आरोपीची गोळ्या घालून केली हत्या , होता बलात्काराचा आरोप

आरोपीची गोळ्या घालून केली हत्या,होता बलात्काराचा आरोप  

वेब टीम गोरखपूर : १६ वर्षीय मुलीचं अपहरण करुन बलात्कार करणाऱ्या २५ वर्षीय आरोपी तरुणाची कोर्टाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनीच परवाना असणाऱ्या आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडत या आरोपीची हत्या केली. ते लष्करातील निवृत्त जवान आहेत. उत्तर प्रदेशातील गोरखपूर कोर्टाबाहेर शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी ५२ वर्षीय पित्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पार्किंगमध्ये आपल्या वकिलाची वाट पाहत थांबलेला असतानाच आरोपीने डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केली. गोळीबार झाल्याचा आवाज ऐकल्यानंतर लोकांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केली. पोलीस काही वेळाने तिथे पोहोचले होते. पोलिसांनी शस्त्र ताब्यात घेतलं आहे.

“या गुन्ह्यात फक्त पित्याचा सहभाग नाही,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटल्याची काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आरोपी कोर्टात आला होता. त्याने आपल्या वकिलाला फोन करुन कोर्टाच्या गेटजवळ बाईक पार्किगमध्ये वाट पाहत असल्याचं सांगितलं होतं. निवृत्त लष्कर जवान यावेळी तिथेच उपस्थित होता. त्याने आरोपीवर गोळ्या झाडून हत्या केली.

हा निवृत्त सीमा सुरक्षा दलातील जवान महाराजगंज गावातील निवासी आहे. ते आपल्या कुटुंबासोबत राहतात. आरोपी दिलशाद हुसैन बिहारचा रहिवासी होता. जवानाच्या घरासमोरच त्याचं पंक्चरचं दुकान होतं. १२ फेब्रुवारी २०२० रोजी दिलशादने जवानाच्या मुलीचं अपहरण केलं. १७ फेब्रुवारी २०२० ला जवानाने आरोपी दिलशादविरोधात बलात्काराची तक्रार केली. यानंतर त्यांच्याविरोधात पॉक्सो अंतर्गंत गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. पण मुलीने दिलेल्या जबाबानंतर बलात्काराचा आरोप हटवण्यात आला होता. नुकताच त्याला जामीन मिळाला होता.

Post a Comment

0 Comments