कार मधून धूमस्टाईल चेन स्नॅचिंग

 कार मधून धूमस्टाईल चेन स्नॅचिंग 

वेब टीम औरंगाबाद : मॉर्निंग वॉकला निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याचा प्रकार सिडको एन ५ भागात गुरुवारी सकाळी ८ वाजेदरम्यान  घडला. कारमधून आलेल्या काही चोरट्यांनी त्यांना १५ ते २० फुटापर्यंत फरफटत नेले. विष्णू दौलत चित्ते (६९, रा. एन-५, श्रीनगर कॉलनी) असे त्यांचे नाव असून ते पुण्याच्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातील प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत.

चित्ते सकाळी ८वाजता , जळगाव मार्गालगतच्या सेवा रस्त्यावरून जात असताना मागून विनाक्रमांकाच्या कारमधून चौघे जण आले. चालकाच्या बाजूला भस्म लावलेला एक जण अर्धनग्न बसला होता. त्याने चित्ते यांना पत्ता विचारला. कमी ऐकू येते असा बहाणा करून कारजवळ बोलावत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साखळी हिसकावली. हा प्रकार लक्षात येताच चित्ते यांनी कारचा दरवाजा घट्ट धरून ठेवला. मात्र, कारचालकाने कार चालवित त्यांना सुमारे पंधरा ते वीस फुटापर्यंत फरफटत नेले. शेवटी खाली पडल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराला आणि गुडघ्याला मार लागला.

हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. चित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Post a Comment

0 Comments