अनुराग कश्यप,तापसी पन्नू यांच्या घरावर आयकरचे छापे
वेब टीम मुंबई : कर वसुली आणि कर भरणा संदर्भात बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आज आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मेंटेना,विकास बहल यांच्या घरी आयकराने सकाळी छापेमारी केली आहे. कर प्रकरणामध्ये छापेमारी करण्यात आली आहे असं सांगण्यात येतंय.
विकास बहल, अनुराग कश्यप आणि मधु मेंटेना याच्या फॅन्टम फिल्मस संबंधित कर चोरी प्रकरणातील आहे. हे तिघेही या प्रोडक्शन हाऊसचे संस्थापक आहेत तर अनुराग कश्यप या प्रोडक्शन हाऊसचा मालक आहे.
तापसी पन्नूच्या घरी आयकराने का छापेमारी केली आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही. कर चोरी अथवा कर चुकवेगिरी प्रकरणात मुंबई आणि पुणे या शहरातील २२ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु होती .
तापसी पन्नू गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अनुभव सिन्हाच्या थप्पड या चित्रपटात दिसली होती. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 'लूप लपेटा' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. या व्यतिरिक्त तापसी ही अनुराग कश्यपच्या आगामी थ्रिलर फिल्म 'दोबारा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात तिच्या स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या 'रश्मी रॉकेट' या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे.
तापसी पन्नू आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवर आपली मते मांडण्यास प्रसिद्ध आहे. देशातील सुरु असलेल्या परिस्थितीवर तिने अनेकदा आपले मत निर्भिडपणे व्यक्त केलं आहे. अनुराग कश्यप आता आपल्या 'दोबारा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ही माहिती दिली होती.
0 Comments