नगरटुडे बुलेटीन 10-02-2021

नगरटुडे  बुलेटीन 10-02-2021

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्पर्धा परीक्षांतून तरुणांनी आयुष्य जगण्याचं शहाणपण शिकावं

 किशोर रक्ताटे :  ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम 

वेब टीम नगर  : स्पर्धा परीक्षार्थींनी वेळ गेल्यानंतर नाही तर वेळे आधी शहाणं झाल पाहिजे. आपण आपल्या क्षमतांच योग्य मूल्यमापन केले पाहिजे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीतून आयुष्य जगण्याच शहाणपण मिळण्यासाठी केवळ परीक्षे पुरता नाही तर व्यापक हेतूने अभ्यास करावा, असं प्रतिपादन स्पर्धा परीक्षा समुपदेशक तथा राजकीय सल्लागार किशोर रक्ताटे (पुणे) यांनी केले आहे. 

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताहांतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह या संवाद कार्यक्रमात किशोर रक्ताटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

रक्ताटे यावेळी म्हणाले की, राज्यसेवा, केंद्रीय सेवा या स्पर्धा   परीक्षां व्यतिरिक्त देखील करिअरच्या इतर अनेक संधी विद्यार्थ्यांच्या समोर आहेत. त्या संधींसाठी देखील विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार ठेवायला पाहिजे. कारण सगळ्याच क्षेत्रात चांगल्या माणसांची आज गरज आहे. आपण त्यासाठी पात्र आहोत हे मात्र विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. 

स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना गांभीर्यपूर्वक दोन वर्षांमध्ये पूर्ण ताकदीनिशी अभ्यास करावा. पण यापेक्षा जास्त वेळ न घालवता इतर संधी पण आजमावता आल्या पाहिजेत. अभ्यास करताना आणि आयुष्य जगताना व्यावहारिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे कष्ट करण्याची तयारी आहे अशा विद्यार्थ्यांना यश हमखास मिळते. आपल्या यशाची व्याख्या आपण स्वतः ठरवली पाहिजे. पण ती ठरवत असताना आनंद नेमका कशात आहे याचा देखील शोध आपल्याला घेता आला पाहिजे, असे रक्ताटे यावेळी म्हणाले. 

यावेळी प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ.बापू चंदनशिवे यांनी केले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ.बाळासाहेब पवार, प्रा. डॉ. चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि.चिरंजीव गाढवे, प्रशांत जाधव, सुजित जगताप, कु.किरण वाडेकर, योगेश जस्वाल, सचिन वारुळे,धुळाजी महारनवर, कु. शामल पवार यांच्यासह विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी काम पाहिले. 

विद्यार्थी काँग्रेसचा पुढाकार कौतुकास्पद

काँग्रेस सारख्या एका राष्ट्रीयस्तरावरील जबाबदार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असणाऱ्या किरण काळे आणि विद्यार्थी काँग्रेसच्या टीमने स्पर्धा परीक्षा सारख्या महत्वाच्या विषयावरती अशा प्रकारच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. अशा प्रकारच्या भूमिकेतून राजकीय पक्षांनी काम केल्यास निश्चितपणे याचा समाजाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी किशोर रक्ताटे म्हणाले. 

यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, ज्येष्ठ नेते गुलाबराव काळे, निजाम जहागीरदार, अनंतराव गारदे, खलील सय्यद, फारुक शेख, प्रशांत वाघ, आय.बी. शहा, नलिनी गायकवाड, अनिस चुडीवाल, प्रवीण गीते, अक्षय कुलट, सुनीता बर्वे, अन्वर सय्यद, सिद्धेश्वर झेंडे, शंकर आव्हाड, निसार बागवान, कौसर खान, उषा भगत, अजय मिसाळ, सौरभ रणदिवे, मोहनराव वाखुरे, विशाल कळमकर, प्रमोद अबुज, अमित भांड आदी उपस्थित होते. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ.राहत इंदोरी ची शायरी सामान्य माणसाला जीवनामध्ये लढण्याची ताकद देणारी होती

 डॉ. कमर सुरुर : मैं जब मर जाऊ तो मेरी अलग पहेचान लिख देना... लहू से मेरी पेशानी पें हिंदूस्तान लिख देना’

    वेब टीम  नगर :  राहत इंदोरी यांची शायरी सर्वसाधारण माणसाला सहजतेने समजणारी शायरी होती. त्यांच्या शायरीत प्रेम, क्रोध, बांधिलकी, सामाजिक परिस्थिती, राजनैतिक समिकरणे, निसर्ग सौंदर्य, पर्यावरण, भावना, यातना, कष्ट, परिश्रम, दु:ख, वेदना, आनंद, सूख, उत्साह सर्वकाही होते. आपल्या शायरीमध्ये जीवनातील अशी कोणतीही बाजू सोडली नव्हती. त्यांचा एक सुंदर असा शेर आहे की,

     ‘शाखों से टूट जाये वो पत्ते नही है हम..... आँधी से कोई कह दो की औकात में रहे’

     त्यांची शायरी सामान्य माणसाला जीवनामध्ये लढण्याची ताकद देणारी होती. परिस्थितीला सामोरे जाण्याची हिंमत देणारी होती. समाजातील संवेदनशिल परिस्थितीवर देखील त्यांनी खूप काही लिहिले होते. डॉ.राहत इंदोरी यांची सर्वसामान्य माणसाला समजणारी शायरी होती. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती. त्यांनी लिहिलेली गाणे आजही अनेकांच्या तोंडपाठ आहेत, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव कवयित्री डॉ.कमर सुरुर यांनी केले.

     मखदुम सोसायटीच्यावतीने राहित इंदोरी यांच्या जन्मदिनानिमित्त गोविंदपूरा येथे मैफिले मुशायर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.कमर सुरुर बोलत होत्या. यावेळी झालेल्या मुशायर्‍यामध्ये बिलाल अहेमद, हबीब पेंटर, नफिसा हया, शरिफ खान, सलिम यावर, आसिफ सर, मुन्नवर हुसेन, डॉ.कमर सुरुर यांनी आपल्या रचना सादर केल्या. तर डॉ.कमर सुरुर यांनी राहत इंदोरी यांच्यासमवेत झालेल्या मुशायर्‍यातील आठवणींना उजाळा दिला.

     पुढे बोलतांना डॉ.कमर सुरुर म्हणाल्या, राहत इंदोरी यांनी खुद्दार चित्रपटातील गाणं ‘तुमसा कोई प्यारा कोई मासूम नही है, तुम जान हो मेरी तुम्हे मालून नही है।’ असो किंवा नाराज चित्रपटातील ‘सांभाला है मैंने बहोत अपने दिल को.. जुबा पर फिर भी तेरा नाम आ रहा है।’ ही गाणी अजरामर झाली आहे. प्रेमशक्ती, आशियाना, सर, जानम, खुद्दार, नाराज, मर्डर, मुन्नाभाई एमबीबीएस, मिशन काश्मिर, मिनाक्षी, करीब, इश्क, बेगम जान आणि घातक चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली. त्यांच्या काव्याची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रुत, दो कदम और सही, मेरे बाद, धूप बहोत है, चाँद पागल है, मौजुद आणि नाराज असे त्यांच्या काव्य संग्रहाचे नावे आहेत. अनेक संशोधकांनी त्यांच्या जीवनावर पीएचडी केली आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

चांगल्या प्रोजेक्टला रोटरी इंटरनॅशनलची कायमच भरभरून मदत

 रोटरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर डॉ. महेश कोटबागी : रोटरी डायलिसीस सेंटरचे लोकार्पण

    वेब टीम  नगर : मनुष्य जर सुधृढ असेलतर त्याचे आचार विचारही सुधृढ होतात. जागतिक स्तरावर रोटरी क्लब समाज सुधृढ होण्यासाठी जास्तीतजास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. नगरच्या मिडटाऊन क्लबने सुरु केलेले डायलेसीस सेंटर गरजू रुगांना खूप उपयोगी ठरणार आहे. सध्या आयपत असलेले सधनांमध्येही मोफत उपचार घेण्याची मानसिकता वाढत आहे. यासाठी रोटरीच्या सदस्यांनी खऱ्या गरजूंनाच याठिकाणी डायलेसीसची उपचार सेवा मिळाले याकडे लक्ष द्यावे. सर्वसामान्यांना उपयोगी पडेल अशा सुविधा देतांना आम्हाला खूप आनंद होत आहे. मात्र खऱ्या गरजूंना या सुविधा मिळाल्यातर जास्त समाधान होईल. रोटरी इंटरनॅशनल कायमच चांगल्या प्रोजेक्टला भरभरून मदत करत आहे. म्हणून समाजातील प्रत्तेक गरजूसाठी उपक्रम राबवा रोटरी इंटरनॅशनल खंबीरपणे मागे उभे आहे, असे प्रतिपादन रोटरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर डॉ. महेश कोटबागी यांनी केले.

          येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या प्रयत्नाने व ग्लोबल ग्रँटच्या सहकार्यातून मॅककेअर हॉस्पिटल मध्ये सुरु करण्यात आलेल्या अत्याधुनिक मशिनरी युक्त रोटरी डायलिसिस सेंटरचे लोकार्पण रोटरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर डॉ. महेश कोटबागी यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी प्रांतपाल हरीश मोटवानी, माजी प्रांतपाल प्रमोद पारीख, सुहास वैद्य, ओम मोतीपवळे, रुक्मेश जकोटीया, रोटरी क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितिज झावरे, सचिव दिगंबर रोकडे,प्रकल्प अध्यक्ष विजय इंगळे, डॉ.आनंद काशीद, डॉ. प्रशांत पटारे, डॉ. सतीश सोनवणे आणि मॅककेअर हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स आदींसह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. नगर शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना विनामूल्य किंवा अत्यल्प दरात डायलिसिस उपचाराची सुविधा मॅककेअर हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे.

          यावेळी बोलतांना प्रांतपाल हरीश मोटवानी म्हणाले, गेल्या ११५ वर्षापासून रोटरी संपूर्ण जगात मानवसेवे साठी बहुमोल योगदान देत आहे. नगरचा रोटरी मिडटाऊन क्लब या कार्यात पुढे येत खुप चांगले काम करत आहे. अध्यक्ष क्षितिज झावरे यांनी कोविड काळात व नंतरही मोठे प्रोजेक्ट राबवले आहेत. किडनीच्या विकारांमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य व गरजू रुग्णांना मोफत व अल्पदरात उपचार मिळण्याची गरज ओळखून मिडटाऊन क्लबने सुरु केलेले हे डायलिसिस सेंटर फार उपोयोगी ठरणार आहे.

          प्रास्ताविकात अध्यक्ष क्षितिज झावरे म्हणाले, रोटरी ग्लोबल ग्रँटची मोठी ताकद आमच्या मागे उभी आहे. हे डायलिसिस सेंटरसाठी निधी मिळण्यासाठी माझ्या बरोबर प्रोमोद पारीख, विजय इंगळे यांनी मोठी मेहनत घेतली. त्यामुळेच अल्पावधीतच हे सेंटर उभे राहिले आहे. माझ्या मिडटाऊन क्लबचे सदस्य कायमच प्रत्तेक उपक्रमात माझ्यामागे उभे असतात. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.

या प्रसंगी उपस्थित असलेले नगर मधील सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष व सेक्रेटरी यांचा सत्कार करण्यात आला. रोटरीचे सदस्य मनीष बोरा, हेमंत कराळे, अभय राजे, मनीष नय्यर, शिरीष रायते, रमेश वाबळे, विजय निकम, राकेश गुप्ता, विनोद मोरे यासह सदस्य उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  मधुरा झावरे आणि डॉ. सोनल बोरुडे  यांनी केले. आभार डॉ. प्रशांत पटारे आणि सचिव दिगंबर रोकडे यांनी मानले. नगर शहर व जिल्ह्यातील मूत्रपिंडाचे आजार असणाऱ्या रुग्णांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी मॅककेअर हॉस्पिटल येथे डॉ. आनंद काशीद मो. ८४५९४९५८९५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रोटरीचे प्रसिद्धी प्रमुख डॉ. सुशील नेमाणे यांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दुसरी एकता धम्म परिषद ११ रोजी  नगरमध्ये

   वेब टीम   नगर : भारतीय बौद्ध सभा जिल्हा शाखेच्यावतीने भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मिराताई यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शखाली दुसर्‍या धम्म परिषदेचे नगरमध्ये गुरुवार दि.११ फेब्रुवारी २०२१ रोजी पंचशील विद्या मंदिर, सिद्धार्थनगर, नगर येथे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.

     याप्रसंगी राष्ट्रीयमहासचिव जगदीश गवई, सचिव वसंत पराड, भिकाजी कांबळे, अशोक केदारे, भदंत बी सारीपूत व श्रामणेर संघ तसेच विभागीय सचिव अनिकराव गांगुर्डे, उत्तर जिल्हाध्यक्ष के.आर.पडवळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे, भगवंतराव गायकवाड व सर्व जिल्हा, तालुका  कार्यकारिणी यांच्या उपस्थित राहणार आहेत.

     सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत बौद्ध धर्मातील विविध विषयांवर प्रबोधन, धम्मदेशना, धम्म पुरस्कार, श्रामणेर शिबीर समारोप,  स्मरणिका प्रकाशन सोहळा आदि कार्यक्रम होतील. यासर्व कार्यक्रमासाठी उपासक, उपसिकांना भोजनाची व्यवस्था केली आहे. तरी सर्व बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने करण्यात आले आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

सरकारच्या महसूलात होणारी घट देशावरील कर्ज वाढवणारी

डॉ. प्रमोद लोणारकर : अहमदनगर कॉलेजमध्ये ‘अर्थसंकल्प 2021’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद 

    वेब टीम  नगर : अहमदनगर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘अर्थसंकल्प 2021’ या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्रमुख डॉ.प्रमोद लोणकर व्याख्याते म्हणून लाभले. विभागप्रमुख डॉ पराग कदम हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

     अर्थसंकल्पावरील आपल्या व्याख्यानात डॉ. लोणारकर यांनी अर्थसंकल्पातील विविध तरतुदीसंदर्भात भाष्य करतांना म्हणाले की, अर्थसंकल्प हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे प्रत्येकाने यासंदर्भात सजग असले पाहिजे. तसेच, अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्प तयार करण्याच्या पद्धती, अर्थसंकल्प तयार करताना कोणती काळजी घेतली जाते?  यासारख्या मुलभूत संकल्पना स्पष्ट करत लोणारकर यांनी सरकारच्या महसूल (उत्पन्न) आणि खर्च यावर विस्ताराने भाष्य केले. सरकारच्या महसुलाचे स्त्रोत आणि खर्चाचे मार्ग सांगत त्यांनी सरकारचे स्वत:चे उत्पन्न आणि खर्च आणि सरकारवरील वाढत्या कर्जाचा आढावा घेतला. कोरोना पार्श्‍वभूमीवर गेले वर्षभर सरकारी महसुलावर आलेली बंधणे तर दुसरीकडे वाढलेला खर्च यामुळे वाढणार्‍या वित्तीय तुटीवर प्रकाश टाकला.

     या वर्षात आणि पुढील वित्तीय वर्षातही सरकारचा महसूल घटणार असल्याने सरकारवरील कर्ज मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारवरील कर्ज मर्यादेबाहेर वाढल्यास त्याचे आर्थिक विकासावर परिणाम होतात, याची दखल घेतली जावी अशी अपेक्षा डॉ.लोणारकर व्यक्त केली.

