पैशांसाठी आईनेच आपली तीन मुलं विकली

पैशांसाठी आईनेच आपली तीन मुलं विकली

वेब टीम नवी मुंबई :  पैशांसाठी आईनेच आपल्या तीन मुलांना विकल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. नेरुळ पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी कारवाई करत ३८ वर्षीय आईला अटक केली आहे. पोलिसांना तीनपैकी दोन मुलं सापडली असून तिसऱ्या मुलाचा शोध अजूनही सुरू आहे. या महिलेचा पतीही या धक्कादायक प्रकारात सहभागी असून तो सध्या फरार आहे.

जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी पल्लवी संदेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेरुळ पोलिसांनी नेरुळ रेल्वे स्थानकाजवळच्या फूटपाथवरून शारदा आयुब शेख हिला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी केली. चौकशीदरम्यान कळलं की जुलै २०१९ मध्ये शारदा आणि तिचा पती आयुब यांनी आपल्या दोन मुली आणि एका मुलाला २ लाख ९० हजारांना विकलं.

दोन वर्षीय दोन मुलींपैकी एकीला पोलिसांनी बेलापूरमधून शोधून काढलं आहे. आयुब आणि शारदा यांनी या मुलीला ९० हजार रुपयांना असिफ अली फारोखी नावाच्या एका महिलेला विकलं होतं. या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलं की फारोखीने आपण या बाळाला दत्तक घेतल्याचा दावा केला असून तिने नोंदणीची कागदपत्रंही सादर केली आहे. या दोघांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने आपण त्यांना मदत म्हणून ९० हजार रुपये दिल्याचंही फारोखी या महिलेने सांगितलं आहे. चौकशीदरम्यान आढळून आलं आहे की फारोखी हिने बाळ दत्तक घेताना नियमांचं पालन केलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दोन मुलांना शोधून काढलं असून तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. या मुलांचे वडील सध्या फरार असून तिसऱ्या बाळाला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी एक पथक स्थापन केलं आहे.

Post a Comment

0 Comments