पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा, काही वर्षांत पैसे होतील दुप्पट
सध्या पोस्ट ऑफिस वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वर ७.४% दराने व्याज दिले जात आहे
पोस्ट ऑफिस योजना सर्वात सुरक्षित मानल्या जातात, ज्या लोकांना गुंतवणुकीत धोका पत्करायचा नाही ते पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्या लोकांना चांगले व्याज देण्यासोबत सुरक्षित गुंतवणूकही देतात. या बचत योजनांमध्ये जास्त परतावा दिला जातो. चला तर मग जाणून घेऊयात पोस्ट ऑफिस बचत योजनांबद्दल,ज्यामध्ये निश्चित रकमेच्या गुंतवणुकीच्या काही वर्षांत तुमचे पैसे दुप्पट होतात.
पोस्ट ऑफिस बचत बँक खाते
तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस बचत खात्यात ठेवल्यास, तुम्हाला पैसे दुप्पट होण्यासाठी दीर्घ कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागेल कारण त्यावर फक्त ४ टक्के प्रतिवर्ष व्याज दिले जाते, याचा अर्थ तुमचे पैसे १८ वर्षांत दुप्पट होतील.
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव
आरडी योजना चांगली गुंतवणूक मानली जाते. यामध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) वर ५.८% व्याज दिले जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला या व्याजदराने पैसे गुंतवायचे असतील तर साधारण १२ वर्षांत ते दुप्पट होईल.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS) हा देखील एक चांगला पर्याय मानला जातो. सध्या ६.६% व्याज दिले जात आहे, जर या व्याजदराने पैसे गुंतवले तर सुमारे १० वर्षात तुमचे पैसे दुप्पट होतात.
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना
सध्या पोस्ट ऑफिस वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वर ७.४% दराने व्याज दिले जात आहे. या योजनेत तुमचे पैसे जवळपास ९ वर्षात दुप्पट होतील.
पोस्ट ऑफिस पीपीएफ
पोस्ट ऑफिसच्या १५ वर्षांच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (PPF) सध्या ७.१% व्याज मिळत आहे. म्हणजेच, या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे १० वर्षे लागतात. तथापि, हप्ते न भरल्यास हा कालावधी वाढवला जाऊ शकतो.
पोस्ट ऑफिस मुदत ठेव (TD)
सध्या, १ ते ३ वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर (TD) ५.५% व्याज उपलब्ध आहे. तुम्ही यामध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे सुमारे १३ वर्षांत दुप्पट होतील. त्याचप्रमाणे, ५ वर्षांच्या मुदत ठेवीवर, तुम्हाला ६.७ % व्याज मिळत आहे. या व्याजदराने पैसे गुंतवले तर तुमचे पैसे सुमारे १० वर्षांत दुप्पट होतील.
पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते योजना
पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी खाते योजनेवर सर्वाधिक ७.६ % व्याज दिले जात आहे. मुलींसाठी चालवल्या जात असलेल्या या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे ९ वर्षे लागतात. मात्र, तुम्ही ही योजना एका विशिष्ट वयाखालीच सुरू करू शकता.
पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर सध्या ६.८ टक्के दराने व्याज दिले जात आहे. ही ५ वर्षांची बचत योजना आहे, ज्यामध्ये आयकर देखील वाचवला जाऊ शकतो. या व्याजदराने पैसे गुंतवले तर ते सुमारे १० वर्षांत दुप्पट होईल.
0 Comments