श्रुती संगीत निकेतनच्या "संगीत सौभद्र "नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रुती संगीत निकेतनच्या "संगीत सौभद्र "नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वेब टीम नगर : श्रुती संगीत निकेतन या संस्थेने आयोजित केलेल्या संगीत नाट्य महोत्सवास नगरकर रसिकांनी भरभरून दाद दिली.संस्थेच्या वतीने सादर झालेल्या  संगीत सौभद्र या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .  कोरोना महामारी नंतर नगर मध्ये प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने रसिक जमलेले  पाहायला मिळाले.माऊली सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी सभागृह प्रेक्षकांनी गच्च  भरले होते.  

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते, तसेच ओंकार कुलकर्णी ,दिलीप जोशी ,अद्वैत कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 

    यावेळी बोलतांना मधुसूदन बोपर्डीकर यांनी कलाकारांच्या स्पष्ट शब्दोच्चार ,सुरेल गायकी ,आणि अभिनयाचे कौतुक करतांना या सभागृहात सर्व दिवंगत  कलाकारांनी हजेरी लावल्याचा आभास निर्माण झाला असून या कलाकारातूनच उद्याचे नामवंत कलाकार उदयाला येतील असा आशावाद व्यक्त केला . 

संगीत नाटक क्षेत्रात अजरामर असलेल्या संगीत सौभद्र या नाटकाचा प्रयोग श्रुती निकेतनच्या बालकलाकारांनी बहारदारपणे सादर केला. सूत्रधार दीप्ती  खरवंडीकर आणि संकेत शाह  यांच्या प्रवेशापासून या नाटकाने रसिक मनाची पकड घ्यायला सुरुवात केली.  श्रावण शिंदे -नारद व बलराम ,रचेत काबरा -अर्जुन,  रिद्धी कुलकर्णी -सुभद्रा ,शौनक कुलकर्णी - कृष्ण, अनुष्का क्षिरसागर- रुक्मिणी, अनुष्का बार्शीकर- कुसुमावती, सोहम सौंदणकर -राक्षस व सात्यकी ,मिहीर कुलकर्णी -गर्ग गुरू यांनी आपापल्या भूमिकांमध्ये रंग भरला वैशाखमास वासंतिक, वद जाऊ कुणाला शरण, लग्नाला जातो मी, प्रिये पहा ,नाही झाले षण्मास या आणि अशा लोकप्रिय पदांची गोडी नगरकरांनी पुनश्च अनुभवली . बालकलाकारांनी  अतिशय समर्थपणे पेललेल्या या सौभद्राच्या  शिवधनुष्याचे  संगीत व नाट्यक्षेत्रात भरभरून कौतुक  झाले.  त्यातील अनेक पदांना  वन्समोअरची दाद  देऊन आपली पसंती दर्शवली. 

या नाटकाचे दिग्दर्शन स्व.जयमाला शिलेदार यांच्या शिष्या डॉ.धनश्री खरवंडीकर यांनी केले, ऑर्गनवर मकरंद खरवंडीकर , तबला प्रसाद सुवर्णपाठकी व टाळाची साथ आनंद कुलकर्णी यांनी केले. या नाटकाची रंगभूषा - चंद्रकांत सैंदाणे, नेपथ्य - नाना मोरे, प्रकाश योजना - मुन्ना सय्यद , वेशभूषा - पूनम कुलकर्णी, केशभूषा - सविता भैरी, ध्वनी योजना - रवी जाधव, पार्श्वसंगीत संकेत सुवर्ण पाठकी यांनी केले. 

या नाटकाला सरस्वती डेंटल क्लिनिक डॉ.ओंकार कुलकर्णी, अद्वैत कुलकर्णी, दिलीप जोशी, प्रशांत  कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी डॉ. मधुसूदन बोपर्डीकर, डॉ. जयंत देशपांडे , अनंत जोशी , दीपक शर्मा , सु.प्र.कुलकर्णी, अशोक गुर्जर , हेमंत काळे , लक्ष्मणराव ढाले , अशोक गांधी , पवन नाईक, निलेश खळीकर आदी संगीत व नाट्य क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचा आणि प्रायोजकांचा सत्कारही करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा देशपांडे यांनी केले.  

Post a Comment

0 Comments