नगरटुडे बुलेटीन : 07-03-2021

नगरटुडे बुलेटीन : 07-03-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महिलादिनी अहमदनगर महाविद्यालयाच्यावतीने

आयपीएस तेजिस्विनी सातपुते यांचे व्याख्यान

    वेब टीम  नगर : अहमदनगर महाविद्यालयात उन्नत भारत अभियान व गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने ८ मार्च २०२१ जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी व सध्या सोलापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तेजिस्विनी सातपुते यांचे ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास डॉ. स्वाती बार्नबस प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस उपस्थित राहणार आहे.

     समाजातील असंख्य समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महिला सक्षमीकरण आवश्यक आहे तरच समाज व राष्ट्रामध्ये परिवर्तन होऊन विकास होऊ शकतो. या वेबिनारसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.सुनील कवडे व प्रा विलास नाबदे यांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये 10 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन 

वेब टीम नगर : जिल्हयामध्ये शनिवार दि. १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकार व नागरीकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सामंजस्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. श्रीकांत आणेकर यांनी केले आहे.

    राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार आयोजित या राष्ट्रीय लोकदालती मध्ये दाखलपुर्व व प्रलंबीत प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. नगर जिल्हा मुख्य न्यायालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन.आय अॅक्ट ची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटुंबीक वादांची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी अॅक्टची समजोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. पक्षकारांनी आपसी समझोत्याकरिता ठेवून ती सामंजस्याने सोडवण्याबाबतचे अवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा न्या. श्रीकांत आणेकर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रेवती देशपांडे यांनी केले आहे.

      अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरीकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय येथे स्वतः येऊन कळवावे. असे आव्हान आयोजकांनी केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अम्मा भगवान भक्तांसाठी रविवारपासून ऑनलाईन प्रिताजी आणि श्रीकृष्णाजी यांचे  २१ दिवस प्रबोधन

     वेब टीम नगर : अम्मा भगवानच्या भक्तांसाठी प्रमुख उत्तराधिकारी प्रिताजी आणि श्रीकृष्णाजी ‘विश्‍व एकत्व दिवसा’ या उपक्रमात आज रविवार (दि.७) पासून २१ दिवस ऑनलाईन प्रबोधन करणार आहे. ऑनलाईन प्रबोधन करणार आहेत. प्रमुख उत्ताधिकारी यांचे प्रबोधन जगभराच्या भक्तांपर्यंत पोेहचविण्याचा प्रयत्न या उक्रमांतर्गत होणार आहे.

     तरी भाविकांनी या उपक्रमात ठरलेल्या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शनचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

     अम्मा भगवान यांच्या भक्तांसाठी ७ मार्च हा शुभदिवस असून, अम्मा भगवान यांचा जन्मदिन उत्सव ७ तारखेला आध्यत्मिक प्रबोधनाने साजरा होत आहे.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी भक्तांनी प्रा.प्रणव यांच्या मो.९६६५५४७७२७ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे  बाळासाहेब भुजबळ यांनी कळ विले आहे.

     हा वैश्‍विक समारंभ जगाला विभाजनापासून एकत्वाकडे नेणारा आहे. राजकीय अथवा आर्थिक अथवा कुठल्याही परिस्थितीतील समस्या या विभाजनामुळे होतात. त्यावरचे उत्तर शोधण्यासाठी हा एक तासाचा वैश्‍विक कार्यक्रम आयोजित केला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महिलांना आता अधिकार गाजवायचे नाहीत तर राबवायचे 

शारदा होशिंग : प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुप आयोजित महिला दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात 

वेब टीम नगर : आयुष्यात स्वतःची तब्येत, स्वतःचे आरोग्य नीट ठेवणे हे प्रत्येक महिलेचे आद्यकर्तव्य आहे. सर्व क्षेत्रात महिलांनी आज स्वतःला सिद्ध केले आहे. अधिकार मिळाले आहेत पण ते गाजवायचे नाहीत तर राबवायचे आहेत. महिलादिन म्हणजे स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सक्षमता, महिला सक्षमीकरण याबरोबरच कुटुंबव्यवस्था सक्षमीकरणदेखील व्हायला हवे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तथा स्वच्छता दूत शारदा होशिंग यांनी केले.

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुप आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात होशिंग अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी ग्राफॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, सिग्नेचर अ‍ॅनॉलिसिस विषयातील मार्गदर्शिका दीपा सांवला उपस्थित होत्या.

