निवृत्त शिक्षिकेची समाजमाध्यमातून फसवणूक : गुन्हा दाखल

निवृत्त शिक्षिकेची समाजमाध्यमातून फसवणूक : गुन्हा दाखल 

वेब टीम पुणे: निवृत्त शिक्षिकेची  फेसबुकवर ओळख झालेल्या व्यक्तीने तिची  १३ लाख १७ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात  ६१ वर्षीय महिलेने मुंढवा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात फसवणूक व आयटी अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी ते जून २०२० दरम्यान ही घटना घडली. सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिल्यानंतर त्यांनी तपास करून मुंढवा पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या शिक्षिका असून त्या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात त्यांना फेसबुकवर शेरॉन रमेश नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारल्यानंतर त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले. त्यावेळी त्या व्यक्तीने त्यांचा व्हॉट्सॲपचा क्रमांक देखील मागून घेतला. त्यांच्यात व्हॉट्सॲपवरून चॅटींग सुरू झाले. त्या व्यक्तीने त्यांच्या भावाचा मुलगा हा शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे पाठवितो, असे सांगून त्यांचा विश्वास देखील संपादन केला. त्यानंतर त्यांना काही महागडे गिफ्ट पाठवल्याचे सांगितले.

एके दिवशी तक्रारदार यांना कस्टममधून बोलत असल्याचा फोन आला. त्यांचे परदेशातून आलेले गिफ्ट दिल्ली विमानतळावर पकडले आहेत. ते सोडवून न घेतल्यास पोलीस पकडतील, असे सांगून घाबरविले. त्यांना पैसे पाठविण्यासाठी तीन बँक खात्याचे क्रमांक पाठवले. त्यानंतर आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून कधी एक लाख, तर कधी दोन लाख असे करून तब्बल १३ लाख १७ हजार रूपये आरोपींना दिले. शेवटी त्यांच्या मुलाला हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी सायबर सेलकडे तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे हे अधिक तपास करत आहेत












Post a Comment

0 Comments