महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शहराची निवड चाचणी स्पर्धा उत्साहात
वेब टीम नगर : ६४ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गादी-माती अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2021 कुस्ती स्पर्धेसाठी शहर तालिम संघाच्या वतीने शहरातील सर्जेपुरा येथील छबु पहिलवान तालिम मध्ये शहरातील मल्लांची कुस्ती निवड चाचणी पार पडली. या स्पर्धेसाठी अनेक मल्लांचा प्रतिसाद मिळाला. या निवड चाचणीत निवड झालेले मल्ल जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत खेळणार आहे.
प्रारंभी आखाड्याचे पूजन व मल्लांची कुस्ती लावून या स्पर्धेचे प्रारंभ करण्यात आले. जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, शहर अध्यक्ष पै. नामदेव लंगोटे, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, कार्याध्यक्ष अजय अजबे, पै. सुरेश आंबेकर, नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कुस्ती स्पर्धा पार पडली. यावेळी पै. संजय शेळके, कुस्ती मल्लविद्याचे जिल्हाध्यक्ष पै. मिलिंद जपे, शहराध्यक्ष पै. बंडू शेळके, अशोक घोडके, पै. बाळासाहेब भापकर आदींसह मल्ल मोठ्या सख्येने उपस्थित होते.
पै. वैभव लांडगे यांनी कुस्ती खेळाला चालना व मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा तालिम संघ कार्यरत आहे. कुस्ती लीग स्पर्धेच्या माध्यमातून कुस्ती मल्लांना एक व्यासपिठ निर्माण करुन देण्यात आले असल्याचे सांगितले. पै. नाना डोंगरे यांनी कोरोनानंतर कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी विविध स्पर्धा पार पडणार असून, मल्लांनी सराव करुन यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
राज्यस्तरीय वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी ५७,६१,६५,७०,७४,७९,८६,९२ व ९७ तर १२५ किलो वजनगट महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धा पार पडली. गादी विभागासाठी महेश शेळके, कौस्तुभ आंबेकर, लक्ष्मण धनगर, तेजस उळागट्टे, शिवम पडोळे, आकाश घोडके, ऋषिकेश लांडे, राहुल ताकवणे, शुभम लोंढे, महाराष्ट्र केसरी गटसाठी युवराज चव्हाण तर माती विभागसाठी निखिल शिंदे, किरण धनगर, महेश सुळ, चैतन्य शेळके, गोवर्धन शिंदे, मयूर जपे हे मल्ल जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी पात्र ठरले आहे. जिल्हा निवड चाचणीत पात्र ठरणारे मल्ल ६४ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गादी-माती अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब लढत कुस्ती स्पर्धेसाठी खेळणार आहे.(फोटो-आर डब्ल्यू एस -४५२७)
0 Comments