कोरोना नियंत्रणासाठीच्या उपाय योजनांची जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली पंतप्रधानांना माहिती

कोरोना नियंत्रणासाठीच्या उपाय योजनांची  जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली पंतप्रधानांना माहिती 

वेब टीम नगर : कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. पंतप्रधान मोदी यांनी आज देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी दूर दृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी आदींची माहिती पंतप्रधानांना दिली. त्यावेळी त्यांनीही समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान  मोदी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधला.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी तसेच मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध राज्यातील निवडक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यावेळी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, जिल्हा प्रशासनासह पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच इतर सर्व यंत्रणांच्या सहकार्य आणि समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेले प्रयत्न आणि दुसरी लाट थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे म्हणणे अतिशय मन:पूर्वक ऐकले.

राज्य शासनाने सुरु केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आल्याने कोरोना बाधित रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य झाले. प्रतिबंधात्मक आदेश डावलून विनाकारण सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांची अॅण्टीजेन चाचणी सुरु करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि संसर्गाचे प्रमाण पाहता महानगरपालिका प्रशासन, पोलीस यांच्या मदतीने विविध भागात मोहिम राबवून प्रतिबंधात्मक आदेशाचे भंग करणार्‍यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकार्‍यांसह महिन्यातून किमान दोन वेळा प्रत्येक तालुक्यांचा दौरा केला. यामुळे तालुकास्तरीय यंत्रणेलाही हुरुप आला. त्यांच्याशी केलेल्या संवादातून अधिकार्‍यांचे मनोबल उंचावले. त्याचा अपेक्षित परिणाम दिसू लागल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments