शरद पवार राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची दिल्लीत भेट

शरद पवार राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची दिल्लीत भेट 

वेब टीम नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँगेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची आज दिल्लीत पुन्हा एकदा भेट होतेय. उल्लेखनीय म्हणजे, १० दिवसांत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची ही दुसरी भेट आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजे ११ जून रोजी पवार आणि प्रशांत किशोर यांची मुंबईत भेट झाली होती. शरद पवार यांच्या कार्यालयाकडून ही केवळ शिष्टाचार भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच दुपारच्या या भेटीत दोघांनी एकत्र जेवणही घेतलं होतं. या भेटीविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी या दोघांच्या दुसऱ्या भेटीच्या बातमीनंतर राजकीय चर्चांना आणखीनच बळ मिळालंय. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून या दोघांच्या भेटीकडे पाहिलं जातंय.

केंद्रातील मोदी सरकरच्या धोरणाविरोधात उभ्या राहिलेल्या राष्ट्रीय मंचाच्या बैठकीपूर्वी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. मंगळवारी, दुपारी ४.०० वाजता दिल्लीत शरद पवार यांच्या घरी राष्ट्रीय मंचाची बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. या बैठकीसाठी इतरही विरोधी पक्षांचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्र मंच हा राजकीय मंच नसून भविष्यात या माध्यमातून एखाद्या तिसऱ्या पर्यायाची शक्यता फेटाळता येत नाही. २०१८ साली राष्ट्र मंचाची स्थापना करणारे यशवंत सिन्हा आता तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्थितीवर चर्चेसाठी राष्ट्र मंचाची स्थापना करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. यात विरोधी नेत्यांसोबतच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीही सहभागी होताना दिसतात. केंद्र सरकारच्या मनमानी धोरणांना आळा घालण्याच्या हेतून एकत्र येण्यासाठी हा मंच स्थापन करण्यात आला होता.

बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या विजयात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. राष्ट्र मंचासंबंधी ममता बॅनर्जी यांनीदेखील विरोधी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. सोबतच, आपण या मंचाचं नेतृत्व करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

Post a Comment

0 Comments