'एफडीए'चा अधिकारी सांगून घालायचा औषध विक्रेत्यांना गंडा ; आरोपीला अटक

'एफडीए'चा अधिकारी सांगून घालायचा औषध विक्रेत्यांना गंडा ; आरोपीला अटक

वेब टीम नागपूर : अन्न व औषधी प्रशासनाचा (एफडीए) अधिकारी असल्याचे सांगून औषध विक्रेत्यांना गंडा घालणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला बजाजनगर पोलिसांनी अटक केली. राहुल किरण सराटे (रा. चेम्बूर, मुंबई) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने, मुंबई, ठाणे, पुणे व नागपुरातील आठ औषध विक्रेत्यांना लाखो रुपयांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे.

शशांक अग्रवाल यांचे देवनगर चौकात गणेश मेडिकल स्टोअर्स आहे. २९ मे रोजी एफडीएचा अधिकारी बोलत असल्याचे सांगून, 'तुम्ही मुदतबाह्य बोर्नव्हिटा विकला आहे. तुमच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल', अशी धमकी राहुलने दिली. कारवाई न करण्यासाठी त्याने शशांक यांना ३० हजार रुपये जमा करायला लावले. शशांक यांनी राहुल याने दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले. शशांक यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. कोणीही फोन केला नसल्याचे त्यांना कळाले. फसवणूक झाल्याने शशांक यांनी बजाजनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. राहुलला कुलाबा पोलिसांनी अटक केल्याची माहिती बजाजनगर पोलिसांना मिळाली. बजाजनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक पराग फुलझेले, सहाय्यक उपनिरीक्षक संजयसिंग ठाकूर, शिपाई सतीश ठाकूर, सुभाष गजभिये, नितेश वाकळे आदी मुंबईला गेले. प्रोडक्शन वॉरंटवर राहुल याला ताब्यात घेऊन नागपुरात आणले. त्याची पोलिस कोठडी घेतली.

राहुल हा २०१५ ते २०१८ या कालावधीत दुबई येथे मर्चंट नेव्हीत कार्यरत होता. सुटीवर तो मुंबईला आला. त्याने हातावर टॅटू काढला. त्यामुळे तो पुन्हा दुबईला जाऊ शकला नाही. राहुलला कम्प्युटरचे उत्तम ज्ञान आहे. त्याने अनेकांना गंडा घातल्यामुळे नातेवाईक त्याच्यापासून वेगळे राहातात.

Post a Comment

0 Comments