पक्षात पंतप्रधानांचा निर्णय अंतिम : खा.सुजय विखे

पक्षात पंतप्रधानांचा निर्णय अंतिम : खा.सुजय विखे 

वेब टीम नगर: केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं पंकजा मुंडे वप्रीतम मुंडे  नाराज असून त्यांच्या समर्थकांनी पक्षातील पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं सध्या उलटसुलट चर्चेला उधाण आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे नाराज नाहीत, त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. कोणत्याही नेत्याबद्दल कार्यकर्त्याच्या मनात आत्मीयता असते. त्यामुळे आपल्या नेत्यासाठी त्यांना पक्षाकडून अपेक्षा असणे सहाजिक आहे. मात्र, भाजपमध्ये पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय अंतिम मानला जातो. त्यामध्ये नंतर बदल होत नाही. पक्ष प्रत्येकालाच खूष करू शकत नाही. याचा विचार कार्यकर्त्यांनीही केला पाहिजे,' असे सुजय विखे म्हणाले.

'माझ्याही कार्यकर्त्यांची अपेक्षा होतीच. मला स्वत:ला त्याचे काहीच वाटत नाही. भाजपमध्ये मंत्री आणि खासदार यांना समानच वागणूक मिळते. गेल्या दोन वर्षांत भरपूर कामे करता आली. आता मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांशीही आपले चांगले संबंध आहेत. त्यांचा उपयोग मतदारसंघातील कामांसाठी होणार आहे,’ असेही ते म्हणाले.

प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं मुंडे समर्थक नाराज आहेत. कालपासून सुमारे ८० मुंडे समर्थकांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे तातडीनं दिल्लीला गेल्या असून तिथं वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा झाल्याचं समजतं. नाराज कार्यकर्ते उद्या मुंबईत येत असून पंकजा मुंडे सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत त्या नेमकं काय बोलतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

                         

Post a Comment

0 Comments