     या कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनी अपूर्वा लहाडे,  श्‍वेता यादव,  अपेक्षा फासले यांनी अर्थसंकल्पावर सादरीकरण केले.  या परिसंवादासाठी जगन्नाथ गव्हाणे, डॉ. परमेश्‍वर गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहिली. याबरोबरच, विभागातील माजी विद्यार्थी राहूल सानप यांच्यासह अर्थशास्त्र विभागातील आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ पराग कदम यांनी केली.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ माधव शिंदे यांनी तर आभार डॉ भागवत परकाळ यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिवावर उदार होवून सेवा देणार्‍या२७८ कोरोना योद्धाचा सन्मान

राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्य.संघटनेचा राज्यात पहिलाच उपक्रम नगरमध्ये संपन्न

   वेब टीम   नगर :  ‘घराबाहेर पडणे धोक्याचं, जीवावर बेतणारं अशा लॉकडाऊनच्या काळात कोरोना बाधित रुग्णाच्या कक्षापर्यंत सेवा देणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांची नोकरीच्या माध्यमातून जी सेवा घडली ती जनसेवाच ठरली. प्रशासनाबरोबर आरोग्य सेवा देणारे, स्वच्छतेचे काम करणारे, रस्त्यावरील पोलिस आणि जीवनावश्यक वस्तू पुराविणारे दुकानदार या चार विभागातील लोक एकूण लोकसंख्येनुसार तसे मोजके होते. पण, त्यांनी जीवावर उदार होऊन कोरोना प्रादुर्भावच्या काळात जी जनसेवा दिली, त्यामुळे लाखोंचे प्राण वाचविले गेले. जनसेवा देणार्‍या या लोकांना दररोज सायंकाळी घरी जातांना आणि परिवारात मिसळतांना जे काय घडतं ते भितीच्या सावटाखाली या अवस्थेत त्यांना आणि परिवाराला राहावं लागलं हे नाकारुन चालणार नाही, आरोग्य विभागातील हिवताप कर्मचार्‍यांनाही या काळात अशीच भुमिका बजवावी लागली त्या२७८ अधिकारी, कर्मचार्‍यांना कोरोना योद्धा सन्मानाने आज नगरमध्ये गौरविण्यात आले. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नगर जिल्हा शाखेने या सोहळ्याचे आयोजन केले होते.

     आरोग्य सेवा नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भुषविले तर प्रमुख उपस्थितीत जि.प.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रविंद्र कानडे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, सहाय्यक हिवताप अधिकारी संजय सावंत, साथरोग अधिकारी दादासाहेब साळूंके, मध्यवर्ती संघटना नगर शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, कार्याध्यक्ष डॉ.मुकुंद शिंदे, जि.प. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर डिसले, सचिव संजय दुस्सा आदि व्यासपीठावर विराजमान होते.

     गेल्या २२ मार्च २०२० पासून कोरोनाच्या संकटाशी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रथम प्राधान्य कामाला असे म्हणत दिवस-रात्र कोरोनाशी सामना करत कार्यरत होते. आजही त्यांचे काम थांबलेले नाही. परिस्थिती बदलली पण भिती आजही आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकअधिकारी, कर्मचारी कोरोना बाधित होऊन काहींचे निधन झाले आहे. आरोग्य सेवा देतांना मरण येणे अर्थात ते शहीद समजले पाहिजे. अशा स्थितीत ज्यांनी आजपर्यंत कार्यरत राहून अनेकांचे प्राण वाचविले. कोरोना नियंत्रणाकरिता अविरत कार्य करीत असल्याने अशा कोरोना योद्धांचा सन्मान करणे हे कर्तव्यच आहे ते संघटनेने केले, असे अध्यक्षीय भाषणात डॉ.गांडाळ यांनी नमूद केले.

     सदर प्रसंगी गोंडगांव येथील आरोग्यसेवक तथा महाराष्ट्रात जुनी पेन्शन लढ्यातील मुलूख मैदान असलेले राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य संघटक संजय सोनार कळवाडीकर यांनीही ‘नोकरी ही सेवाच असते आणि कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ती देणेकर्तव्य आहे ते आपण सर्वांनी केले. पण, जुनी पेन्शन सारखे हक्क मिळणे ते ही गरजेचे असल्याचे सांगितले.

     प्रारंभी दिवंगत कामगार नेते र.ग.कर्णिक यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. कोरोना बाधित मयत झालेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवर व वक्त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास ढगे, सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप, सह-कार्याध्यक्ष जनक बागल, उपाध्यक्ष अरुण लांडे, व्ही.बी.वाडेकर, जी.के.भागवत, पी.बी.टकले, ए.एस.गायकवाड,कोषाध्यक्ष वैभव चेन्नूर, डी.एल.मुत्याल, सहचिटणीस के.एस.भिंगारदिवे, एन.एच.पवार, व्ही.ए.गोरे, संघटक एस.एन.गर्जे, मार्गदर्शक पी.डी.कोळपकर, तालुकाध्यक्ष सर्वश्री सागर गायकवाड (नगर), संजय भैलुमे (कर्जत), एस.वाय.कराड (पाथर्डी),डी.जी.पुंड (नेवासा), एस.एफ. भिंगारदिवे (राहाता), एन.एम.वाघ (कोपरगांव), एन.डी.नेवासकर (संगमनेर), जे.बी.कोकाटे (अकोले) आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम आडेप व प्रसाद टकले यांनी केले तर आभार नवगिरे यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नवी पिढी म्हणजे देशाची संपत्ती

प.पू. अण्णासाहेब मोरे : प्रशासकीय नियोजन व ग्रामअभियान सक्षमीकरण मेळावा 

    वेब टीम  नगर : नवी पिढी म्हणजे देशाची संपत्ती असून या पिढीवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृती यासाठी परिपूर्ण असून दिडोंरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवामार्गात याच माध्यमातूनच संस्कार घडविले जातात, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्‍वर श्री गुरूपीठचे पिठाधिश्‍वर प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित प्रशासकीय नियोजन व ग्रामअभियान सक्षमीकरण मेळावा नंदनवन लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. मोरे बोलत होते. सेवामार्गातील १८ विभागातील कार्याबाबत यावेळी त्यांनी माहिती दिली.

     ते पुढे म्हणाले की, आज नव्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी अध्यात्मिक मार्ग अतिशय महत्वाचा असून यासाठी मूल्यशिक्षण विभाग अतिशय व्यापकदृष्ट्या कार्य करीत आहे. आजकाल मुलींचे विवाह करणे सोपे झाले असून मुलांचा प्रश्‍न अवघड झाला आहे. कोरोना काळात कमीत कमी लोकांमध्ये विवाह लावण्याची पध्दत यशस्वी झाली असून अल्प खर्चात विवाह कार्यक्रम करणे काळाची गरज बनली आहे. यामध्ये ऋणानुबंध महत्वाचे असून अवाजवी खर्च टाळून समाजात एक वेगळा संदेश देणे महत्वाचे आहे. यावर सेवामार्गातील विवाह संस्कार विभागाद्वारे त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी येथे प्रशिक्षण दिले जाते.

     कृषी क्षेत्राविषयी  मोरे म्हणाले की, कृषी विभागाअंतर्गत महाराष्ट्रातील ११०० गावे दत्तक घेऊन पारंपारिक सेंद्रिय शेती, माती परिक्षण, पाणी परिक्षण आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. सेवामार्गाद्वारे ४० वर्षे कृषी मेळावे घेण्यात येत होते, परंतु आता कृषी महोत्सव भरविणे, थेट बांधावर पोहोचून शेतकर्‍यांना धोरणात्मक मार्गदर्शन करणे यावर भर देण्यात येत आहे. शेती क्षेत्रावर ५५ लघूउद्योग आधारित असून त्यातील महत्वाचा दुग्ध व्यवसाय आहे. जनावरांची काळजी, गोठ्यांची रचना आदि विषयांमध्ये शेतकर्‍यांना माहिती देण्यात येत आहे.

     आरोग्य क्षेत्राविषयी श्री. मोरे म्हणाले की, कोरोना महामारीवर रामबाण उपाय स्वयंपाक घरातील मसाल्याचा डबा हाच असून हळद, मिरी, तुळशीपत्रे यात अतिशय प्रभावशाली आहेत. शेतीशास्त्रातून आरोग्य अबाधित राखणे अतिशय महत्वाचे असून सेंद्रिय उत्पादित शेतीमाल बाजारात आणणे, हाच यावर उपाय आहे. डेन्मार्क, स्वीडन येथून आयात झालेल्या जर्शी जनावरांमुळे शारिरीक व्याधींचे प्रमाण वाढत असून देशी गायींचे संवर्धन करून शेण, गोमूत्र, दूध, तूप, पंचगव्य आदिंचा वापर करणे गरजेचे आहे.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश खेमनर यांनीे केले. सूत्रसंचालन गणेश पर्वत यांनी तर आभार डॉ. शुभांगी शेडाळे यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कामगार चळवळीचा आधारवड हरपला

रावसाहेब निमसे : सरकारी कर्मचारी व शिक्षक संघटनेच्या वतीने कर्मचारी चळवळीचे नेते कै. र.ग. कर्णिक यांना श्रध्दांजली

वेब टीम नगर : राज्य कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने नगर- औरंगाबाद महामार्गावरील पाटबंधारे विभाग येथील संघटनेच्या कार्यालयात सरकारी कर्मचारी व शिक्षक चळवळीचे नेते कै. र.ग. कर्णिक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. नुकतेच मुंबई येथे कर्णिक यांचे निधन झाल्यामुळे सरकारी-निमसरकारी व शिक्षकांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी कै. र.ग. कर्णिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे म्हणाले की, कर्मचार्‍यांच्या हितासाठी संघटनेच्या कामाला प्राधान्य देऊन प्रत्येकाने कार्य केल्यास कै. कर्णिक यांना खरी श्रध्दांजली ठरणार आहे. कै. कर्णिक यांनी कामगार चळवळीत दिलेले योगदान न विसरता येणारे असून, त्यांच्या निधनाने कामगार चळवळीचा आधारवड हरपला गेला असल्याचे सांगून त्यांनी कै. कर्णिक यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी अविरत संघटनात्मक कार्य करुन संघटना कशी बांधली जाईल व संघटनेच्या जोरावर कामगारांना कसा न्याय मिळेल हा दृष्टीकोन ठेऊन कै. कर्णिक यांचे कार्य दिशादर्शक आहे. सरकारी कर्मचारी, शिक्षकांची अनेक प्रश्‍न त्यांनी शासनस्तरावर सोडवून त्यांना न्याय देण्याचे कार्य केले. त्यांच्या निधनान कर्मचार्‍यांच्या चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली असून, या दु:खातून सावरुन त्यांनी दाखवलेल्या संघटनात्मक मार्गावर चालण्याची गरज असल्याचे सांगितले. तर कै. कर्णिक यांच्या सहवासातील गेल्या तीस वर्षापासूनच्या आठवणी सांगून, आपले स्वास्थ्य, स्वाभिमान, अस्तित्व व आरोग्य आजअखेर संघटनेमुळे कसे अबाधित राहिले असल्याचे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात कै. कर्णिक यांचे कामगार चळवळीतील योगदान स्पष्ट करुन, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला व त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी विलास पेद्राम, पी.डी. कोळपकर, जालिंदर बोरुडे, भाऊसाहेब शिंदे, एम.एल. भारदे, देविदास पाडेकर, भाऊसाहेब डमाळे, श्रीकांत शिर्शिकर, विजय काकडे, सयाजीराव वाव्हळ, पुरुषोत्तम आडेप, सुधाकर साखरे, गंगाधर त्र्यंबके आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टीम टॉपर्स ,वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंचे खुल्या स्केटिंग स्पर्धेत यश 

वेब टीम नगर : येथील टीम टॉपर्स व वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी संगमनेर येथे झालेल्या खुल्या स्केटिंग स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करुन घवघवीत यश संपादन केले. अ‍ॅम्बिशन स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर फाउंडेशनच्या वतीने सदर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटात व स्केटिंग प्रकारात ही स्पर्धा पार पडली. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध शाळा, स्केटिंग क्लब यांनी सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेत आर्यन गुगळे (६ वर्ष वयोगट) याने रौप्य पदक, छबी चौधरी (८ वर्ष वयोगट) हिने दोन सुवर्ण पदक, १० वर्षे वयोगटात कलश शहा रौप्य पदक, आदर्श बिश्‍वास दोन कास्य पदक, रुद्र निकम एक सुवर्ण व एक रौप्य पदक तसेच १४ वर्ष वयोगटात भक्ती दगडे एक रौप्य व कास्य पदक, चिंतन दगडे यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून पदकाची कमाई केली.

 या स्पर्धेत जागृती बागल, रुद्र निकम, कलश शहा, आदर्श बिश्‍वास यांचा सामना लक्षणीय ठरला. या स्पर्धेत सर्वाधिक पदक पटकाविल्याबद्दल टीम टॉपर संघास चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय खेळाडू गौरव डहाळे, प्रशिक्षक कृष्णा अल्हाट, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत खेळाडूंचे टीम टॉपर्सचे उपाध्यक्ष सागर कुकुडवाल, खजिनदार आसिफ शेख, वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबचे सतीश वाकळे, संदीप वाकळे यांनी खेळाडूंचे कौतुक करून अभिनंदन केले. सर्व खेळाडू बुरुडगाव रोड येथील पुंडलिकराव भोसले स्केटिंगरिंग व सावेडी येथील वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लब मध्ये सराव करतात.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 मातंग समाजाचा निशुल्क डिजिटल वधू-वर आणि पालक परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन

वेब टीम नगर :येथील प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार दि.१४ फेब्रुवारी रोजी मातंग समाजाचा डिजिटल निशुल्क वधू-वर आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा वधू-वर आणि पालक परिचय मेळावा नागापूर महापालिका जॉगिंग पार्क शेजारी चैतन्य क्लासिक हॉटेल मागे होणार असून, या मेळाव्यास समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दादु नेटके, सचिव अनिल जगताप, उपाध्यक्ष संजय मंडलिक व मार्गदर्शक भगवान जगताप यांनी केले आहे.

हा मेळावा कल्पनाताई शदर काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, उद्घाटन समाजातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते होणार आहे. तसेच आदर्श केंद्र प्रमुख उत्तमराव शेलार सरांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांचा समाज व संस्थेच्या वतीने सन्मान केला जाणार आहे. या वधू-वर परिचय मेळाव्यात सहभागी होण्यासाठी डिजीटल पध्दतीने ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. या मेळाव्यात संपुर्ण महाराष्ट्रातून मातंग समाजबांधव सहभागी होणार असून, त्यांची सर्व व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या मेळाव्यात वधु-वर आणि पालक उपस्थित राहणार आहेत. आधिक माहितीसाठी दादु नेटके मो.नं. ९२७२५१३०७१ व अनिल जगताप ९९२२७१४३५३ यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्व नेत्यांनी संवेदनशीलता दाखवत जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करावी : वसंत लोढा यांचे आवाहन

वेब टीम नगर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले असतांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ दोन दिवसाचा अवधी राहिलेला असतांना विभागीय पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन  वसंत लोढा यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे नेतृत्व करणाऱ्या सर्व पक्षांच्या नेतेमंडळींना व प्रमुख उमेदवारांना जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत वसंत लोढा यांनी जाहीर पत्रक काढून करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांनी संवेदनशीलता दाखवत जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकत्र येत सामोपचाराने ही निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन केले आहे. केलेल्या आवाहनाच्या प्रती वसंत लोढा यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांना पाठवल्या आहेत.

          वसंत लोढा यांनी काढलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, सध्या आपल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीमुळे सगळीकडे वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मी देखील एक उमेदवार आहे परंतु सर्वांगी आणि खोलवर विचार केला असता मी असे एक आवाहन करू इच्छितो की, ज्यायोगे सर्व देशासाठी आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे ते आदर्श उदाहरण ठरावे, असा त्यामागील शुद्ध हेतूने मी आवाहन करत आहे.

आपली अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी आणि कामगार वर्गाची कामधेनू आहे. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचवण्याचेच काम झाले आहे. विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातच किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये आजही ही बँक नंबर १ ची बँक म्हणून ओळखली जाते.

सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील जवळजवळ 75% बँका अडचणीत असताना केवळ नगरची ही बँक आजही आत्मविश्वासाने सुस्थितीत उभी आहे, ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. या बँकेच्या उभारणीमध्ये स्व.मोतीभाऊ फिरोदिया, भाऊसाहेब थोरात, पद्मश्री विट्ठलराव विखे पाटील, आ. शंकरराव काळे, आ.शंकरराव कोल्हे, बाबूराव तनपुरे, मारुतराव घुले, यशवंतराव गडाख अशा अनेक मान्यवरांचा फार मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत या बँकेमध्ये कधीही पक्षीय राजकारणाचा वारसा चालवला गेला नाही. उलटपक्षी सर्वपक्षीय समविचारी लोकांनी एकत्र येऊन या बँकेची प्रतिष्ठा आजही टिकवून ठेवलेली आहे.

मागील एक वर्षापासून संपूर्ण देशच नव्हे तर संपूर्ण जग करोनाच्या विळख्या मध्ये पिळून निघाले असल्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये न भूतो न भविष्यती अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हे आपण सर्वजण जाणतोच आहोत. आपण जर खरे तळमळीचे समाजाभिमुख काम करणारे लोकप्रतिनिधी असू तर या परीस्थितीची जाण ठेवणे आपल्याला आवश्यक आहे. त्यातल्या त्यात सध्याचे वातावरण पाहता शेतकरीवर्ग, कामगारवर्ग त्यांच्यासाठी झटणाऱ्या विविध पतसंस्था, सहकारी सोसायट्या या देखील प्रचंड बाधित झालेल्या आहेत. अशा वातावरणामध्ये जर आपल्या नेहमीच्या पारंपारिक व ऐतिहासिक राजकीय स्टाईलने ही निवडणुका होत असतील तर ती निश्चितच एक असंवेदनशील आणि दुर्दैवी गोष्ट असेल. कारण नाही म्हटले तरी काही सन्माननीय अपवाद वगळता बँकेच्या निवडणुकीमध्ये तेच राजकारण, फोडाफोडीचे कपट कारस्थाने आणि ते करताना प्रचंड पैशाचा अपव्यय हे ओघानेच येतेच. या निवडणुकीमध्ये जे जे मान्यवर माझ्यासह उमेदवार म्हणून रिंगणांमध्ये आहेत ते सर्वच समाजाप्रती झटणारे संवेदनशील लोकप्रतिनिधी असावेत ही माफक अपेक्षा आहे. आणि मग अशा लोकप्रतिनिधींनी सगळीकडे चालू असलेला हा बाका प्रसंग पाहता, जर एक मताने एकत्र येऊन गट-तट, राजकारण सर्व बाजूला ठेवून, खऱ्या अर्थाने या बँकेची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी आणि निवडणुकीचा लाखो रुपयांचा खर्चचा अपव्यव टाळण्यासाठी, आपली शक्ती वाया घालवण्यापेक्षा ही निवडणूक बिनविरोध करून आपण सर्वांनी एक वेगळाच नवा आदर्श निर्माण करून दाखवू. अशी एक प्रामाणिक इच्छा माझी आहे. आपण वैचारिक दृष्ट्या निश्चित प्रगल्भ आहोत हे दाखवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

यासाठी या निवडणुकीत उतरलेल्या सुकाणू सांभाळणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांना माझी अशी कळकळीची विनंती आहे, की प्रत्येक ठिकाणी आपली प्रतिष्ठा किंवा राजकीय वर्चस्व याचे निकष न लावता आणि या करोना च्या पार्श्वभूमीवर सगळीकडची दुरावस्था पाहता अशी असंवेदनशील निवडणूक होता कामा नये. निवडणूक जर खेळीमेळीच्या सामोपचाराने बिनविरोध झाली तर त्यासारखा सुवर्ण दिवस या बँकेच्या इतिहासात नसेल, हे आवाहन करताना मी स्वतः उमेदवार म्हणून माझे पहिले पाऊल पुढे टाकत सर्वप्रथम माघार मी घेईन.

या आवाहनाचा सकारात्मक, निष्पक्ष आणि मोठ्या मनाने विचार करून सर्व मंडळींनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जर प्रयत्न केले तर अशक्य असे काहीही नाही, असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

या अहवानाच्या प्रती मंत्री बाळासाहेब थोरात, यशवंतराव गडाख, आ. राधाकृष्ण विखे, ना. शंकररव गडाख, प्रसाद तनपुरे, ना. प्राजक्त तनपुरे, खा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डीले, आ.अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, सीताराम गायकर, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. आशुतोष काळे, बिपिनराव कोल्हे, उदय शेळके, काकासाहेब कोयटे आदींना पाठवण्यात आल्या आहेत. अशी माहिती वसंत लोढा यांनी दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गावाचा सर्वांगीण  विकासाचे  ध्येय समोर ठेऊन कार्य करणार 

प्रियंका लामखडे : निंबळकच्या सरपंचपदी प्रियंका लामखडे यांची निवड ,तर उपसरपंचपदी बाळासाहेब कोतकर

वेब टीम नगर : निंबळक (ता. नगर) येथे मंगळवार (दि.९फेब्रुवारी) सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. निंबळकच्या सरपंचपदी प्रियंका अजय लामखडे यांची सतरा पैकी अकरा मतांनी निवडून आल्या. तर उपसरपंचपदी बाळासाहेब जगन्नाथ कोतकर यांची बिनविरोध निवड झाली.

निंबळक गावात पुन्हा सरपंच पदाची धूरा महिलेच्या खांद्यावर आली असून, लामखडे परिवारातील चौथी पिढी ग्रामपंचायत पदाचे प्रतिनिधत्व करणार आहे. दुपारी२ वाजता सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया निंबळक ग्रामपंचायतीत पार पडली. ग्रामपंचायत सदस्यांनी गुप्त पध्दतीने बॅलेटपेपरद्वारे मतदान केले. सरपंच पदासाठी प्रियंका लामखडे व राजेंद्र कोतकर यांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये प्रियंका लामखडे यांना ११ तर राजेंद्र कोतकर यांना ६ मते पडली. यामध्ये प्रियंका लामखडे यांचा ५ मतांनी विजय झाला. उपसरपंचपदासाठी बाळासाहेब कोतकर यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. सदर निवडणुकीची प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी नालेगाव सर्कल राजू आंधळे, ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे, तलाठी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.  

सरपंच व उपसरपंच पदाची निवड होताच समर्थक कार्यकर्त्यांसह महिलांनी ग्रामपंचायतच्या आवारात गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, माजी जि.प. सदस्य कालिंदी लामखडे, अजय लामखडे, केतन लामखडे, शरद ठाणगे, रमाकांत गाडे, बाळासाहेब माधव कोतकर, प्रभाकर जाधव, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत शिंदे, अनिता गायकवाड, मालन रोकडे, विलासराव लामखडे, पद्मा घोलप, बाबासाहेब पगारे, सोमनाथ खांदवे, ज्योती गायकवाड, कोमल शिंदे आदींसह आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी व सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.  

जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे म्हणाले की, गावातील पाण्याचा प्रश्‍न बिकट बनला असून, ते सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम देणार आहे. एमआयडीसीसाठी गावातील ग्रामस्थांनी जमीनी दिल्या एमआयडीसीला येणार्‍या पाण्यावर गावातील प्रकल्पग्रस्तांचा हक्क आहे. निंबळक गटातील सर्व १३ ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे असल्याचा दावा त्यांनी केला. माजी सरपंच विलास लामखडे यांनी ग्रामस्थांनी विकासाला साथ दिली असून, काम करणार्‍या सदस्यांना निवडून दिले आहे. गावातील मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी सरपंच, उपसरपंच व सदस्य कटिबध्द राहणार असल्याचे सांगितले. नवनिर्वाचित सरपंच प्रियंका लामखडे म्हणाल्या की, गावाच्या विकासात लामखडे परिवाराने महत्त्वपुर्ण योगदान दिले आहे. गावाचा सर्वांगीन विकास हेच ध्येय समोर ठेऊन कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निमगाव वाघाच्या सरपंचपदी रुपाली जाधव यांची निवड

सरपंच, उपसरपंचाची एकमताने निवड :  उपसरपंचपदी अलका गायकवाड

वेब टीम नगर : निमगाव वाघा (ता. नगर) येथे मंगळवारी (दि.9 फेब्रुवारी) सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. निमगाव वाघाच्या सरपंचपदी रुपाली विजय जाधव तर उपसरपंचपदी अलका भाऊसाहेब गायकवाड यांची एकमताने निवड झाली.

निमगाव वाघा ग्रामपंचायतीसाठी मागास प्रवर्गातून महिलेसाठी सरपंच पद राखीव होते. सकाळी १०वाजता सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया निमगाव वाघाग्रामपंचायतीत पार पडली. हात वर करुन मतदानाची निवड प्रक्रिया पार पडली. सरपंच पदासाठी रुपाली जाधव, लता फलके व प्रमिला कापसे यांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये प्रमिला कापसे यांनी अर्ज माघार घेतल्याने जाधव व फलके यांच्यामध्ये निवड प्रक्रिया राबविण्यात आली. अकरा सदस्यांपैकी जाधव यांना ६ मते तर फलके यांना ५ मते पडली. यामध्ये रुपाली जाधव एक मतांनी सरपंच पदी निवडून आल्या. उपसरपंचपदासाठी अलका गायकवाड व संजय कापसे यांनी अर्ज दाखल केला. यामध्ये देखील गायकवाड यांना ६ तर कापसे यांना ५ मते पडून, अलका गायकवाड या एक मतांनी उपसरपंचपदी विराजमान झाल्या. सदर निवडणुकीची प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी वैशाली साळवे, ग्रामसेवक गोवर्धन राठोड, कामगार तलाठी प्रमोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.  

सरपंच व उपसरपंच पदाची निवड होताच समर्थक कार्यकर्त्यांसह महिलांनी ग्रामपंचायतच्या आवारात गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, प्रमोद जाधव, किरण जाधव, मुन्नाबी शेख, गोकुळ जाधव, साहेबराव बोडखे, अण्णा जाधव, अनिल डोंगरे, माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ जाधव, चांद शेख, शंकर गायकवाड, सुखदेव जाधव, भाऊसाहेब जाधव, भरत फलके, मच्छिंद्र कापसे, एकनाथ जाधव, रामदास डोंगरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड, राहुल शिंदे आदींसह आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. नुतन सरपंचपदी रुपाली जाधव व उपसरपंच अलका गायकवाड यांनी गावाच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन कार्य करणार असून, ग्रामस्थांनी व सदस्यांनी टाकलेल्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments