नगरटुडे बुलेटीन १५-०३-२०२१
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वंचितांना आधार देण्याचा महात्मा फुले व सावित्राबाई फुलेंचा वारसा फिनिक्स फाऊंडेशनने चालविला : इंजी. सायली पाटील
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने गरजूंची मोफत नेत्र तपासणी : २७ज्येष्ठ महिलांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प ,६२ गरजू रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
वेब टीम नगर : देशात स्त्रीला सन्मान व प्रतिष्ठा सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षण चळवळीने मिळाली आहे. महिला शिकल्यानेच आज सर्व क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करीत असून, महिला सक्षमीकरणाचे खरे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन महात्मा फुलेंनी पुरोगामी विचारांची मांडणी केली व ते प्रश्न सोडविण्याचे कार्य केले. वंचित घटकातील नागरिकांना आरोग्य सेवा देऊन त्यांचा वारसा फिनिक्स सोशल फाऊंडेशन पुढे चालवत आहे. पाटबंधारे विभागातील कर्मचारी असलेले जालिंदर बोरुडे यांनी उभे केलेले सामाजिक कार्य संपुर्ण विभागासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याची भावना मुळा पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता इंजी. सायली पाटील यांनी केले.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. यावेळी इंजी. पाटील बोलत होत्या. माजी .आ. शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका पुष्पा बोरुडे, सुप्रिया जाधव, सरपंच सविता पानमळकर, युट्यूब स्टार सुमन धामणे, माधुरीताई कृष्णा जाधव, प्रा. सिमा दिलीप गायकवाड, हिराताई वसंतराव बोरुडे, सामाजिक कार्यकर्त्या शारदा होशिंग, जागृती ओबेरॉय, माजी नगरसेवक अॅड. धनंजय जाधव, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, प्रा.दिलीप गायकवाड, राम पानमळकर, रतन तुपविहीरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कार्याने समाजाला एक दिशा दिली. त्यांच्या विचारांच्या प्रेरणेने फिनिक्स फाऊंडेशन वंचित घटकातील रुग्णांची सेवा करीत आहे. अनेक गरजू रुग्णांना आधार देण्याचे कार्य अविरतपणे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मा.आ. शिवाजी कर्डिले यांनी विविध क्षेत्रात महिलांचे प्रमाणिकपणे सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. सावित्रीबाईंनी महिलांना स्त्री शिक्षणाचे दार उघडे करुन दिल्याने महिलांनी घरचा उंबरा ओलांडून अनेक क्षेत्रात आपले नांव उज्वल केले आहे. महिला समाजाच्या जडण-घडणीत महत्त्वाचे योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात 238 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. ओमकार वाघमारे, किरण कवडे यांनी रुग्णांची तपासणी केली. ६२ गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. फिनिक्स फाऊंडेशनच्या आवहानाला प्रतिसाद देत २७ ज्येष्ठ महिलांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. यावेळी गरजूंना मोफत नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पाळन करुन हे शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बोरुडे यांनी केले. आभार गौरव बोरुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर गांगर्डे, बाबासाहेब धीवर, सौरभ बोरुडे, ओम बोरुडे, सागर बनकर, प्रभाकर धाडगे, मोहनीराज कुर्हे, सुदाम वाबळे, अर्जुन कराळे, साई धाडगे आदींनी परिश्रम घेतले.
