ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्रात दाखल, कल्याण-डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण

ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्रात दाखल, कल्याण-डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण

वेब टीम मुंबई : राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला असून  या रूग्णावर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवलं जात होतं. त्याचे नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. आज या चाचणीचा अहवाल आला. 

या रूग्णाचं वय ३३ वर्षे असून तो २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून कल्याण-डोंबिवलीत आला होता.   तो दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत दाखल झाला होता. तो ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला राज्यातील पहिला रूग्ण आहे.

कल्याण डोंबिवलीतील या रूग्णाला २४ नोव्हेंबरला सौम्य ताप आला होता. त्याच्यावर कल्याण-डोंबिवलीतील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. याशिवाय या रूग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला आहे. ते सर्व कोविड निगेटीव्ह निघाले आहेत. दिल्ली ते मुंबई या विमान प्रवासातील रूग्णाच्या २५ सहप्रवाशांची देखील करोना चाचणी केली आहे. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

दक्षिण अफ्रिकेत सर्वप्रथम ओमायक्रॉन व्हेरिएंटची चाहूल लागलेल्या डॉ. अँजेलिक कोट्झी या  म्हणतात, “ओमायक्रॉन हा डेल्टा किंवा बीटा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक म्युटेशन असलेला व्हेरिएंट आहे. त्यामुळे त्याच्या प्रसाराचा वेग अधिक असतो. शिवाय, तुम्हाला जर या व्हेरिएंटची लक्षणं माहिती नसतील, तर त्याकडे अगदी सहज दुर्लक्ष होऊ शकतं इतका तो बेमालूमपणे पसरू शकतो”.

डॉ. कोट्झी यांनी सर्वप्रथम या नव्या व्हेरिएंटची माहिती जगाला दिली होती. त्यांनी तपासणी केलेल्या रुग्णांच्या लक्षणांवरून ओमायक्रॉनची संभाव्य लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. त्या म्हणाल्या, “मी तपासलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने थकवा हे लक्षण दिसून आलं. अंगदुखी देखील जाणवू शकते. काहींना प्रचंड डोकेदुखी आणि थकवा आला होता. पण यापैकी कुणीही वास किंवा चव गेल्याची तक्रार केली नव्हती. तसेच, नाक बंद होणं किंवा खूप जास्त ताप देखील दिसून आला नाही”.

Post a Comment

0 Comments