'चेटकीण' समजून दोन बहिणींना गावकऱ्यांकडून अघोरी शिक्षा

'चेटकीण' समजून दोन बहिणींना गावकऱ्यांकडून अघोरी शिक्षा

वेब टीम जमुई : बिहारमधल्या जमुई जिल्ह्यातील सुदूर टेलवा नावाच्या गावातून संवेदनशील व्यक्तींना हादरवून टाकणारी घटना समोर आलीय.

अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या गावकऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासत शाळेत शिकणाऱ्या दोन बहिणींना चक्क 'चेटकीण' ठरवलं. इतकंच नाही तर त्यासाठी गावकऱ्यांनी या दोन मुलींना अघोरी शिक्षाही दिली. पीडित मुली एकमेकांच्या चुलत बहिणी असून त्या शाळेत शिक्षण घेत आहेत.

जमुई जिल्ह्यातील सिमुलतला स्टेशन अंतर्गत ही घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, टेलवा गावातील राकेश सावे नावाच्या व्यक्तीच्या पाच महिन्यांच्या मुलाचा मृत्यू २२ मे रोजी झाला होता. या मुलाचा मृत्यू 'चेटकिणी'मुळे झाल्याचा दावा एका तांत्रिकानं केला. या मुलाच्या मृतदेहाचं दफनही करण्यात आलं. हा मृतदेह जिथे दफन केला जाईल तिथे रात्री 'चेटकीण' येईल, त्यामुळे गावकऱ्यांनी परिसरात नजर ठेवण्याचा सल्लाही तांत्रिकानं गावकऱ्यांना दिला होता.

रात्री संबंधित दोन अल्पवयीन मुली नदीच्या रस्त्यानं आपल्या घराकडे परतत असतानाच गावकऱ्यांनी या दोघींना 'चेटकीण' म्हणून अडवलं आणि बंधक बनवून त्यांना गावात आणण्यात आलं. त्यानंतर दफन करण्यात आलेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोन्ही मुलींवर मृत मुलाला जिवंत करण्याचा दबाव गावकरी टाकू लागले.

आपला मुलाच्या मृत्यूशी काहीही संबंधी नाही, आपण शेजारच्याच घासीतरी गावातील रहिवासी असल्याचं मुलींनी गावकऱ्यांना विनवणी करत सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधश्रद्धेची झापडं लावलेल्या गावकऱ्यांकडून या मुलींना बेदम मारहाण करण्यात आली तसंच त्यांचे केसही कापण्यात आले. पावसात दोन्ही मुलींना उभं करण्यात आलं.

ही माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु, गावकऱ्यांच्या पुढे त्यांचंही काही चाललं नाही. त्यानंतर एसएसबी जवान गावात झाल्यानंतर ग्रामस्थांच्या तावडीतून दोन्ही मुलींची सुटका करण्यात यश आलं.

या प्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. पीडित मुलींचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती जमुईचे पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार मंडल यांनी दिलीय.(फोटो महाराष्ट्रटाइम्स -२)

Post a Comment

0 Comments