येडियुरप्पा यांच्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कोण?
‘या’ तीन नावांची चर्चा!
वेब टीम बंगळुरू : बी.एस.येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. येडियुरप्पा यांच्या जागेवर आता मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठी कुणाला पसंती देतात? याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागून आहे. कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत समाजाचं महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्रिपदाचं नाव निश्चित केलं जाईल, असं सांगण्यात येत आहे. आरएसएसही लिंगायत समाजाचा मुख्यमंत्री करावा, यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बसवराज बोम्मई, विश्वेश्वरा हेगडे कगेरी आणि केंद्रीय मंत्री कोळसा खणन मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांचं नाव चर्चेत आहे.
बसवराज बोम्मई हे लिंगायत समाजाचे असून सध्या कर्नाटक सरकारमध्ये गृहमंत्री पदावर आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत दुसरं नाव विश्वेश्वरा हेगडे कगेरी यांचं आहे. ते ब्राह्मण समाजाचे असून कर्नाटक विधानसभा अध्यक्ष आहेत. तर तिसरं नाव केंद्रीय कोळसा खणन मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांचं आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण होताच त्यांनी राजीनामा दिला आहे. कर्नाटकमध्ये खांदेपालट होण्याचे संकेत अनेक दिवसांपासून वर्तवण्यात आले होते. अखेर आज येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आहेत.
२०१८ विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ११० जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. मात्र बहुमताचा आकडा पक्ष गाठू शकला नव्हता. त्यासाठी त्यांनी ६ अपक्ष आमदारांना गळ घातली होती. मात्र त्यांच्या जीवावर सरकार फार काळ टिकू शकणार नाही याचा अंदाज आल्याने जेडीएस आणि काँग्रेसकडे मोर्चा वळवला होता. याला ‘ऑपरेशन कमळ’ असं नाव देण्यात आलं होतं. सात आमदारांना राजीनामा द्यायला लावून त्यापैकी ५ जण निवडूनही आले होते. कर्नाटकमध्ये भाजपाने २०१९ मध्ये काँग्रेस-जेडीयूचं सरकार पाडलं. त्यानंतर बीएस येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
0 Comments