पुनःश्च हरी ओम ....
उद्यापासून सर्व बाजारपेठा खुल्या
वेब टीम नगर : नव्याने जाहीर करण्यात आलेल्या निकषानुसार जिल्ह्याचा समावेश थेट पहिल्या स्तरात झाला. त्यामुळे तब्बल एक महीन्यापेक्षा जास्त कालावधी नंतर सोमवारपासून (७ जून) निर्बंध शिथील होऊन सर्व व्यवहार पूर्ववत होत आहेत.तब्बल एका महिन्यानंतर बाजारपेठ सुरू होत असल्याने दुकानदारांनी आपल्या दुकानांची साफ सफाई सुरू केली आहे . त्यामुळे पुनःश्च हरी ओम होत असल्याने व्यापाऱ्यातही उत्साहाचे वातावरण आहे.
राज्य सरकारच्या नव्या निकषांनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निर्बंध उठविल्याचा आदेश जारी केला आहे. जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर ४.३० टक्के आणि ऑक्सिजन बेडवरील रुग्णांचे एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण २४.४८ टक्के आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हयाचा निर्बंधस्तर एकमध्ये समावेश झाला आहे. त्यानुसार सोमवारपासून सर्व व्यवहार खुले होत आहेत. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करणे नागरिकांना बंधनकारक असून त्या अटीवर हे निर्बंध उठविण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
नगर शहरात तर एक महिन्याचा कडक लॉकडाउन पाळण्यात आला. या काळात किराणा, भाजी, फळे विक्रीही बंद ठेवण्यात आली. तेव्हापासून बाधितांचे आकडे झपाट्याने कमी होण्यास सुरवात झाली. आमदार संग्राम जगताप आणि महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी यासाठी घेतलेला पुढाकार उपयुक्त ठरला.
0 Comments