निकालानंतर प. बंगाल मध्ये ऊसळला हिंसाचार

निकालानंतर प. बंगाल मध्ये ऊसळला हिंसाचार 

वेब टीम कोलकाता : प्रचारादरम्यान हिंसाचाराचं गालबोट लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल लागताच हिंसाचाराचा उद्रेक होताना दिसत आहे. निकाला लागल्यापासून राज्यातील विविध ठिकाणी हिंसक घटना घडल्या असून, यात आतापर्यंत ४ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. नंदीग्राममध्येही हिंसक घटना घडली असून, नंदीग्राम भाजपाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेल्या मतदारसंघात हिंसाचाराची घटना घडली आहे. नंदीग्राममधील भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. यावेळी भाजपा कार्यालयासह इतर दुकानांचीही नासधूस करण्यात आली असून, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. जाळपोळ करण्यात आल्याचा प्रकारही घडला असून, पोलीस घटनास्थळी आल्यानंतर आरोप फरार झाले, असा आरोप भाजपाने केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस दणदणीत विजय मिळवला असला, तरी नंदीग्राममधून निवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. निकाल स्पष्ट झाल्यापासून बंगालमध्ये हिंसक घटना घडत असून, दक्षिण २३ परगना, नदीया, वर्धमान, उत्तर २४ परनगा या जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनामध्ये भाजपाच्या २ कार्यकर्त्यासह तृणमूल काँग्रेसच्या १ आणि आयएसएफच्या १ कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ताशिखर गाठले. तब्बल आठ टप्प्यांत मतदान पार पाडलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आदींच्या झंझावाती प्रचाराचे केंद्र ठरलेल्या बंगालच्या निकालाबाबत सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. बंगालमध्ये भाजपा तृणमूल काँग्रेसला कडवी लढत देईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला होता. मात्र, मतमोजणी सुरू होताच हा अंदाज खोटा ठरवत तृणमूल काँग्रेसनं मारलेली मुसंडी अखेरपर्यंत कायम राखली.

Post a Comment

0 Comments