नगरटुडे बुलेटीन ०५-०३-२०२१

नगरटुडे बुलेटीन ०५-०३-२०२१

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अन्यायकारक आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी महिलांनी रत्यावर उतरावे 

 प्रदेशाध्यक्षा उमा खापरे : भाजपा महिला आघाडीची संघटनात्मक बैठक 

वेब टीम नगर :  राज्यातील आघाडी सरकार हे महिलांना संरक्षण देण्यापेक्षा अत्याचारच जास्त करत आहेत. कुंपणच शेत खात आहे, असा कारभार राज्य सरकार करत आहे. मंत्र्यानेच स्त्रीवर अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त करावे ही अतिशय निंदनीय घटना आहे. संजय राठोड यांच्या विरोधात राज्यभर  भाजपा महिला आघाडीच्या २० हजार महिला रस्त्यावर उतरत राज्यात एकाच वेळी १०० ठिकाणी आंदोलने केल्याने संजय राठोड यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. नगरमध्येही महिलांचे चांगले आंदोलन झाले. संजय राठोड यांचा राजीनामा हे भाजापा महिला आघाडीचे मोठे यश आहे. सरकारचा कोणावरच वचक राहिलेला नाहीये. जळगावच्या पोलिसांनी वसतिगृहातील मुलींबरोबर केलेली घटना संतापजनक आहे. त्यामुळे आता महिलांनी घरात न बसता राज्यातील या अन्यायकारक आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी रत्यावर उतरले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपा महिला आघडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केले.

          नगर शहर व दक्षिण जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या संघटनात्मक बैठकीचे आयोजन भाजपा महिला आघडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या अध्यक्षतेखाली नगरमध्ये झाले. भारतमाता पूजनाने बैठकीस सुरवात झाली. यावेळी प्रदेश संघटन सरचिटणीस दिपाली मोकाशी, सरचिटणीस सुरेखा विद्दे, प्रदेश कोषाध्यक्षा शैला मोकळ, प्रसिद्धी प्रमुख मनीषा जैन, कोमल काळभोर, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा अंजली वल्लाकटी, दक्षिण जिल्हाध्यक्षा आश्विनी थोरात, गीता गिल्डा, शहरजिल्हध्यक्ष महेंद्र गंधे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. या बैठकीत भाजपच्या शहर व दक्षिण जिल्हा कार्यकारणीच्या नूतन पादाधीकारींना उमा खापरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्षा, नगरसेविका, सरपंच, महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

          प्रास्ताविकात शहराध्यक्षा अंजली वल्लाकटी म्हणाल्या, महिलाही आता राजकारणात सक्रीय होत आहेत . प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यात महिला काम करत आहेत. नगर शहर व जिल्ह्याच्या पहिल्याच बैठकीला प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती लाभली हे आमचे भाग्य आहे. नगरमध्ये महिला आघाडी खूप चांगले काम करून दाखवेल अशी ग्वाही मी देते. यासाठी जास्तीतजास्त महिलांना भाजपशी जोडणार आहे.

          यावेळी संघटन सरचिटणीस दिपाली मोकाशी यांनी आत्मनिर्भर भारत या योजनेची माहिती दिली. दिपाली मोकळ यांनी बूथ रचना बद्दल माहिती देवून शहर व जिल्ह्याचा आढावा घेतला. बैठकीचे सूत्रसंचलन संघटन सरचिटणीस प्रिया जानवे यांनी केले. शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे व सरचिटणीस अॅड. विवेक नाईक यांनी शहराच्या वतीने उमा खापरे यांचा सत्कार केला. यावेळी अर्चना चौधरी, उषा जाधव, सविता तागडे आदींसह मोठ्या संख्येने शहर व तालुक्यांतील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्वसामान्य जनता व कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद

माजी आ.शिवाजीराव कर्डिले : नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने सत्कार

    वेब टीम  नगर : गेली 25 वर्षे आमदारकी, काही वर्षे मंत्रीपद, जिल्हा बँकेत संचालक हे सर्व मला माझ्या सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच मिळाले आजही ती जनता व कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद आहे, असे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केेले.

     जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी ग्रा.पं.सदस्य विजय बोंदर्डे, सदस्य आशिष बोंदर्डे, मयुर पाखरे, बुर्‍हाणनगर ग्रा.पं.सदस्य राजेंद्र पाखरे, अभिषेक पाखरे, सरपंच राम पानमळकर,  शेखर खेडकर, आयुब पठाण आदि उपस्थित होते.

कर्डिले पुढे म्हणाले, सर्वसामान्य जनतेची सेवा, मतदारसंघात विकासाची कामे, कार्यकर्त्यांना योग्यवेळी दिलेला मान-सन्मान यामुळे माझी नाळ जुळलेली आहे. मंत्री झालो तेव्हा एवढे सत्कार झाले नाही पण बँकेच्या निवडणुकीत निवडून आलो हे शेतकरी, कार्यकर्ते, मतदारांना खूपच भावले. त्यांच्या भावनांचा आदर मी करतो, असे ते म्हणाले.

     यावेळी विजय बोंदर्डे  म्हणाले की, नागरदेवळे विकासासाठी कर्डिले  यांचेच मोठे योगदान आहे. पाणी, रस्ते, वीज प्रश्‍नांस त्यांनी प्राधान्य दिले.विकासासाठी सरपंच राम पानमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व  कायम त्यांच्या मागे राहू, असे सांगितले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माणुसकी जिवंत ठेवत १० दिवसांत अडीच लाखांची मदत

    वेब टीम नगर : श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा पिंपळगांव रोठा येथील शिंदे कुटूंबावर काळाचा भीषण घाला पडला. कैलास विष्णू शिंदे (वय ४२) यांचे १०दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. कारण  चार महिन्यांपूर्वीच त्यांचा मधला मुलगा रावसाहेब (वय ४८)  यांचे कोरोनाने निधन झाले. तर मोठा मुलगा शिवाजी (वय ५५) यांचे२७ दिवसांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले.  श्री.विष्णू तुळशीराम शिंदे यांच्या कुटूंबावरच  नाहीतर संपूर्ण कोरठण पंचक्रोशितील ग्रामस्थांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

     शिंदे कुटूंबातील मोठा मुलगा शिवाजी, दुसरा रावसाहेब, तिसरा कैलास या तिन्ही मुलांचे पाच महिन्यात थोड्या अंतराने दु:खद निधन झाले. ही अतिशय दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली. ही तीनही मुले अतिशय मनमिळाऊ, प्रेमळ होती. शिवाजी यांचे सामाजिक कार्यात योगदान होते. कुटूंबात सामाजिक बांधिलकी खूप होती. हे तीनही कमावते भाऊ कमी वयात निघून गेले. अजून शिवाजी व रावसाहेब यांच्या मुलांची लग्न बाकी आहेत तर कैलासच्या मुलांचे शिक्षण बाकी आहे. या लहान लेकरांचे खूप लवकर पितृछत्र हरले आता येथून पुढील शिक्षण व मुलींचे लग्नकार्य यासर्व जबाबदार्‍या वृद्ध आजी-आजोबा व त्या तिनही मातांवर पडल्या आहेत. हे खूप मोठे दु:ख आहे. त्याला सामोरे जावेच लागेल ते सर्वजण जगतीलही पण त्यांना आधार व उभारी देणे ही काळाजी गरज आहे आणि तो प्रयत्न श्री कोरठण ग्रामस्थ, मुंबईकर मित्र व नातेवाईक परिवार करताना दिसत आहे.

     अंत्यविधीच्यावेळी श्रीक्षेत्र कोरठण गडाचे अध्यक्ष पांडूरंग गायकवाड यांनी कोरठण गडाचे शिवभक्त जालिंदर खोसे यांना व ग्रामस्थांना या परिवाराच्या मदतीसाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्व समाजाला आवाहन करण्यात आले, त्यानंतर मदतीचा ओघ सुरु झाला. त्यात मोलाचे योगदान मुंबईकर मंडळी, नातेवाईक, मित्र परिवार, स्वत: शिंदे भावकीचाही सिंहाचा वाटा राहिला.

      मुलाबाळांच्या शिक्षणासाठी व पुढील कार्यासाठी माणुसकी धावून आली अन् दशक्रिया विधीपर्यंत १० दिवसांत जवळपास २ लाख ५५ हजार रुपयांचा निधी गोळा केला. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ढोकेश्‍वर विद्यालय शिक्षक सेवावृंद सुरेश घुले, दिलीप घुले, मंगेश घुले या परिवाराने घेतली.

     निधी संकलन करण्यासाठी एलआयसी विमा प्रतिनिधी संतोष जाधव, जालिंदर खोसे, भगवान भांबरे, सुदाम कावरे, गोरख जगताप, राहुल घुले, अनिल मेजर घुले यांचे सहकार्य लाभले. आवाहनांना नंतर अनेकांनी स्वत: मदत करुन माणुसकीय जिवंत आहे, याचा उदाहरण यातून प्रत्यक्षात दिसून आले. कोरठण खंडोबा देवस्थान, मुंबईकर मित्र परिवार व ग्रामस्थ, नातेवाईकांचे सर्वांचे ग्रामस्थांनी आभार मानले. आणखी मदतसाठी संतोष जाधव इको बँक, अहमदनगर खाते नं.०९६२०१००७५९६१८(आयएफसी कोड यूसीबीए ००००९६२ ) किंवा फोन पे/ गुगल पे मो.९४०३९८८४६३ येथे जमा करावे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सुरक्षिततेच्या साधनांचा वापर केल्यास अपघात टळतील

 अरविंद पारगांवकर : श्‍नाइडरइलेक्ट्रिक इंडिया प्रा.लि.मध्ये सुरक्षा सप्ताहास प्रारंभ              

   वेब टीम नगर : आजच्या दिवशी मी सत्य निष्ठापूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी स्वत:ला सुरक्षा स्वास्थ्य व पर्यावरण उत्तम करण्याचा कार्यात समर्पित करेल. नियम, उपनियम, कार्यपद्धती पाळेल व अपघात टाळण्यासाठी माझ्या विचारांचा व कार्यपद्धतीचा विकास करेल. कारण अपघात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला दुर्बल बनवितात व हेच अपघात शारीरिक हानी किंवा मृत्यू, किंवा शरीरस्वास्थ्य किंवा संपतीचा नाश, हनिकारक पर्यावरण व सामाजिक त्रास याला कारणीभुत ठरतात, यामुळे मी स्वत: माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, समाजाच्यासाठी, राष्ट्रासाठी, कारखान्यासाठी व माझ्या सर्व बांधवांसाठी अपघात टाळण्याच्या दृष्टीकोनातून यथाशक्ती प्रयत्न करेल. आज ५०  वा राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचा औद्योगिक वसाहतीतील श्‍नाइडर इलेक्ट्रीक इंडिया प्रा.लि. येथे प्रारंभ झाला. कंपनीचे जनरल मॅनेजर अरविंद पारगांवकर यांच्या हस्ते सुरक्षिततेचा झेंडा फडकावून या सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वरील सुरक्षितता पाळण्याविषयक गंभीरतापूर्वक शपथ घेतली. याप्रसंगी कंपनीचे जनरल मॅनेजर (गुणवत्ता) संदिप महाजन, सुरक्षा विभागाचे शैलेंद्र भालेकर, योगेश ओझा, चंद्रकांत भंडारी व्यासपीठावर उपस्थित होते.

     यंदाच्या वर्षीच सुरक्षिततेचे घोषवाक्य ‘अपघातातून शिका व सुरक्षितता वाढीस लावून आपले आयुष्य सुरक्षित करा’ ही आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शैलेंद्र भालेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. ४ ते ११ मार्च पर्यंत सुरक्षा सप्ताहात होणार्‍या सुरक्षिततेविषयीची सविस्तर माहिती दिली.

     अरविंद पारगांवकर म्हणाले, सुरक्षितता मग ती कोणत्याही बाबीची असो ही सर्वांनी सर्वत्र अंगिकरणे अतिशय गरजेचे आहे. सध्याचे युग व गतीमान तसेच नवनवीन आधुनिक यांत्रिककरणाचे असल्याने सर्वांनीच सुरक्षिततेची  उपकरणे काम करतांना वापरावीत, जेणे करुन अपघातांचे प्रमाण त्यामुळे कमी होईल.

     संदिप महाजन यांनी औद्योगिक सुरक्षिततेविषयी काही उदाहरणे देऊन समयोसूचित भाषण करुन आपले विचार मांडले. व सुरक्षा विषयक कंपनीमध्ये काम करणार्‍या सुरक्षा कमिटीचे अभिनंदन केले व सुरक्षिततेविषयी आपण सातत्याने सर्वांची काळजी घेत रहावे दुर्लक्षित करु नये, असे सांगितले.

     याप्रसंगी सुरक्षिततेविषयक  सर्वश्री महेश चांडक, अविनाश मांडे, अविनाश कोल्हटकर, मानवसंसाधन विभागाचे प्रमुख श्रीकांत गाडे, योगेश ओझा, कामगार युनियनचे किरण देशमुख यांनी सुरक्षिततेविषयक आपले विचार व्यक्त केले.

