तप्त दिव्य - भाग -३
हातास अणुमात्र अग्नी स्पर्श जाहला नाही. .उपरातीक मागती दोही हातास पिशव्या घालून लखोटे केले दोन प्रहर दिवस व चार प्रहर रात्र ठेवून दुसरे दिवशी द्वादशीस शुभवारी प्रात:काळी मजाळीस नेऊन हातीच्या पिशव्या काढून सर्वसभा आदी करून पंडित मशार जिल्हेनी हात पाहिले. गणेश दत्ताजी यास हात दाखविले. तीळतुल्य दणका हातास लागला नाही . फोड फुटकुळी वा कुठलीही इजा झाली नाही . दिव्य करविले ते समयी हाताची चिन्हे लेहून ठेवली होती त्याप्रमाणे हात रुजू पाहिले. पूर्व चिन्हास तिलप्राय अंतर पडले नाही, येणेप्रमाणे 'तप्त दिव्य' मज राघो नारायण पासून घेतले.
श्रीने व श्री गंगेने आम्हास खरे करून आमचे वतन आम्हास दिल्हे . त्यावरून राजश्री पंतप्रधान यांनी आपले पत्रे करून आपल्यास दिली आहेत व देवजी दत्ताजी व गणेश दत्ताजी भांडत होते ते खोटे जाहले त्यांना आपणास येजीत खत लेहून दिल्हे आहे. हे महाराजांनी मनास आणून मजकूरचे देश कुळकर्णी,गावगन्नाची कुळकर्णी व टीपनीशी व गौळीयाचें कुळकर्णी पुरातन वतने आपली आहेत त्याप्रमाणे पत्रे करून देऊन वतन वंशपरंपरेने चालविली पाहिजे म्हणून विनंती करून राज्यश्री बाळाजी पंडित प्रधान यांची राजश्री कान्होजी आंग्रे सरखेल होते त्यांनी महजर करून दिल्हा आहे. तो कल्याणी मोगलाई अंमलदार होते त्यांचा महजर व येजीखत आणून दाखविले. याप्रमाणे पहिले पिढीपासून चाललेले वाद अखेर आठवे पिढीला संपला.
ज्या ठिकाणी तप्त दिव्य घडले ते ठिकाण कुम्भारि या गावी नारायण आव्हाड गेले असता पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे मंदिर आजही आहे. या मंदिराची व्यवस्था पाहणारे राजेश्वर नंदगिरी महाराज यांनी सांगितले की मंदिर फार जीर्ण झाले होते. दगड ढिले ते व्हायला लागले होते . ते गावकरी लोकांनी वर्गणी करून मंदिराचे दर्जा भरून रंग देऊन नूतनीकरण केले. मंदिर हे गोदावरी नदीच्या तीराजवळ उंच टेकडीवर आहे. ते गणितातील अधिक आकाराचे आहे मागील गाभाऱ्यामध्ये महादेवाची पिंड आहे. या पिंडीवर तांब्याच्या धातूचे आवरण बसविले आहे.
पूर्वेकडील गाभाऱ्यामध्ये राम सीता लक्ष्मण यांच्या पाच फूट उंचीच्या मूर्ती बसलेल्या आहेत मुख्य दरवाजा नदीच्या पात्राच्या बाजूने आहे. राजेश्वर नंदगिरी महाराज यांनी आम्ही येथे गोशाळा चालवीत आहोत पंधरा-वीस गाई आहेत असे सांगितले. ग्रामस्थ गोरख घुले व दत्तात्रय सांगळे सांगळे आणि श्री गाडेकर यांनी सांगितले, की महाराज आल्यापासून मंदिराची फार सुधारणा झाली व आता दिनांक १८-४-२०२१ ते २५-४-२०२१ याकाळात येथे सप्ताहाचा कार्यक्रम होणार आहेत त्याचे नियोजन चालू आहे.
श्री . राघो नारायण यांनी या ठिकाणी 'तप्त दिव्य' केले तेव्हापासून या देवस्थानास राघेश्वर मंदिर देवस्थान असे नाव पडले असावे कारण पत्रामध्ये शुक्लेश्वर मंदिर असा उल्लेख आहे, आज त्या मंदिरास राघेश्वर मंदिर देवस्थान असे म्हणतात.(समाप्त)
0 Comments