सचिन वाझे यांच्या बडतर्फीसाठी हालचाली

 सचिन वाझे यांच्या बडतर्फीसाठी हालचाली

 वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला  वृत्तास दुजोरा

वेब टीम मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक के ल्यानंतर मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. आता त्यांना बडतर्फ करण्याच्या दृष्टीने आयुक्तालयात हालचाली सुरू झाल्या आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्तास दुजोरा दिला.

अंबानी यांना धमकी, व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएसह राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून(एटीएस) मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने माहिती मागवली होती. या दोन्ही यंत्रणांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून वाझे यांचा सहभाग स्पष्ट करणारे टिपण आयुक्तालयास दिले आहे. या तपशिलांचा सारासार विचार करून वाझे यांना बडतर्फ करण्याच्या हालचाली आयुक्तालयात सुरू असल्याचे समजते आहे. याबाबत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न के ला असता त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.

वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके  ठेवण्याचा कट आखणे, या कटाची अंमलबजावणी करणे, तपास सुरू होताच पुरावे नष्ट करणे आदी आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

राज्य पोलीस दलात बडतर्फीचे प्रमाण कमी आहे. बहुतांश प्रकरणांमधील शिक्षा निलंबन, प्राथमिक आणि विभागीय चौकशीपर्यंत मर्यादित राहते. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाच्या कार्यकाळात देवनार पोलीस ठाण्यात नियुक्त निरीक्षक दत्ता चौधरी यांना बडतर्फ केले हेाते.


Post a Comment

0 Comments