     या सुरक्षा सप्ताहानिमित्त कंपनीमध्ये केमिकल हाताळणे याचे प्रशिक्षण, बोटांची काळजी घेणे, सुरक्षिततेविषयी व्याख्याने, स्पॉर्ट हाजार्ड, सुरक्षा नियमाविषयी निबंध स्पर्धा, चालता बोलता स्पर्धा, पोस्टर, प्राथमिक उपचार, अग्निशमन प्रात्यक्षिके व सुरक्षाविषयक जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हा सप्ताह यशस्वीतेसाठी संजय भुजबळ, ताराचंद ठोकळ, दत्तात्रय बोरुडे, सुखदेव निमसे, ईश्‍वर हांडे, चैतन्य खानवेलकर, श्री.भावसार आदि प्रयत्नशिल आहे. कार्यक्रमाच्या शेवटी शैलेंद्र भालेकर यांनी आभार मानले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्व संगणीकृत ७/१२ उतार्‍यावर ताब्याचा रकाना गायब असल्याचा आरोप

 ताब्याचा रकाना गायब झाल्याने सावकारांना जमीन लाटण्यास मोकळीक मिळाली 

अ‍ॅड. कारभारी गवळी : पीपल्स हेल्पलाईन संघटनेच्या वतीने महसुल प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी उभारणार काळ्या गुढी

वेब टीम नगर : राज्य सरकारने जमीनीचे ७ /१२ उतारे संगणीकरण करुन सोयीचे करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये ताब्याचा रकाना वगळण्यात आल्याने मोठी त्रूटी निर्माण होऊन धनदांडगे व सावकारांना जमीन लाटण्यास मोकळीक मिळाला असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईन संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. ताब्याचा रकाना वगळणार्‍या महसुल प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयासमोर काळी गुढी उभारुन राज्य सरकारचे लक्ष वेधले जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून जागेचे ७/१२  उतारे डिजीटल पध्दतीने संगणीकरण करुन संग्रहीत करण्यात आले. पण त्याच्यात सदर जागा कोणाच्या ताब्यात आहे?, हा रकाना वगळण्यात आल्याने सर्वात मोठी त्रूटी निर्माण झाली आहे. यामुळे जागेचा ताबा कळण्यास अडचणी निर्माण झाल्या असून, कायद्यात कोणत्याही प्रकारची दुरुस्ती न करता हा रकाना वगळण्यात आला आहे. यामुळे धनदांडगे, सावकार ताब्याशिवाय अनेक जमीनीचे खोट्या कागदपत्राद्वारे खरेदी-विक्री व्यवहार करु लागले आहेत. सदर प्रकरणाची पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने दखल घेण्यात आली असून, महसुल प्रशासनाच्या या चुकीच्या कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी काळ्या गुढ्या उभारण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात लाखो एकर जमीनी आजही सावकाराने लाटल्या आहेत. मात्र या जमीनीवर त्यांचा ताबा नाही. जमीनीच्या संपत्तीत मुलीची मालकी हक्क दाखवला जात नाही. नुतन संगणीकृत ७/१२ वर ताब्याचा रकाना वगळण्यात आल्याने सावकार व धनदांडग्यांना जमीन लाटण्यास मोकळीक मिळाली आहे. न्यायालयात पुराव्याकामी ताब्याबाबत गोंधळ निर्माण होऊन, ताबा असणार्‍या शेतकर्‍यांना न्याय मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. सावकारने केलेल्या खोट्या खरेदीखते बारा वर्षाच्या आत रद्द करता येतात. मात्र ग्रामीण भागात शेतकर्‍यांचा अशिक्षितपणाचा फायदा सावकार उचलत असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माजी विद्यार्थ्याकडून पुरस्काराची रक्कम शाळेच्या रंगकामासाठी देणगी 

   

वेब टीम नगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गुणवंत सेवक पुरस्कार मिळालेले न्यू आर्टस् कॉमर्स व सायन्स कॉलेजचे संतोष पोपटराव कानडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मिळालेली बक्षिसाची रक्कम आपल्या गावाकडील शाळेस रंगकामासाठी मदत दिली. माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी केलेल्या मदतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