पुढे बोलताना होशिंग म्हणाल्या की, कुटुंब सक्षमीकरणामध्ये स्त्रीची भूमिका आणि तिचा वाटा सिंहाचा आहे. सद्यस्थितीत कुटुंबव्यवस्थेला कुठेतरी तडा जातोय. कुटुंबव्यवस्था सक्षम नाहीये. कुटुंबव्यवस्थेतील तीन महत्त्वाचे घटक सासू, सून व मुलगी या तिघींचेही एकमेकींमध्ये असणारे बंध अधिक दृढ व्हायला हवेत, तरच भारतीय संस्कृती व कुटुंबव्यवस्था सुदृढ होऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुण्या दीपा सांवला यांनी आपण करीत असलेल्या ग्राफॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, सिग्नेचर अ‍ॅनॉलिसिसबद्दल माहिती दिली. हस्ताक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या अडचणी, निराशा, आजारपण, नातेसंबंध, करिअर, व्यवसाय आदींबाबत माहिती कशी ओळखली जाते याबद्दल सांगितले. पेन पकडण्याच्या सवयीवरून मेंदूतील घडामोडी तसेच सही करण्याच्या पद्धतीवरून आपल्यातील कंपने याबद्दल सुमारे १५ मिनिटे महिलांना त्यांनी माहिती दिली. न्यूमरॉलॉजीबद्दल सांवला म्हणाल्या की, मानवाच्या जीवनपद्धतीत आकड्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. भिंतीवरील कॅलेंडर, गाडी क्रमांक, मोबाईल-फोन क्रमांक, टीव्ही चॅनेल क्रमांक याच्याशी आपला दिवसातून अनेकवेळा संबंध येतो. जन्मतारखेवरून आपले प्रश्‍न, अडचणी कशा सोडवाव्यात, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रयासच्या दिवंगत सदस्या स्व.कुमुदिनी जोशी तसेच स्व. विजया बोरा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत व सत्कार अध्यक्षा अलका मुंदडा यांनी भेटवस्तु देऊन केला. यावेळी झालेल्या विविध बौद्धिक गेमचे प्रतिनिधित्व दीप्ती मुंदडा यांनी केले. गेममध्ये विजया मोहता, जयश्री पुरोहित, सविता गांधी, संगीता गांधी, सीमा केदारे यांनी पारितोषिके पटकावली. पारितोषिकांचे प्रायोजकत्व मॅचवेलच्या संचालिका सरस पितळे यांनी स्वीकारले होते. उपाध्यक्षा अनिता काळे यांनी प्रास्ताविक केले. नीता माने यांनी सूत्रसंचालन केले. शोभा पोखरणा यांनी आभार मानले. दत्तकृपा हॉटेलचे संचालक मयूर विधाते यांनी उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. कार्यक्रमास शकुंतला जाधव, ज्योती कानडे, ज्योतिषतज्ज्ञ अभिलाषा, वैशाली ससे, चंद्रकला सुरपुरिया, शशिकला झरेकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पंजाबी समाजाने कोरोनाच्या संकटात लाखो कुटुंबीयांना आधार दिला 

आ.संग्राम जगताप  : पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ ,नगर क्लबच्या मैदानावर फ्लड लाईटमध्ये क्रिकेटचा थरार सुरु , महिलांच्या संघाचाही समावेश

वेब टीम नगर :  पीपीएल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील पंजाबी समाज एकवटला गेला. तर मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटात घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून गरजूंना दोन वेळचे जेवण पुरवून लाखो कुटुंबीयांना पंजाबी समाजाने मोठा आधार दिला. ही भावना व कार्य या खेळाच्या मैदानातून निर्माण झाले होते. जीवनात खेळाडूवृत्ती महत्त्वाची आहे. राजकारण, समाजकारण, व्यवसाय, उद्योग क्षेत्रात खेळाडू वृत्तीने सामोरे जाणारा व्यक्ती आपले कर्तृत्व सिध्द करीत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

पंजाबी समाज व पंजाबी ऑर्गनायझेशन आयोजित पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी प्रदिप पंजाबी, काकाशेठ नय्यर, आगेश धुप्पड, हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, हितेश ओबेरॉय, गौरव नय्यर, अनिश आहुजा, मोहित पंजाबी, सावन छाबरा, हर्ष बत्रा, सागर पंजाबी, डॉ.अभिषेक वाही, सनी आहुजा, कैलाश नवलानी, कमल कोहली, विजय बक्षी, अमरिश सहानी, विशाल बक्षी, राजेश सबलोक आदींसह खेळाडू व समाजबांधव उपस्थित होते.

आमदार जगताप पुढे म्हणाले की, स्पर्धामय धावपळीच्या जीवनात नागरिक मैदानापासून दुरावत असून, निरोगी आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी सर्व पंजाबी भाषिक व व्यावसायिकांनी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. खेळाचा आनंद घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते. मैदानावर येणारा प्रत्येक जण हा खेळाडूच असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी समाजाला जोडण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १४ वर्षापासून साठ वर्षा पर्यंन्त ज्येष्ठ नागरिकांना संधी देण्यात आली आहे. तसेच यावर्षी महिलांचे संघ देखील या स्पर्धेत उतरले आहेत. तीन दिवस चालणार्‍या या क्रिकेट स्पर्धेचे नियम मनोरंजनात्मक असून, सर्वांना या क्रेझी क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत हितेश ओबेरॉय यांनी केले.

पंजाबी प्रीमीयर लीगचे हे तीसरे वर्ष असून, या स्पर्धेत १० संघांचा समावेश आहे. दिवसा तसेच रात्री फ्लड लाईटमध्ये या स्पर्धा होणार आहे. नाणेफेक हरणारा फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. एक षटक ५ चेंडूचे  असून, प्रत्येक खेळाडूला एक षटक टाकणे बंधनकारक आहे. १५ धावा करणारा फलंदाज रिटायर होतो. अशा अनेक मनोरंजनात्म नियमांचा समावेश या क्रेझी क्रिकेटमध्ये आहे. तर यावेळी महिलांच्या संघांना देखील प्रवेश देण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मकतेचे सर्व नियम पाळून क्रिकेटचे सामने होत आहे. विजेत्या संघास व उत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेंद्र ओबेरॉय यांनी केले. आभार सावन छाब्रा यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अमरधाममध्ये अस्थीकलश कुंड बसवून देखील अस्थीरक्षेची विटंबना

अमरधाममधील कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी : नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयुक्तांना निवेदन

वेब टीम नगर :  शहरातील नालेगाव अमरधाममध्ये अस्थीकलश कुंड बसवून देखील अमरधाम मधील कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे रक्षा अमरधाम येथील कचर्‍याच्या ठिकाणी व गटारीच्या परिसरात पसरुन विटंबना होत असल्याचा आरोप करुन नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अंतोन गायकवाड व महिला अध्यक्षा शारदा गायकवाड यांनी आयुक्तांना अमरधाम मधील कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले.

शहरातील अमरधाममध्ये रक्षा कचर्‍याच्या ठिकाणी व गटारीच्या परिसरात पसरुन होणारी विटंबना थांबविण्यासाठी स्थानिक नगरसेवक सुभाष लोंढे, उमेश (गणेश) कवडे, सोनाली चितळे, सुवर्णा गेनाप्पा यांच्याकडून ना हरकत दाखला घेऊन, आयुक्तांच्या परवानगीने अस्थिकलश कुंड बसविण्यात आले. तर अस्थीकलश कुंडातील रक्षा देखील असोसिएशनच्या वतीने पैठण येथील गंगा-गोदावरी येथे विसर्जित करण्याची जबाबदारी स्विकारण्यात आली आहे. तरी देखील अमरधाममध्ये अस्थी रक्षा अस्थीकलश कुंडात न टाकता कचर्‍याच्या ठिकाणी व गटारीच्या परिसरात टाकून दिल्या जात असल्याचा आरोप असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे. अमरधाममधील कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडत असून, सदर कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रीय मुस्लीम सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी प्रा.शेख युनुस

वेब टीम नगर : राष्ट्रीय मुस्लिम सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी अहमदनगर येथील प्रा.शेख युनूस अकबर यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रहमान खान पठान यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. राष्ट्रीय मुस्लिम सेनेचे संरक्षक शाहीद सिद्दीकी व राष्ट्रीय अध्यक्ष अल्ताफ मेमन, महाराष्ट्र प्रभारी रुबीना पटेल यांच्या मान्यते द्वारे आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव मलीक परवेज़ व प्रदेश उपाध्यक्ष साबीर अली यांच्या सल्ल्याने प्रा. शेख युनूस यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रा.शेख युनूस मुप्टा उर्दु शिक्षक संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी काम करीत आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय मुस्लिम सेनेच्या प्रदेश *महासचिवपदी* नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीनंतर प्रा.शेख युनूस संघटनेच्या कार्यात आपण चांगले योगदान देऊन सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी काम करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने संघटनेचे कार्य वाढवू, असे सांगून सर्वांचे आभार मानले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निमगाव वाघा येथे कृषीधन अ‍ॅग्रो दालनाचा शुभारंभ

वेब टीम नगर : निमगाव वाघा (ता. नगर) येथे शेतकर्‍यांसाठी लागणारे बी, बीयाणे, खते आदी शेती औषधांचा समावेश असलेल्या कृषीधन अ‍ॅग्रो या दालनाचा शुभारंभ वीर पत्नी कांताबाई शिवाजी फलके यांच्या हस्ते झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, बापू फलके, अनिल फलके, भाऊसाहेब फलके, बाळासाहेब कांडेकर, किशोर केरुळकर, जावेद शेख, शब्बीर शेख, झेंडे सर, युवराज भुसारे, ह.भ.प. गायकवाड महाराज, इंजी. तांदळे, अन्सार शेख, बापू फलके, गुड्डू शेख, दिलावर शेख, सुभाष जाधव, हिरामन केदार आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे म्हणाले की, गावतच शेतीसाठी आवश्यक असलेले बी, बीयाणे, खते आदी शेती औषधी मिळणार असल्याने ग्रामस्थांची सोय झाली आहे. पुर्वी ग्रामस्थांना शहरात जाऊन बी, बीयाणे व औषधे आणावी लागत होती. शेतकर्‍यांना बी, बीयाणे, खते आदी शेती औषधांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळून ही सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments