“मोदी सरकारचे काही निर्णय चुकले…” : अमित शाह
वेब टीम नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतील, मात्र त्यामागे असणारी सरकारची भावना मात्र स्वच्छ होती असं म्हटलं आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (FICCI) ९४ व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. देशातील १३० कोटी लोकांचा लोकशाहीवरील विश्वास अजून वाढला आहे हेच मोदी सरकारचं सर्वा मोठं यश असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं. देशाच्या विकासात फिक्कीचं योगदान कौतुकास्पद असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
अमित शाह म्हणाले की, “निर्णय चुकीचा आहे असं होऊ शकतं. पण भावना मात्र चुकीची नव्हती”. पुढे बोलताना त्यांनी आमच्यावरील टीकाकारही गेल्या सात वर्षात देशात खूप मोठे बदल पहायला मिळाल्याचं मान्य करतात असं म्हटलं आहे. “सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप लागलेला नाही. सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतरच सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत,” असं यावेळी त्यांनी सांगितल.
करोना संकटादरम्यान सरकारने असे अनेक निर्णय घेतले ज्याचा फायदा पुढील बऱ्याच काळापर्यंत होईल असं अमित शाह म्हणाले. अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून देशाचा आर्थिक दर दुहेरी अंकी झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असा विश्वास अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला.
अमित शाह यांनी यावेळी सांगितलं की, “दीड वर्षाहून अधिक काळ ८० कोटी लोकांना प्रती व्यक्ती /दर महिना मोफर अन्न देण्याचं काम भाजपाच्या मोदी सरकारने केलं आहे. हे खूप मोठं काम असून, जगात कोणीही असं केलेलं नाही. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने आपल्या मार्गावर येत आहे”.
FICCI चं कौतुक करताना अमित शाह म्हणाले की, “१९७२ पासून आजपर्यंत देशाच्या विकासात फिक्कीचं योगदान आहे. आता ते योगदान अनेक टक्क्यांनी वाढवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावं आणि इतर क्षेत्रांचाही विचार करावा ही वेळ आली आहे. फिक्कीसारख्या संघटना पुढे आल्या तरच आत्मनिर्भर भारताचं ध्येय पूर्ण होऊ शकतं”.
0 Comments