'अल हुसेनी' बोटीचं पाकिस्तानसह अफगाणिस्तान कनेक्शन

'अल हुसेनी' बोटीचं पाकिस्तानसह अफगाणिस्तान कनेक्शन

आरोपींमध्ये बड्या ड्रग्ज व्यापाऱ्याच्या मुलाचा समावेश

वेब टीम अहमदाबाद : गुजरातच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी १९ डिसेंबर रोजी मासेमारी बोट पकडण्यात आली होती. या बोटीमधून तब्बल ४०० कोटी रुपये किमतीचे ७७ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. ‘अल हुसेनी’ नावाच्या या बोटमधून हेरॉईनसह सहा सदस्यांना अटक करण्यात आली होती. या सहा जणांपैकी एक हा पाकिस्तानच्या कराची येथील ड्रग्ज व्यापाऱ्याचा मुलगा होता, अशी माहिती इंडिया टुडेने दिली आहे. भारतीय तटरक्षक दलाने गुजरात दहशतवादविरोधी पथकासह संयुक्तरित्या कारवाई करत ही बोट पकडली होती.

अटक केलेल्या सहा मच्छिमारांचे ओळखपत्र इंडिया टुडेने मिळवले असून त्यापैकी एक जण हा कराचीचा ड्रग व्यावसायिक लॉर्ड हाजी हसनचा मुलगा साजिद होता. तपास यंत्रणेतील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अमली पदार्थांची खेप पंजाबमध्ये पोहोचवली जाणार होती. महत्वाचं म्हणजे येत्या काही महिन्यांत पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. सध्या राजस्थानच्या तुरुंगात जेरबंद असलेल्या पंजाबमधील एका मोठ्या गुंडाचे नाव या प्रकरणात समोर आले आहे.

अफगाणिस्तानातील अफूची शेती करणारे आणि ड्रग माफिया हे तालिबान सरकारला घाबरत आहेत. येत्या काळात तालिबान देशातील अफूच्या व्यापारावर ताबा मिळवतील, या भीतीने अफगाणिस्तानातील अफूची शेती करणारे आणि अंमली पदार्थ माफियाचे धाबे दणाणले असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. परिणामी, गेल्या काही महिन्यांत भारतीय सीमेवर अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ड्रग माफियांना त्यांच्या जवळचा साठा लवकरात लवकर विकायचा आहे.

भारतीय तटरक्षक दलाने, गुजरात दहशतवाद विरोधी पथक (ATS) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत, सुमारे ४००  कोटी रुपये किमतीचे ७७ किलो हेरॉईन घेऊन जाणारी पाकिस्तानी मासेमारी नौका ‘अल हुसेनी’ भारतीय जलक्षेत्रात ६ कर्मचार्‍यांसह पकडली होती.  तर, गेल्या महिन्यात एटीएसने गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका बांधकामाधीन घरातून सुमारे ६०० कोटी रुपयांचे हेरॉईन ड्रग्जची खेप जप्त केली होती. पाकिस्तानी ड्रग्ज विक्रेत्यांनी ही खेप अरबी समुद्रमार्गे त्यांच्या भारतीय समकक्षांना पाठवली होती, असे एटीएसने म्हटले होते.

या वर्षी सप्टेंबरमध्ये, कच्छमधील मुंद्रा बंदरात भारतातील सर्वात मोठ्या हेरॉईनचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केला होता. दोन कंटेनरमधून सुमारे ३ हजार किलो ड्रग जप्त केले होते. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत २१ हजार कोटी रुपये होती.

Post a Comment

0 Comments