जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून 

वेब टीम इंदापूर : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच आपल्या दोन मुलांच्या मदतीने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना इंदापूर तालुक्यातील अगोती नंबर १ येथे घडली आहे. शनिवारी (१० जुलै) रात्री साडेआठ ते रविवारी (११ जुलै) सकाळी साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली.

प्रभाकर विठ्ठल पवार (वय ५२, सध्या रा. पिंपरी-चिंचवड, मूळ गाव अगोती नंबर १, ता. इंदापूर) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रभाकर यांचे मेहुणे राजकुमार वसंतराव जाधव (वय ५५, रा. सराफवाडी, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून ज्ञानदेव विठ्ठल पवार (वय ५५), सुधीर ज्ञानदेव पवार (वय ३१) आणि शरद ज्ञानदेव पवार (वय ३४, सर्व रा. अगोती नंबर १) यांच्यावर खून केल्याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ज्ञानदेव विठ्ठल पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जमिनीच्या वादाच्या कारणावरून ज्ञानदेव पवार याने आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन प्रभाकर यांचा केबलने गळा आवळून खून केला. ही घटना अगोती येथील संजय अवताडे यांच्या केळीच्या शेतात घडली. घटनास्थळी बारामतीचे पोलिस उपविभागीय अधिकारी नारायण शिवगावकर व इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी पाहणी केली. पुढील तपास इंदापूर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments