नगरटुडे संक्षिप्त

नगरटुडे संक्षिप्त

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दोन टेम्पोची धडक ;१ठार २ जखमी 

वेब टीम पारनेर : नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर शिवारात दोन टेम्पोच्या झालेल्या अपघातामध्ये एक ठार तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी,नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जवळ काल पहाटे ५ च्या दरम्यान टाकळी ढोकेश्वर पासून कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण ३ किलोमीटर अंतरावर दोन टेम्पोची समोरासमोर धडक झाली.

यामध्ये टेम्पो (क्र. एम. एच.२१ बी. एच. ८५३५) वरील क्लीनर सोमीनाथ भाऊसाहेब सादरे (वय २१, रा. गाडे जळगाव, ता. जि. औरंगाबाद) याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला तर चालक दिनेश गणेश गोल्डे (रा. रेवगाव, ता. जि. जालना) याचे अपघातामध्ये दोन्ही पाय तुटले असून तो गंभीर जखमी झाला आहे.

दुसरा टेम्पो (क्र. एम. एच. १६ सी. सी. ८०४७) वरील क्लीनर सोमनाथ केदार व चालक दत्तात्रेय गीताराम वावरे हे जखमी झाले आहेत.

अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार अपघातात एका वाहनाचा चालक केबिनमध्ये अडकला होता. येथील तरुणांनी मदत करून त्यास बाहेर काढले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

सिगारेट ना दिल्याने तलवारीने वार 

वेब टीम नगर : जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस  वाढू लागली आहे. कायद्याचा धाक आता उरलेला नसल्याने दिवसाढवळ्या गुन्हेगारी माजू लागली आहे.

सार्वजनिक ठिकाणी वाढती गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर येऊ लागला आहे. असाच काहीसा प्रकार नगर शहरातील बसस्थानकासमोर घडला आहे.

नगर शहरातील जुन्या बसस्थानकासमोर तलवारी व धारदार शस्त्राने दोन गटांत हाणामार्‍या झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या हाणामारीत तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

अरबाज अख्तर शेख (वय 24 रा. आशा टॉकीज चौक) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सारंग पान टपरीचे मालक गुल्लूभाई व त्याची दोन मुले सद्दाम व अरबाज तसेच आदम व इतर दोन-तीन लोकांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.याबाबत आपण जाब विचारण्यासाठी गेलो असता अरबाज याने त्याच्या हातातील धारदार वस्तूने आपणावर वार केले. या फिर्यादीवरून पोलिसांनी सारंग पान टपरीचे मालक गुल्लूभाई व त्यांच्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सय्यद अरबाज शकील याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कुरखान शकील शेख, सादीक शेख, अरबाज शेख, फैयाज शेख यांना वडिलांनी सिगारेट दिले नाही, म्हणून तलवारीने वार केला. सय्यद यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विरोधी गटाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हाबँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे ह्यांच्यावर जीवघेणा हल्ला 

वेब टीम श्रीगोंदे : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक  दत्तात्रय पानसरे यांच्यावर श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पानसरे यांच्यासह दोघे यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि घारगाव येथे रस्त्याच्या वादातून पानसरे व परदेशी या दोन्ही कुटुंबात वाद सुरू होते. या वादाचे रुपांतर रविवारी ( ता. 26 ) मारामारी झाले. यात परदेशी कुटुंबाने रिवाल्वर, तलवार, कोयता, लोखंडी गज, दगड, मिरचीपूड या हत्यारांचा वापर करून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप दत्तात्रय पानसरे यांनी फिर्यादीत केला आहे.यात त्यांच्यासोबत महेश पानसरे हे जखमी झाले आहेत.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल :- या प्रकरणी पोलिसांनी रमेश परदेशी, शिवाजी परदेशी, नारायण परदेशी, शुभम परदेशी, योगेश परदेशी, नामदेव परदेशी, विठ्ठल परदेशी, भगवान परदेशी, हरी परदेशी, जनाबाई परदेशी, वंदना परदेशी, लता परदेशी, गीता परदेशी,साधना परदेशी, परदेशी परदेशी, श्रेया परदेशी, सर्व राहणार घारगाव ( ता.श्रीगोंदे ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याच मारामारी दत्तात्रय पानसरे व त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना पानसरे,महेश पानसरे, सुनील पानसरे, किसन पानसरे, राधाबाई पानसरे यांनी गजाच्या साहाय्याने आपल्यावर हल्ला करुन जखमी केल्याची फिर्याद शुभम परदेशी यांनीही दाखल केलेली आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अस्मानी संकटाने शेतकरी हतबल 

वेब टीम नेवासे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले  आहे.या अस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिसकावून घेतल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम,जळके बुद्रुक भागात गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात रोज पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. 

या भागातील प्रमुख पीक सोयाबीन व कपाशी आहे. सोयाबीन पीक काढणीस येत असताना सततच्या पावसाने शेंगांमधून अंकुर बाहेर पडू लागले. कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांतील सोयाबीन, उडीद, मूग, कांदा, कापूस , भाजीपाला आदी पिके जोमात आली होती परंतु गेल्या आठ दिवसांत 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर मध्ये रोज दुपारी व रात्रीच्या वेळी पाऊस पडल्याने सर्वत्र दलदल निर्माण झाल्याने त्यातच सुर्यप्रकाश नसल्याने मेहनतीने तयार केलेल्या पिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या नैसर्गिक संकटापुढे शेतकरी मात्र हताश झाला आहे. या खरीप हंगामातील पिकांचे पीकविमा अनेक शेतकर्‍यांनी भरले आहेत.आता विमा कंपनीकडून याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच हतबल झालेल्या शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी शासनाने देखील तातडीने पावले उचलून मदत देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे शेतकर्‍यांमधून बोलले जात आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments