अन्य राज्यांच्या धर्तीवर राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देण्याची मागणी

अन्य राज्यांच्या धर्तीवर राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देण्याची मागणी

बाळासाहेब थोरात यांनी लिहिलं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

वेब टीम  मुंबई: करोना काळात वैद्यकीय सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांसह पोलीस व अन्य काही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देण्यात आला आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या लसीकरणालाही प्राधान्य देण्यात आलं आहे. त्याच धर्तीवर राज्यातील पत्रकारांनाही 'फ्रंटलाइन वर्कर'चा देऊन त्यांचं तातडीनं लसीकरण करा,' अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तशी विनंती करणारं पत्रच लिहिलं आहे. पत्रकार बातमीदारीच्या निमित्ताने सतत घराबाहेर असतो. त्यामुळं त्यांना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यांचे कुटुंबीय देखील धोक्यात आहेत. त्यामुळं या सर्व पत्रकार मंडळींना 'फ्रंटलाईन वर्कर' दर्जा देऊन त्यांचं तातडीनं लसीकरण करण्यात यावं, असं थोरात यांनी पत्रात म्हटलं आहे.

तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश या राज्यांतील सरकारनं त्या-त्या राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा दिला आहे. तिथं पत्रकारांचं लसीकरणही प्राधान्यानं करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनंही निर्णय घ्यावा, असंही थोरात यांनी म्हटलं आहे.

अधिस्वीकृतीधारक पत्रकार वगळता राज्यातील अन्य पत्रकारांचा अत्यावश्यक सेवेतही समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळं पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी आहे. अधिस्वीकृती धारक पत्रकार हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. प्रत्यक्षात फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या कितीतरी अधिक आहे. पत्रकार संघटनांनीही वेळोवेळी सरकारचं याकडं लक्ष वेधलं आहे.

Post a Comment

0 Comments