वीज प्रश्नी शेतकर्यांचा २०मार्च रोजी पांढरीपुलावर रास्ता रोकोचा इशारा
वसुली मोहिम थांबवून शेती पंपासाठी पुर्ण दाबाने अखंडितपणे दिवसातून आठ तास वीज देण्याची मागणी
छावा क्रांतीवीर सेनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन
वेब टीम नगर : विद्युत महावितरणने वीज पुरवठा बंद करून शेतकर्यांची सुरु केलेली वसुली थांबवावी, शेतकर्यांना पुर्ण दाबाने अखंडितपणे दिवसातून आठ तास वीज पुरवठा करावा व शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याच्या मागणीचे निवेदन छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी दिली. वीज अभावी शेतकर्यांची होणारी पिळवणुक न थांबल्यास नगर- औरंगाबाद महामार्गावरील पांढारीपुल येथे शेतकर्यांच्या उपस्थितीत शनिवार दि.२० मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेना तसेच इतर मित्र पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीत शेती पंपाचे वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर राज्य कर्त्यांना या आश्वासनाचा विसर पडला आहे. आज शेतकरी उपाशी असून, मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने पिके देखील चांगल्या प्रमाणात येत आहे. मात्र विद्युत महावितरणने बिल न भरल्याचे कारण पुढे करुन जिल्ह्यातील नगर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव आदी जिल्ह्यातील तालुक्यामध्ये महावितरण कंपनीने शेतीपंपाची वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला आहे. या प्रकरणावरुन सरकारची बेबंद मोघलशाही माजली असल्याचे चित्र आहे. राज्यातील ठराविक शेतकरी समृद्ध आहेत. त्यांचे निकष सर्वांसाठी लावता येणार नाही. अल्पभूधारक शेतकर्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारने एक आठवडा दिवस आणि एक आठवडा रात्रीची वीज देण्याचे नावापुरते जाहीर केले आहे. ही घोषणा शेतकर्यांची थट्टा करणारी आहे. दिवसाची विज नावापुरती असून, ती किमान चार तास सुद्धा मिळत नाही. खरीप रब्बी आणि चारा पिकांना रात्रीचे पाणी देता येते का? हा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात शेतकर्यांची वीज पंप बंद असताना देखील त्यांची बिले आकारण्यात येतात. काही शेतकर्यांना महावितरणने अनेक वर्षापासून बिले देखील दिलेली नाहीत. एकदम बिल पाठवून त्यांच्याकडून वसुलीचा आग्रह धरला जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्व घरी असताना शेतात शेतकरीने राबून सर्वांचे पोट भरले आहे. याचा विचार करण्याची देखील गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
महावितरण कंपनी वीज बिल कायदा २००३ ची अंमलबजावणी करावी, विद्युत महावितरणने वीज पुरवठा बंद करून शेतकर्यांची सुरु केलेली वसुली थांबवावी, शेतकर्यांना पुर्ण दाबाने अखंडितपणे दिवसातून आठ तास वीज पुरवठा करावा व शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाह्यवळण रस्त्यावरील त्या पाच चौकात सिग्नल बसविण्याची मागणी
अन्यथा पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने : २९ मार्चला वाहतूक अनागोंदीचा सत्यबोधी सूर्यनामा करुन शिमगा आंदोलन
वेब टीम नगर : बाह्यवळण रस्त्यावरील पाच ठिकाणी असलेल्या चौकात अपघाताने अनेकांचा जीव जात असताना, सदर चौकात सिग्नल बसविण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे. सदर चौकात सिग्नल न बसविल्यास दि.२९ मार्च रोजी धुलिवंदनाच्या दिवशी संघटनेच्या वतीने वाहतूक अनागोंदीचा सत्यबोधी सूर्यनामा आंदोलन करुन या चौकात वर्चुअल पध्दतीने बोंबा मारुन प्रशासनाच्या विरोधात शिमगा केला जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
ज्यांच्यावर कायदा राबवण्याची जबाबदारी आहे ते हलगर्जीपणा करत असल्याने समाजात अनागोंदी माजत आहे. बाह्यवळण रस्ता होऊन अनेक वर्षे झाली. या रस्त्यावरुन अनेक अवजड वाहने सुसाट वेगाने चालत असतात. चौपदरी चौकात देखील या वाहनांचा वेग कायम असल्याने अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. केडगाव, नेप्ती, एमआयडीसी दूध डेअरी, विळद चौफुला, शेंडी रोड या पाच ठिकाणी चौकात सिग्नलची नितांत गरज आहे. वाहतूक पोलीस देखील योग्य प्रकारे कर्तव्य बजावत नसल्याने अपघात होणारे सदर ठिकाण यमराज चौक बनली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
