लसीकरण प्रमाणपत्रावर ‘जय महाराष्ट्र’ छापावे : समाजमाध्यमातून या मागणीने धरला जोर

लसीकरण प्रमाणपत्रावर ‘जय महाराष्ट्र’ छापावे : समाजमाध्यमातून या  मागणीने धरला जोर 

वेब टीम नगर: केंद्र सरकारच्या खर्चातून लसीकरण केल्यावर प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र येते. जर ही लस राज्य सरकारच्या खर्चातून दिली तर त्यावर महाराष्ट्राचा नकाशा आणि जय महाराष्ट्र असे छापावे, अशी मागणी नगरच्या तरुणाईच्या वतीने स्मायलिंग अस्मिता शेतकरी कष्टकरी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यशवंत तोडमल यांनी केली आहे. सोशल मीडियातून या मागणीने जोर धरला आहे. 

देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. कोविन अप द्वारे लसीकरण झालेल्यांना प्रमाणपत्र मिळते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असते. आता पुढील टप्प्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. या लसीकरणाचा भार राज्यांनी उचलावा, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारने ही लस मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे जर ही लस राज्य सरकारच्या खर्चातून देण्यात येणार असेल तर त्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर महाराष्ट्राचा नकाशा आणि ‘जय महाराष्ट्र’ असे छापून मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

यासंबंधी बोलताना स्मायलिंग अस्मिता शेतकरी कष्टकरी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यशवंत तोडमल म्हणाले की, ‘ही लस राज्याच्या खर्चातून म्हणजे राज्यातील जनतेच्या पैशातून होणार आहे. त्यामुळे त्यावर राज्याचा उल्लेख असणे आवश्यक वाटते. व्यक्तीपेक्षा राज्य आणि राज्यातील जनता श्रेष्ठ आहे. त्यामुळे राज्याचा नकाशा असावा, असे आमचे मत आहे. या मागणीला तरुणाईचा पाठिंबा मिळत आहे.’

दरम्यान, लसीकरणासाठी नोंदणी करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनीही याकडे लक्ष वेधले आहे. कोविन ॲप वर नोंदणी करू न शकणाऱ्यांना अगर त्यात अडचणी येत असलेल्यांनाही लस मिळावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनीही राज्यासाठी स्वतंत्र अप्लिकेशन देऊन ते मूळ राष्ट्रीय अप्लिकेशनला जोडण्याची सोय व्हावी, अशी मागणी केलेली आहे. 

Post a Comment

0 Comments