मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना,आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 योगसाधना : उत्तानासन 



उत हा उपसर्ग तीव्रता व उत्कटता दाखविणारा आहे आणि तान  या क्रिया पदांमध्ये पसरणे ,लांबवणे ,ताणणे  हे अर्थ येतात या आसनामध्ये पाठीच्या कण्याला मुद्दाम अतिशय तीव्र असा ताण दिला जातो. 

 पद्धती :

१) ताडासनात  उभे राहा गुडघे घट्ट आवळलेले असू द्या. 

२) श्वास सोडा.पुढे वाका आणि बोटे जमिनीवर टेकवा पावलांच्या बाजूला चवड्यांच्या जरा मागे तळहात टेकवा.गुडघे वाकवू नका.  

३) डोके वर उचलून धरा आणि पाय ताणा . पाय जमिनीशी काटकोनात करतील अशा बेताने कमरेचा भाग  जरा पुढे डोक्याकडे आणा. 

४) या स्थितीत राहून दोनदा दीर्घश्वसन करा. 

५) श्वास सोडा. धड  पायांच्या जरा नजीक आणा आणि डोके गुडघ्यावर टेकवा. 

६) गुडघ्यावरील पकड सैल  होऊ देऊ नका परंतु गुडघ्याच्या वाट्या चांगलं वर खेचून धरा दीर्घ आणि समतोल श्वसन करत या स्थितीत रहा.  

७) श्वास घ्या डोके गुडघ्यावरून उचला.परंतु तळहात जमिनीवर तसेच राहू द्या. 

८) दोनदा श्वसन केल्यावर एक दीर्घ श्वास घ्या जमिनीवरून हात उचलला आणि पुन्हा ताडासनात या . 

 परिणाम : या आसनामुळे पोटातील वेदना थांबतात आणि यकृत ,प्लीहा ,मूत्रपिंड ही सुधारतात.  मासिक पाळीमध्ये पोटात  होणाऱ्या वेदना कमी होतात . हृदयाच्या ठोक्यांचा वेग संथ होतो आणि पाठीच्या कण्यातील शिरांना नवजीवन मिळते . या आसनात  दोन मिनिटे किंवा अधिक काळ राहिले तरी मनाची खिन्नता नाहीशी होते.  या आसनामुळे मेंदू जवळील पेशी शांत होतात. त्यामुळे झटकन उत्तेजीत होणाऱ्या व्यक्तींना यापासून लाभ होतो.  हे आसन  केल्यानंतर शरीर व मनाला शांतता व शीतलता लागते.  डोळे तेजाळतात आणि मनाला शांती लागते.  शीर्षासन करतांना ज्यांचे डोके जड होते चेहरा लाल होतो किंवा इतर कसला त्रास होऊ लागतो त्यांनी प्रथम उत्तानासन करावे म्हणजे मग शीर्षासन  त्यांना सहजपणे करता येईल.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार : व्हेजिटेबल मख्खनवाला 

साहित्य : भाज्या एक वाटी सोडलेले मटार, दोन भोपळी मिरची चिरून, एक वाटी गाजराचे लांबट तुकडे, एक वाटी फ्लॉवरचे छोटे तुकडे, दोन मोठे बटाटे सोलून मध्यम चौकोनी फोडी, अर्धी वाटी  पानकोबी पातळ चिरून, कोथिंबीर, दोन मोठे कांदे चिरलेले ,आठ ते दहा पाकळ्या लसूण व आले वाटून, पाव किलो टोमॅटो बारीक चिरून , पाव किलो पनीर,  

मसाला : अर्धा चमचा शहाजिरे, एक चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, दोन वाटया अधमुरे  गोड दही ,एक लिंबाचा रस ,चार हिरव्या मिरच्या अर्धी वाटी लोणी (घरगुती पांढरे लोणी किंवा अमूल बटर ) मीठ, साखर चवीनुसार. 

 कृती : 

१) सर्व भाज्या भोपळी मिरची व कांदा टोमॅटो सोडून चिमूटभर मीठ टाकून वाफवून घेणे. 

२) चिरलेले कांदे लसूण हिरव्या मिरच्या लाल तिखट व गरम मसाला वाटून घ्यावा. 

३) वाटलेला मसाला दही व मीठ घालून एकत्र कालवून घ्यावा व उकडलेल्या सर्व भाज्यांना हलक्या हाताने लावून दोन तास मुरत ठेवाव्यात. 

४) पसरट कढईत लोणी तापवून भोपळी मिरची व टोमॅटो बाजूला सुटेपर्यंत परतून घ्यावे व त्यात मसाला घातलेल्या भाज्या व पनीर मधले अर्धे पनीर किसून घालावे व भाज्या लोण्यात परताव्यात. 

५) उरलेल्या पनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे तळून भाजी बाऊल मध्ये काढून वरून घालावे, वर  बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

 टीप : 

१)या भाजीबरोबर गरम पराठे किंवा पुरी छान लागते . 

२) सर्व भाज्यांमध्ये अर्धा किलो पनीर मोठे चौकोनी तुकडे करून घ्यावे व मसाला लावून ठेवावे (पनीर थोडे किसून बाजूला ठेवावे )लोण्यावर भोपळी मिरची व टोमॅटो परतून मसाला लावलेले पनीरचे तुकडे व किसलेले पनीर व कोथिंबीर घालून पनीर माखनवाला करावे.  (पनीर तळून घ्यायचे नाही व तुकडे पातळ मोठे करायचे. )

Post a Comment

0 Comments