अहमदनगरचे जिल्ह्याचे अंतरंग :
ताहराबादचे संतचरित्रकार संत महिपती महाराज : भाग १
ईश्वरभक्ती व पारमार्थिक जीवनातील तत्वज्ञान, उपदेश ,ओवी , अभंगाद्वारे संतांनी समाजाचे प्रबोधनाचे खूप मोलाचे काम केले आहे. प्राचीन मराठी साहित्यात महिपती महाराज यांचे कार्य खूप मोठे आहे . त्यांचे भक्तिविजय व संत लीलामृत या पोथीचा संत परंपरेचा अभ्यास करताना फार मोठा उपयोग होतो. थोर संत महिपती महाराज यांचा जन्म सन १७१५ मध्ये राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे झाला. मुगल काळामध्ये कुलकर्णी पद्धत यांच्याकडे होती. पंढरपुर वारी दर्शन दरवर्षी कधी त्यांनी चुकवली नाही. संतांचा संग व तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आणि मराठी भाषेची गोडी यामुळे त्यांनी महाराष्ट्राबाहेरील 116 व महाराष्ट्रातील 168 संतांची चरित्रे लिहीली , आणि मराठीचे समृद्ध भांडार वाचकांसाठी खुले केले. त्यांनी म्हटलेच आहे की संतांचे चरित्र एकदाच संपूर्ण कळत नाहीत तेव्हा जे आठवले ते लिहून ठेवले . त्यांनी तुकाराम महाराज यांना गुरू मानले होते. संस्कृत भाषेतील बंदिस्त ईश्वरभक्ती समाजाच्या बोलीभाषेत मराठी गंगेच्या रुपाने आणण्याचं पवित्र कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले. हेच कार्य पुढे तुकाराम, नामदेव ,एकनाथ यांच्यासारखे पुढे महीपति महाराजांनी चालविले दामाजीपंतांच्या मंगळवेढ्याहून महिपती बुवांचे वडील दादोबा कांबळे आपल्या आजोळी ताहराबाद येथे कायमस्वरूपी राहू लागले. राहुरी पासून १८ किमी पश्चिमेकडे ताहाराबाद हे गाव आहे . त्याचे मूळ नाव वरजुवाडी परंतु बादशहाने हे गाव ताहीरखान या सरदारास वतन दिले होते. त्यावरून त्यास ताहाराबाद हे नाव पडले.
दादू पंतांनी पंढरपुर वारी चे तीन चार तपे झाली, परंतु त्यांना मूळ बाळ नव्हते. त्या वर्षी वारीला गेले व चंद्रभागेचे स्नान करून पांडुरंगाच्या ओवरीत बसले व विचार करू लागले की माझ्या नंतर वारीचा खंड पडतो की काय? रात्री झोपले असता त्यांच्या स्वप्नात देव आले व त्यांनी सांगितले की हा पेढा प्रसाद म्हणून तुझ्या पत्नीला खाऊ घाल म्हणजे तुला विठ्ठलभक्त पुत्र होईल या विचाराने पतीवर विश्वास ठेवून गंगुबाईने पेढा सेवन केला . काही दिवसांनी त्या गरोदर राहिल्या१७१५ ला त्यांना पुत्रप्राप्ती झाली. वयाची साठी उलटली होती आणि त्याच वेळेला हा चमत्कार झाला. त्याच्या बारशाच्या वेळेला महिलांची पाळण्याची दोरी उडण्यासाठी चढाओढ चालू होती. त्याच वेळेला एक आजी आल्या . त्या आल्यावर त्यांना दोरी ओढण्याचा खूप आग्रह केला. गंगुबाई ने त्यांना विचारले आपण कोण व कोठून आलात . त्यावर त्या म्हणाल्या की मी पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटावयास चालले . येथे हा उत्सव पाहिला म्हणून आले. त्या म्हणाल्या बाळाला कुंकुमतिलक लावावा व त्याचे नाव महिपती ठेवा त्या आजींनी दोरी ओढली व अचानक गायब झाल्या त्यांच्या सांगण्यावरून बाळाचे नाव महिपती ठेवले.
वयाच्या सातव्या वर्षी त्याची मुंज केली व गावापासून बारा किलोमीटर असलेल्या तांभेरे गावातील मोरेश्वर शास्त्री यांच्याकडे शिक्षण व वेदअद्याना यासाठी पाठवले. इ.स . १७४० मध्ये पारनेर तालुक्यातील जामगाव येथील श्रीधरपंत पोळ यांच्या सरस्वती नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. परंतु त्यांना गावचे कुलकर्णी पद होते श्रीमंती होती. पण त्यांचे संसारात मन लागत नव्हते एके दिवशी पांडुरंगाची पूजा करत असतांना त्यांना निरोप आला की , तुम्हाला दरबारात बोलवले आहे. त्यांनी सांगितले पूजा आटोपल्यावर येतो हा निरोप ताहीरखान यांना समजल्यावर ते फार चिडले व त्यांना कैद करून घेऊन या असे फर्मान देणार तेवढ्यात महिपती दरबारात आले. त्या वेळेला ताहेरखान त्यांना म्हणाले की आमच्या अपेक्षा तुला देव महत्त्वाचा वाटतो की काय महाराजांना देवाला बोललेले सहन झाले नाही. त्यांनी कुलकर्णी पदाचा त्याग केला .
व लेखणी पांडुरंग चरणी अर्पण केली. महिपती तुझा जन्म वेगळ्या कारणा साठी झाला आहे,ही लेखणी घे आणि संत चरित्र लिहिण्याच्या कामाला लाग असे तुकाराम महाराजांनी सांगितले. तुमची इच्छा असे म्हणून महीपति महाराजांनी लेखणीचा स्वीकार केला.
संत तुकाराम महाराज यांना गुरु मानून व पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन महीपति महाराजांनी लिहिण्यास श्री गणेशा केला. त्यांनी सुरुवातीला सात अभंग लिहिले नंतर शांती महात्म्य व पंढरी महात्म्य नावाचा बारा अध्यायांचा ग्रंथ लिहिला त्यानंतर त्यांनी अपराध निवेदन या प्रकारच्या 101 ओव्या लिहिल्या याच प्रमाणे एक ग्रंथ लिहिले होते . त्याप्रमाणे भक्ती विजय नावाचा ५७ अध्याय ९९१६ओव्यांचा सन १७६२ मध्ये ग्रंथ लिहिला नंतर सन१७७४ मध्ये त्यांनी संत लीला अमृत नावाचा ३६ अध्यायांचा१०७९४ ओव्यांचा ग्रंथ लिहिला नंतर ज्ञानेश्वरी वरील निवडक २४३१ ओव्यांचे संकलन केले ५१ अध्यायाचा १०७०० ओव्याचा भक्त लीलामृत हा ग्रंथ त्याचप्रमाणे सन १७६५ मध्ये ३६ अध्यायांचा व ७२०० ओव्यांचा कथा सारामृत हा ग्रंथ लिहून पूर्ण केला त्याप्रमाणे महिपती महाराज लिहीत होते आणि त्यांनी संत विजय नावाचा २६ अध्यायांचा व ४६२८ ओव्यांचा ग्रंथ १७९० मध्ये लिहिला याव्यतिरिक्त त्यांनी आरत्या स्तोत्रे प्रार्थना वृत्त महात्म्य त्यासारखी छोटी-छोटी ग्रंथसंपदा ग्रंथसंपदा निर्माण केल्या या सर्वातून त्यांची खूप मोठी ग्रंथसंपदा तयार होतो.(क्रमशः)
0 Comments