“निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीपोटीच कृषी कायदे रद्द …”; प्रियंका गांधी
वेब टीम नवी दिल्ली : शेतकरी जवळपास गेल्या वर्षभरापासून आंदोनल करत विरोध करत असलेले तिन्ही कृषी कायदे अखेर मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कृषी कायदे मागे घेत असल्याचं जाहीर केलं आणि दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जल्लोष सुरु केला. मात्र नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयामागे निवडणुकांमध्ये झालेले पराभव आणि आगामी निवडणुका कारणीभूत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीदेखील नरेंद्र मोदींनी पुढील वर्षी उत्तर प्रदेशासहित पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीपोटी निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.
प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणीव झाली आहे की कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधात जाऊन देश चालवू शकत नाही”.
“पण ते हे का करत आहेत? निवडणुका जवळ येत असून ही परिस्थिती योग्य नाही अशी त्यांना जाणीव झाली असल्याचं देशवासियांनाही कळत असेल. सर्व्हेमध्ये परिस्थिती त्यांच्या बाजूने नाही असं स्पष्ट दिसत आहे. यामुळेच निवडणुकीच्या आधी ते माफी मागत आहेत,” असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं.
प्रियंका गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करत त्यांना ६०० शेतकऱ्यांच्या बलिदानाबद्दल किंवा लखीमपूर खेरीत जिथे शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आलं याची अजिबात चिंता नसल्याचं म्हटलं. “३५० दिवसांच्या लढाईत ६०० शेतकऱ्यांनी बलिदान दिलं, नरेंद्र मोदीजी तुमच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडलं, पण तुम्हाला चिंता नाही,” असं म्हणत प्रियंका गांधींनी संताप व्यक्त केला.
0 Comments