चांदा (ता. नेवासा) येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संतोष कानडे व प्रा.रावसाहेब राशिनकर या दोन माजी विद्यार्थी असलेल्या गुणवंत सेवकांचा सत्कार मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्यकारणी सदस्य डॉ.दिपकजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तर नानासाहेब अंबाडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी प्राचार्य किसन सुकटे, उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक एच.के. जावळे, ज्येष्ठ शिक्षक लहानू ताठे, अर्जुन वैरागर, कलाशिक्षक पोपट मते, अनंता शेळके, सांस्कृतिक विभाग प्रमुख हरीश दगडखैर, राजेश शेंडगे, रुख्मिनी सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शामराव पवार, पंचवटी उद्योग समुहाचे बाळासाहेब जावळे, संदीप जावळे, संतोष बोरुडे, किरण जावळे, प्रशांत दहातोंडे आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कानडे यांना नुकताच पुणे विद्यापीठात कुलगुरुंच्या हस्ते गुणवंत सेवक पुरस्कार देण्यात आला होता. या पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी चांदा (ता. नेवासा) येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास ५ हजार रुपयाची मदत रंगकामासाठी प्राचार्य किसन सुकटे यांच्याकडे सुपुर्द केली. स्वाती दळवी यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षक लहानू ताठे यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खोसपूरी गावात विविध विकास कामाचा शुभारंभ

नूतन सरपंच, उपसरपंच यांचा प्रलंबीत विकासकामे मार्गी लावण्याचा सपाटा

वेब टीम नगर :  नगर तालुक्यातील खोसपुरी येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांनी पदभार स्विकारुन गावाच्या प्रलंबीत विकास कामांचा शुभारंभ केला. नुकतेच सरपंच नशिबाबी मुबारक पठाण यांनी पदभार घेतल्यानंतर गावातील प्रलंबीत विकासकामे मार्गी लावण्याचे काम सुरु केले असून, विकासात्मक दृष्टीने संपूर्ण गावाची वाटचाल खर्‍या अर्थाने सुरु झाली आहे.

गावातील जिल्हा परिषद शाळेला पेव्हिंग ब्लॉक बसवून, वॉल कंम्पाऊंड करणे, अंगणवाडी समोरील परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे व सुशोभीकरणाच्या कामाचे भुमीपूजन करण्यात आले. त्याचबरोबर नागरगोजे वस्तीसाठी पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाइन मंजूर करून त्या कामाला देखील सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच नशिबाबी मुबारक पठाण, उपसरपंच प्रशांत भालेराव, ग्रामपंचायत सदस्य अविनाश आव्हाड, करीम बेग, कय्यूम शेख, माजी सरपंच सत्तार शेख, अर्जुन आव्हाड, बाबाभाई शेख, प्रवीण आव्हाड, गणेश भिसे, हरिभाऊ हारेर, भारत देवकर, शांताराम शिरसाठ, त्रिंबक नागरगोजे, पोलीस पाटील अंबादास देवकर, भाऊसाहेब भिसे, भाऊसाहेब देवकर, अस्लम बेग, जाकीर शेख, संभाजी भिसे, शरद भालेराव, रामभाऊ देवकर, भिसे काका, बाबू हमीद शेख, गणेश साळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नौदलात रुजू झाल्याबद्दल यश रणसिंग यांचा चाईल्ड लाईनच्या वतीने सत्कार

वेब टीम नगर : चाईल्ड लाईनच्या वतीने भारतीय लष्कराच्या नौदलात रुजू झाल्याबद्दल यश रणसिंग यांचा सत्कार बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांच्या हस्ते झाला. यावेळी चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक महेश सुर्यवंशी, समुपदेशक आलिम पठाण, शाहिद शेख, अब्दुल खान, प्रविण कदम, राहुल कांबळे, पूजा पोपळघट, शुभांगी माने, राहुल वैराळ, उमेश कोरडे, हर्ष रणसिंग आदी उपस्थित होते.

हनिफ शेख म्हणाले की, बिकट परिस्थितीवर मात करुन ध्येय गाठण्याचा आनंद सर्वोच्च आहे. संघर्षाशिवाय जीवनाय यश नाही. जीवनात ध्येय असेल तरच यश मिळते, नाहीतर आयुष्य भरकटते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या यश रणसिंग भारतीय नौदलाच्या भरतीत पात्र होऊन खडतर प्रशिक्षण पुर्ण करुन नुकतेच तो विशाखापट्टणम येथे देशसेवेच्या कार्यासाठी रुजू झाल्याचा हा सर्वांना अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. महेश सुर्यवंशी यांनी चाईल्ड लाईनच्या वतीने रणसिंग यांना पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments