ऐतिहासिक निर्णय, बलात्कार प्रकरणात फक्त २४ तासांत निर्णय
वेब टीम पाटणा : देशातील सर्वोच्च न्यायालयासह उच्च आणि जिल्हा सत्र न्यायालयात बलात्कार प्रकरणाचे अनेक खटले सुरू आहे. काही खटल्यांचा निर्णय प्रलंबित आहे तर काहींच्या निकाल लागण्यास वर्षा पेक्षा जास्त कालावधी लागत आहे. मात्र बिहार मधील अररिया जिल्हा न्यायालयाने बलात्कार प्रकरणात फक्त एकाच दिवसात निकाल देऊन संपूर्ण देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. साक्ष, वाद-विवाद आणि निर्णय हे सर्व एकाच दिवसात दिल्याचा प्रकार बिहार न्यायालयात पाहायला मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
पोक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी करताना जिल्हा न्यायालयाने त्याच दिवशी साक्ष व युक्तिवाद ऐकून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पॉक्सो कायद्यासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत राय यांनी हा निर्णय दिला आहे.
२३ जुलै रोजी अररियातील नरपतगंज पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपास अधिकारी रिता कुमारी यांनी आरोपीला अटक करून १८ सप्टेंबर रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायाधीश शशिकांत राय यांच्या न्यायालयाने २० सप्टेंबर रोजी दखल घेतली आणि २४ सप्टेंबर रोजी आरोप निश्चित केले.
त्यानंतर पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश शशिकांत राय यांनी त्याच तारखेला एकूण १० साक्षीदारांची साक्ष ऐकून घेतली आणि त्याच दिवशी आरोपी दिलीप यादव याला दोषी ठरवून जन्मठेप आणि ५० हजार दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, न्यायालयाने सरकारला पीडितेला सात लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
0 Comments