ऑक्सिजनअभावी तिरुपतीत ११ जणांचा मृत्यू

ऑक्सिजनअभावी तिरुपतीत ११ जणांचा मृत्यू 

वेब टीम चित्तूर : ऑक्सिजनअभावी रुग्णांना जीव गमवावे लागत असल्याच्या दुर्दैवी घटनांची मालिका सुरूच आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागात ऑक्सिजन संपल्यानं रुग्णांचे तडफडून प्राण जात असून, अशीच एक घटना आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये घडली आहे. ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाल्याने ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात कोविड रुग्णांसह इतर व्याधी असलेल्या रुग्णांचाही समावेश आहे. चित्तूरचे जिल्हाधिकारी एम. हरिनारायण यांनी ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, तर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भारती यांनी १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. काळजीची बाब म्हणजे ५ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

तिरुपतीमधील रुईया शासकीय रुग्णालयाचं कोविड रुग्णालय करण्यात आलेलं आहे. इतर व्याधीच्या रुग्णांवरही इथे उपचार केले जात आहे. दरम्यान, सोमवारी रात्री रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. ऑक्सिजन टँकर वेळेत न आल्याने रुग्णांना करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाला. यातच ११ जणांचा मृत्यू झाला.

रुग्णालयात ऑक्सिजनचा टँकर येणार होता. मात्र, तो वेळेत पोहचू शकला नाही. ज्यामुळे रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आणि ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाला. यात ११ रुग्णांना प्राण गमवावा लागला. पाच रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. रुग्णालयाजवळ सध्या एक ऑक्सिजन टँकर असून, एक टँकर लवकरच पोहोचवला जाईल, असं जिल्हाधिकारी एम. हरिनारायण म्हणाले. या घटनेचा रुग्णालयातील व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.(फोटो-तिरुपती)

Post a Comment

0 Comments