बाह्यवळण रस्त्यावरील पाच ठिकाणी असलेल्या चौकात त्वरीत सिग्नल बसविण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा सुरु करण्यात आला असून, या मुख्यमंत्री, गृहमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यासह स्थानिक प्रशासनाला निवेदन पाठविण्यात आले आहे. दि.२९ मार्च पुर्वी बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या चौकांमध्ये सिग्नल न बसविल्यास वाहतूक अनागोंदीचा सत्यबोधी सूर्यनामा आंदोलन करुन प्रशासनाला जाग आणण्यासाठी सदर चौकात वर्चुअल पध्दतीने शिमगा केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आंदोलक ऑनलाईन पध्दतीने आंदोलनात सहभाग नोंदविणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ
जिल्ह्यात एक लाख सभासद करुन घेण्याचे उद्दिष्ट
वेब टीम नगर : शहरातील टिळक रोड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. मनसेचे जिल्ह्यात एक लाख सभासद करुन घेण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन या सभासद नोंदणीस प्रारंभ करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांचा पहिला फॉर्म भरुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, उपजिल्हाप्रमुख मनोज राऊत, शहर सचिन नितीन भुतारे, मनसे विद्यार्थी विभागाचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अॅड. अनिता दिघे, परेश पुरोहित, अशोक दातरंगे, रतन गाडळकर, गणेश शिंदे, विनोद काकडे, अंबादास गोटीपामूल, संकेत होशिंग, संकेत व्यवहारे, संतोष साळवे, दिपक दांगट आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सचिन डफळ म्हणाले की, मराठी बांधवांच्या न्याय, हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकारणात सक्रीय आहे. एक सक्षम पक्ष म्हणून मनसेची वाटचाल सुरु आहे. युवक वर्गांमध्ये पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे मोठे आकर्षण असून, त्यांच्या विचाराने पक्षात काम करण्यास मोठ्या संख्येने युवा वर्ग तयार आहे. मनसेची सभासद नोंदणी सुरु करण्यात आली असून, युवकांमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांनी युवा शक्तीने परिवर्तन शक्य आहे. मात्र इतर पक्षाचे राजकारणी त्यांचा वापर आपल्या आपला हेतू साध्य करण्यासाठी करीत आहे. मनसेत युवकांना एक वेगळी दिशा देऊन त्यांना नेतृत्वाची संधी निर्माण करुन देण्यात आली आहे. पक्षाच्या या धोरणामुळे युवक मनसेकडे आकर्षित होत असल्याची भावना व्यक्त करुन, त्यांनी मराठी अस्मितेसाठी युवकांना मनसेचे सभासदत्व फॉर्म भरण्याचे आवाहन केले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्टेशन परिसरात विकासात्मक कामे मार्गी
संभाजी पवार : प्रभाग क्रमांक 15 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
वेब टीम नगर : रेल्वे स्टेशन येथील प्रभाग क्रमांक १५ मध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ दत्ता खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक विजय गव्हाळे, संभाजी पवार, मुस्ताक शेख, शशिकांत लाटे, रमेश खंडागळे, महाळू शिपणकर, विनोद चंगलानी, अर्जुन हारेल, राजेंद्र पवार, संतोष नन्नवरे, कलगुडे मेजर, शरद दळवी, मच्छिंद्र नन्नवरे, नंदकुमार लाटे, संजय जाधव, निमसे मेजर, दत्तात्रेय कचरे आदिंसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
संभाजी पवार म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्टेशन परिसरात विकासात्मक कामे करण्यात आली आहे. विविध विकासकामासाठी आमदार जगताप यांनी भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याने परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. रेल्वे स्टेशन भागांमध्ये कोणत्याही प्रकारच्या नागरी समस्या राहणार नसून, नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. विजय गव्हाळे म्हणाले की, रेल्वे स्टेशन परिसराचा विकास करण्यासाठी अनेक कामे मार्गी लावण्यात आली. या कामासाठी नागरिकांचा सहभाग पाठीशी असणे आवश्यक आहे. काम करण्याची इच्छा शक्ती असल्यास नगरसेवकपद असो किंवा नसो कामे करुन घेता येतात, असे त्यांनी सांगितले. दत्ता खैरे यांनी रेल्वे स्टेशन भागात चांगल्या दर्जाचे रस्ते झाले असून, अंतर्गत रस्त्यांनी देखील परिसर चकाकला असल्याचे सांगितले.
रेल्वे स्टेशन येथील मातोश्री रो-हाऊसिंग सोसायटी ते मुस्ताक शेख घर ते खंडागळे घरापर्यंत काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. सदर रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक विजय गव्हाळे व संभाजी पवार यांचे आभार मानले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 Comments