सलून चालकाचा दुर्दैवी मृत्यू

 सलून चालकाचा दुर्दैवी मृत्यू 

वेब टीम औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये एका सलून चालकाने आपले दुकान चोरून चालू ठेवले. उस्मानपुरा पोलिस त्या ठिकाणी गेल्यावर पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरली. परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्ये 'या' घटनेमागील वास्तव समोर आले आहे.  

हा प्रकार १४ एप्रिल रोजी उस्मानपुरा पोलिस ठाण्या अंतर्गत घडला होता. संबंधित सलून चालकाला समजून सांगत असतानाच त्या सलून चालकाला चक्कर आली आणि तो  चालक जागीच कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेत मीडियाकडून आणि लोकांकडून पोलिसांवर मारहाण केल्याचे आरोप झाले होते. परंतु आता या दुकानाच्या समोरच असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात घटनास्थळी घडलेला खरा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांच्या मारहाणीत संबंधित सलून चालकाचा मृत्यू झालेला नाही. तर पोलिस तिथे आल्यानंतर चक्कर येऊन तो सलून चालक खाली कोसळला, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या चित्रीकरणात दिसत आहे. त्यामुळे पोलिस दलाविषयी गैरसमज पसरवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या घटनेबाबत औरंगाबाद पोलिस अधिक तपास करीत आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments