न करण्याची गळ घातली, नकारानंतर गुन्हा दाखल .

वेब टीम रिवा : मध्य प्रदेशामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रीवा जिल्ह्यात १७ वर्षीय आदिवासी मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपींनी तिचा चेहराही दाताने चावला, इतकी क्रूरता आरोपींनी पीडितेवर केली. ही घटना रविवारी रात्री घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. तीन आरोपींपैकी दोघे जण अल्पवयीन आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या चुलत भावासोबत जत्रेतून घरी परतत असताना तीन आरोपींनी तिचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी तिला निर्जन जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पीडिता पळून जाण्यात यशस्वी झाली आणि तिच्या नातेवाईकाच्या घरी पोहोचली. सोमवारी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या २२ वर्षीय तरुणाला आणि १६ आणि १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीच्या वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान, तिन्ही आरोपी आणि पीडिता एकाच आदिवासी समाजातील आहेत. घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुख्य आरोपीला पीडितेशी लग्न करण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिला. त्याने नकार दिल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

तिन्ही आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत सामूहिक बलात्कार, अपहरण, पीडितेला त्रास देणे आणि धमकावणे, तसेच पॉस्को या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments