नगर टुडे बुलेटीन 06-02-2021

 नगर टुडे  बुलेटीन 06-02-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात रंगली मुशायराची मैफिल 

शहर जिल्हा काँग्रेस आणि तंजिम-ए-उर्दू-अदब यांचा संयुक्त उपक्रम ; नामांकित शायर, कवींनी लावली हजेरी 

वेब टीम नगर : औचित्य महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे.... पुढाकार शहर जिल्हा काँग्रेस आणि तंजिम-ए-उर्दू-अदबचा... मांदियाळी जमली नगर शहर आणि पुण्यातील नामांकित शायर, कवींची... महसूल मंत्री ना.थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मुशायराच्या मैफलीचा मनमुराद आनंद नगरकरांनी या निमित्ताने लुटला. 

सर्जेपुरातील रहेमत सुलतान फाउंडेशनच्या सभागृहात पार पडलेल्या या मैफिलीला शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अंकुशराव कानडे, तंजिम-ए-उर्दू-अदबचे अध्यक्ष खलील सय्यद, ज्येष्ठ नगरसेवक नज्जूभाई पैलवान, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, माजी नगराध्यक्ष  दीप चव्हाण, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजामभाई जहागीरदार, चांद सुलताना हायस्कूलचे मुख्याध्यापक कादिर सर, आय.जी.शहा आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी उपस्थित शायर, कवींनी दर्जेदार रचना सादर केल्या  सय्यद खलील यांनी मुहफलीसेने बिगाडे, यू मेरे चेहरे के मूकुश ही रचना सादर करीत आजच्या सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकला. कमर सुरूर यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर रचना सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. बिलाल अहमद यांच्या मेरे मिया की बात निराली या हास्य कवितेने उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ पिकला. 

निजाम जागीरदार यांच्या मै सच बोलता गया, झुठे उठते गऐ या राजकीय व्यवस्थेवर टिपण्णी करणाऱ्या रचनेने मैफलीत रंगत आणली. मुनव्वर हुसेन यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर तर पुणे येथून आलेल्या सोनू साळुंके यांनी सामाजिक वास्तविकतेवर रचना सादर केल्या. हबीब पेंटर यांनी मराठी कविता तसेच मेरा पोट्टा सुनताईच नई ही आजच्या तरुणाईवरती भाष्य करणारी परखड रचना सादर केली. 

डॉ. नावेद बिजापूर यांच्या अध्यक्षतेखाली हा मुशायरा पार पडला. यामध्ये शरीफ खान, शायर मुश्ताक, असिफ सर, मुनवर अहमद यांनी देखील आपल्या रचना सादर केल्या.  

काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुप्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांची आजच्या राजकीय व्यवस्थेवर टिप्पणी करणार्‍या झूठोने, झुठो से  कहा, सच बोलो ही रचना पेश केली. याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. इंजि. अकील सय्यद यांनी सुरुवातीला पवित्र कुराणाचे पठण केले. प्रास्ताविक खलिल सय्यद यांनी केले. तर आभार निसार बागवान यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना काळातील उपचार देणाऱ्या हॉस्पिटल मधील मेडिकलने खरेदी केलेल्या औषधांच्या  जी एस टी भरलेल्या बिलांची तपासणी करा

 नितीन भुतारे : जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली मागणी

वेब टीम नगर : कोरोनाच्या काळामध्ये खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना अवाच्या सव्वा बिले आलेली आहेत. त्या बिलांचे जिल्हाधिकारी समितीने ऑडिट करून आत्ता पर्यंत १ कोटी १३ लाख वसूल पात्र रक्कम रूग्णांना परत देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु आज पर्यंत रुग्णांच्या खात्यावर हीवसुल पात्र रक्कम जमा झालेली नाही. हि वसूल पात्र रक्कम फक्तत हॉस्पिटलची होती. त्यातच त्याच हॉस्पिटल मधुन रुग्णांना औषधे खरेदी करावी लागत होती. त्या औषधांची मेडिकलची बिले सुध्दा हजारो, लाखो रुपयांच्या घरात आली होती. कोरोणा रुग्णांवर उपचार सुरू असताना कोणत्याही नातेवाईकाला रुग्णाला भेटू देत नव्हते. त्या मुळे रुग्णांच्या उपचारासाठी हि औषधे खरंच वापरली गेली का? हा सवाल अनेक रुग्णांचा , रुग्णांच्या नातेवाइकांचा असुन पाच, दहा, पंधरा दिवसात रूग्णांना हजारो, लाखो रुपयांचे औषधे कशी दिली कोणती दिली कधी दिली हे रुग्णांना व नातेवाईकांना माहीत नसून औषधांची हजारो, लाखोंची बिले रुग्णांवर लादली गेली त्यामुळे या बिलांमध्ये सुध्दा मोठा भ्रष्टाचार असल्याचा संशय असून अहमदनगर शहरात व जिल्ह्यातील कोरोनावर उपचार करणाऱ्या खाजगी हॉस्पिटल मधील कोरोणावर उपचार झालेल्या रुग्णांच्या औषधांची व त्याच काळातील संबधित सर्व खाजगी हॉस्पिटल मधील मेडिकल ने खरेदी केलेल्या औषधांच्या बिलांची तपासणी करावी. 

तसेच कोरोना काळातील उपचार दिलेल्या सर्व खाजगी हॉस्पिटल मधील मेडिकलने औषधे खरेदी केलेल्या जी एस टी बिलांची तपासणी करावी त्यामुळे ह्या हॉस्पिटल व मेडिकल ने खरंच उपचारा दरम्यान हि औषधे रुग्णांवर वापरली आहेत का नाही हे समजुन येईल व औषधे वापरली नसल्यास तसे आपल्या निदर्शनास आल्यास संबधित हॉस्पिटल बरोबर संबधित उपचार देणाऱ्या डॉक्टरवर व मेडिकल वर सुध्दा कारवाई करावी व मेडिकलने  वापरलेल्या बिलांची सुध्दा रक्कम ही रुग्णांच्या खात्यावर जमा करावी हि नम्र विनंती. या मागणीचे निवेदन नितीन भुतारे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या वेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ उपस्थित होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुनिल भंडारी

    वेब टीम नगर : महान गायक मोहम्मद रफी यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन गीत गायनाच्या कार्यक्रमात एकचवेळी ९६ गायकांनी गाणे म्हणून स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले. या गायकांमध्ये नगरमधून सुनिल भंडारी सहभागी झाले होते.

     इंदोर येथील केकेसी क्लब व संगीत सेवा सहारा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच  फेसबुक व झूम अ‍ॅपद्वारे ऑनलाईन महाकुंभ गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ९६ कलाकारांनी एकचवेळी अविरत  मोहम्मद रफी यांची गिते गायली. यामध्ये सुनिल भंडारी  सहभागी झाले; या कार्यक्रमाचा स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झाला आहे.

     यापुर्वीही सुनिल भंडारी यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून गाण्याचे कार्यक्रम सादर केले आहेत. वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रमातील सहभागाबद्दल त्यांचे नगरमधील अनेक संगीतप्रेमींनी अभिनंदन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बँक खाजगीकरण विरोधात नगरमध्ये 
बँक अधिकारी व कर्मचारी यांची निदर्शने

वेब टीम नगर : दि. १ फेब्रुवारी २०२१ रोजी वित्त मंत्र्यांनी सादर केलेल्या बजेट मध्ये दोन राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण करणार असल्याची घोषणा केली.  परंतु बँकांचे खाजगीकरण हे देश व जनहित विरोधात असल्याचे मत बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांचे असून सरकारच्या या निर्णया विरोधात बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी देशभर निदर्शने आयोजित केली होती. 

 नगर मध्ये सुध्दा बँकेच्या खाजगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी व अधिकारी यांनी निदर्शने केली यावेळी कॉ. उल्हास देसाई, माणिक अडाणे, सुजय उदरभारे, सुजय नाले, कांतीलाल वर्मा, देशमुख, कॉ.निलेश शिंदे, हीना  शेख, आशा राशीनकर, शोभा देशपांडे, सुमित खरबीकर,विशाल खोमणे, रवींद्र आंधळे, सुमित लाटे, वल्लभ पुराणिक, सुशील चौधरी, अच्युत देशमुख, आशुतोष काळे, सुनील गोंधळे,उमाकांत कुलकर्णी  व सदस्य उपस्थित होते . या प्रसंगी बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना संबोधित करतांना संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले की सन १९६९ मध्ये त्यावेळच्या सरकारने देशाच्या अर्थव्यस्थेच्या विकासाच्या दृष्टीने तसेच बँकेतील जमा रक्कम हि देशाच्या विकास कार्यासाठी वापरण्यात यावी व जनतेला त्यांच्या जमा रकमेची हमी प्राप्त व्हावी या उद्दिष्टाने बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते.  तदनंतर पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून देशात हरितक्रांती, औद्योगिक क्रांती,झाली.  ग्रामीण भागात बँकांचा विस्तार झाल्यामुळे सर्वसाधारण जनतेला बँकिंग सेवा उपलब्ध झाली.  दुर्लक्षित क्षेत्राला कर्जपुरवठा होऊ लागला.  त्यातून देशाच्या विकासाला चालना मिळाली.  परंतु हे सरकार त्या सर्व उद्दिष्टांची पायमल्ली करीत असून बँकांचे खाजगीकरण करून सर्वसाधारण जनतेच्या पैशांची लूट करण्याचा घाट घालत आहे. 

 आज बँकांची कोट्यवधी रुपयांची डुबीत व बुडीत कर्जे असून यातील मोठ्या प्रमाणावर कर्जे हि मोठ्या कारखानदार व औद्योगिक घराण्यांकडे आहे . सरकार हि कर्जे वसूल करण्यासाठी उपाय योजना करण्याऐवजी ती बँकांच्या नफ्यातून वळते करण्यावर भर देण्यात येत असून यामुळे बँक ह्या तोट्यात असल्याचे भासविले जात आहे.  हि सरळ सरळ जनतेच्या पैशांची लूट आहे.  बँकांचे  खाजगीकरण करून सरकार ह्या बँका बड्या कारखानदार व औद्योगिक घराण्यांच्या हाती सोपवून स्वतःची जबाबदारी झटकत आहे.  यामुळे जनतेच्या जमा रकमेला कोणतीही सुरक्षा राहणार नसून सध्या सर्वसाधारण जनतेला मिळणारे कर्ज दुरापास्त होणार आहे. बँकांची सामाजिक बांधिलकी संपुष्टात येऊन व्यापारीकरण होणार आहे.  त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर सेवा प्रभाराला सामोरे जावे लागणार आहे.  हि एक प्रकारे ग्राहकांची लूटच आहे. या सर्वांचा विचार करता बँक खाजगीकरण हे देशाच्या व जनतेच्या हिताचे नसल्याचे मत यावेळी कॉम. उल्हास देसाई, माणिक अडाणे, सुजय उदरभारे, सुजय नाले, कांतीलाल वर्मा, देशमुख यांनी व्यक्त केले.  यावेळी कॉम. निलेश शिंदे, हीन शेख, आशा राशीनकर, शोभा देशपांडे, सुमित खरबीकर,विशाल खोमणे, रवींद्र आंधळे, सुमित लाटे, वल्लभ पुराणिक, सुशील चौधरी, अच्युत देशमुख, आशुतोष काळे, सुनील गोंधळे व सदस्य उपस्थित होते. आभार कॉम. उमाकांत कुलकर्णी यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगरच्या विकासासाठी प्रयत्न कमी पडत आहे : मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रकांत जावळे यांची खंत

वेब टीम नगर : जगातील विकसित देशाप्रमाणे आपल्या भारताचाही विकास व्हावा असे कायम वाटत आहे. विकासित देशांमध्ये इंजीनियरीयंग क्षेत्रात खूप सुधारणा झाली असल्याने तेथे वेगाने विकास होत आहे. आपल्या देशाच्याही वेगाने विकासासठी आधुनिक इंजीनियरीयंग आपणही स्वीकारले पाहिजे. नगरही विकास झाले पाहिजे असे प्रत्तेकजण म्हणतो पण प्रयत्न कोणीच करतांना दिसत नाही, अशी खंत पुणे मेट्रो पॉलेटीयनचे मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रकांत जावळे यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, पुढील काळात होणारे विकास कामे जास्तीतजास्त दर्जेदार, उत्कृष्ठ व पारदर्शी पद्धतीने व्हावीत. नगर मधील बिल्डर असोशिएशन व अधिकाऱ्यांमध्ये चांगले समन्वय आहे. असोशिएशनच्या सदस्यांनी सामाजिक जाणीव जपली आहे. नगरमध्ये अभियंता म्हणून काम करतांना खूप काही शिकावयास मिळाले आहे. जुनी ओळख असलेले सर्वजण भेटल्याचा आनंद आहे.

          नगरमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून काम केलेले चंद्रकांत जावळे यांना नुकतेच पुणे मेट्रो पॉलेटीयनचे मुख्य कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती मिळाली आहे. याबद्दल बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेच्या वतीने त्यांचा माजी कुलगुरु डॉ.सर्जेराव निमसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी असोशिएशनचे अध्यक्ष  मच्छिंद्र पागीरे, संस्थापक जवाहर मुथा, माजी अध्यक्ष महेश गुंदेचा, सा.बा. कार्यकारी अभियंता जे.डी.कुलकर्णी, कार्यकारी अभियंता एस.डी.पवार, कार्यकारी अभियंता ए.व्ही.चव्हाण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता सानप, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, वल्ड बँक शाखेचे कार्यकारी अभियंता एन.एन.राजगुरू, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एन.डी. कुलकर्णी आदींसह बिल्डर असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

          यावेळी डॉ.सर्जेराव निमसे म्हणाले, तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर मोठा बदल होत असल्याने इंजीनियरिंग क्षेत्रातही बदल होत आहे. आपल्या येथील अभियंते जगाच्या तोडीसतोड उत्कृष्ठ काम करत आहेत. मात्र कामांचा वेग कमी आहे. सरकारी योजनेतील कामे दर्जेदारच झाली पाहिजे. सरकारी अधिकारी, अभियंते व ठेकेदार यांनी एकाच विचाराने काम केलेतर विकासकामे दर्जेदार होतील.

          यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एन.डी. कुलकर्णी यांनी चंद्रकांत जावळे यांचा सत्कार करून गौरोद्गार काढले. प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण यांनी नगर जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेतला.

          प्रास्ताविकात जवाहर मुथा यांनी बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेच्या वतीने होत असलेल्या कामाची माहिती दिली. सुत्रसंचलन निखील जगताप यांनी केले. अध्यक्ष  मच्छिंद्र पागीरे यांनी मानले. यावेळी सदस्य अनिल कोठारी, शरद मेहेर, डी.बी.जगताप, संजय गुंदेचा, दीपक दरे, मिलिंद वायकर आदींसह सदस्य उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करुन भिंगारला नगरपालिका स्थापन करावी 

अ‍ॅड. आर.आर.पिल्ले : पंतप्रधान, संरक्षणमंत्रीसह खासदार विखे यांना भिंगार काँग्रेसचे साकडे

   वेब टीम नगर :  अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्ड पूर्ण बरखास्त करुन भिंगारला नगरपालिका स्थापन करावी, अशी मागणी अ.नगर कॅन्टोमेंट बोर्डचे भुतपूर्व व्हाईस प्रिसिडेंट अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांनी केली आहे. नगर कॅन्टोमेंट बोर्डच्या विद्यमान सदस्याचे अधिकार संपुष्टात येऊन बोर्डची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत बोर्ड अध्यक्ष आणि प्रशासन बोर्डचा कारभार पाहावा, असा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे बोर्ड पूर्ण बरखास्त झाले नाही, असे नमूद करुन अ‍ॅड.पिल्ले यांनी भिंगारसह देशातील सर्वच कॅन्टोमेंट बोर्ड पूर्ण बरखास्त करुन त्या-त्या ठिकाणी नगरपालिकेची स्थापना करावी, अशी मागणी करणारे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि खासदार डॉ.सुजय विखे पा. यांच्यासह संबंधित कॅन्टोमेंट बोर्डाच्या लोकसभा मतदार संघातील खासदारांना पाठविले आहे.

     अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्ड पूर्ण बरखास्त करुन भिंगारला नगरपालिका स्थापन करावी, अशी मागणी भिंगार काँग्रेस कमिटी गेल्या ५० वर्षांपासून सातत्याने करत आहे. आजपर्यंत या मागणीचा पाठपुरावा भिंगार काँग्रेसच पुढाकार घेऊन करत असून, भिंगार परिसराच्या विकासासाठी आता बोर्ड बरखास्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी भिंगारकरांचा अंत पाहू नये, असे निवेदनात म्हटले आहे.

     भिंगार काँग्रेस कमिटीच्यावतीने कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड.पिल्ले यांच्यासह काँग्रेस सेवा दल महिला शहर जिल्हा अध्यक्ष सौ.अलकाताई बोर्डे, प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य शामराव वाघस्कर, सदस्य रिजवान शेख, महिला अध्यक्षा मार्गारेट जाधव, महिला काँग्रेस सेवा दल अध्यक्ष किरणताई आळकुटे, काँग्रेस सेवा दल अध्यक्ष संतोष फुलारी, अनिल परदेशी, अनिल वराडे, अ‍ॅड.साहेबराव चौधरी, रमेश त्रिमुखे, जालिंदर आळकुटे, नवनाथ वेताळ, संजय छत्तीसे, संतोष धीवर, संतोष कोलते, संजय खडके, संजय झोडगे, निजाम पठाण, दिपक लोखंडे, राहुल काळे, सुभाष त्रिमुखे, संतोष कांबळे, लक्ष्मण साखरे, सौ.मंदाकिनी हौडगे, फिरोज खान , सोपान साळूंके आदिंच्या सह्या या निवेदनावर आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सन १९७८ मध्ये देशाचे सरसेनापती कै.अरुण वैद्य अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्डचे अध्यक्ष असतांना कॅन्टोमेंटबोर्ड पूर्ण बरखास्त करण्याचा ठराव मंजूर करुन केंद्र सरकारला पाठविला होता, त्यात सदर बाजारसहीत भिंगारला स्वतंत्र नगर पालिका स्थापन करावी, असा तो ठराव होता. त्यानंतर सन १९९१ मध्ये खा.शरद पवार संरक्षण मंत्री असतांना अ‍ॅड.पिल्ले त्यावेळी कॅन्टों.बोर्डचे उपाध्यक्ष होते. त्यावेळचे खासदार यशवंंतराव गडाख पा. त्यांच्यामार्फत दिल्ली येथे कॅन्टों.बोर्डाच्या विकासाबाबत अधिकृत बैठक आयोजित केली होती, त्यावेळी दिल्ली, पुणे, नगर येथील सर्व लष्करी अधिकारी उपस्थित होते. तेव्हा अ‍ॅड.पिल्ले यांनी कॅन्टो.बोर्डच्या अडचणी मांडत असतांना शरद पवार यांनी सांगितले की, माझ्या मतदार संघात तीन कॅन्टों.बोर्ड असल्याने त्यांच्या सर्व अडचणी मला माहित आहेत. यावर रामबाण उपाय म्हणजे सर्व कॅन्टों.बोर्ड बरखास्त करुन तेथे नगर पालिका करण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तत्कालीन खासदार (पुणे) यांच्या विरोधामुळे त्याची अंमल बजावणी होवू शकली नाही, अन्यथा त्यावेळीच सर्व कॅन्टों.बोर्ड कार्य क्षेत्रात नगरपालिका अस्तित्वात आल्या असत्या.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालबाह्य कायदे रद्द करण्याचे धोरण राबविले असल्याने ब्रिटीशकालीन कॅन्टों. बोर्ड बरखास्त करुन त्याऐवजी नगर पालिका आस्तित्वात आणाव्यात. कॅन्टों.बोर्डाचा कायदा कालबाह्य झाला असून, तो रद्द करण्यात यावा, असे नमूद करतांना निवेदनात म्हटले आहे. देशातील६२पैकी ५६ कॅन्टों. बोर्डच्या लोकनियुक्त सदस्यांची मुदत संपुष्टात आली तर ६कॅन्टों. बोर्डचे कामकाज सुरु आहे. नजिकच्या काळात यासर्व ठिकाणी निवडणुका होणार आहेत. संसदेत कॅन्टों. बोर्ड कायदा दुरुस्तीवर यंदा चर्चा आहे. त्या निर्णयानंतर या ठिकाणी निवडणुका घेणार की बोर्ड पूर्ण बरखास्तीचा निर्णय होणार याकडे सद्या सर्वांचे लक्ष आहे.  सद्या कॅन्टों.बोर्ड कायदा दुरुस्ती झाली नसल्याने बोर्डाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यावर्षी बोर्ड कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्यात येणार आहे, त्यावेळी संसदेने दुरुस्ती मंजुर न करता देशातील सर्व कॅन्टों.बोर्डच पूर्ण बरखास्तीच्या मागणीचा ठराव मंजूर करण्यात यावा. संसदेच्या वरिष्ठ पातळीवर कॅन्टों.बोर्ड बरखास्तीचा विचार सुरु असल्याने ही संधी साधून संबंधित खासदारांनी बोर्ड बरखास्तींचा ठराव मांडवा. व पक्षविरहित सर्व खासदारांनी या ठरावाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

     तत्कालीन ब्रिटीशांनी त्या काळात लष्करी हद्दीत नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी कॅन्टों.बोर्डची स्थापना केली होती. परंतु आता लष्करी हद्दीनजिक लोकवसाहती वाढत असल्याने या  वसाहतीतून सुविधा पुरविल्या जात आहे, त्यामुळे आता कॅन्टों.बोर्डची गरज राहिलेली नाही. नगरसह राज्यात 7 सह देशात 62 कॅन्टों.बोर्ड अस्तित्वात आहे. अ.नगर (कॅन्टों.बोर्ड) भिंगार, पुणे कॅन्टों.बोर्ड (पुणे कॅम्प), खडकी कॅन्टों.बोर्ड (जि.पुणे), देहुरोड कॅन्टों.बोर्ड (जि.पुणे), देवळाली कॅम्प कॅन्टों.बोर्ड (जि.नासिक), नागपूर कॅन्टों.बोर्ड (कामटी जि.नागपूर) आणि औरंगाबाद कॅन्टों.बोर्ड ही सात बोर्ड राज्यात आहेत.

     खा.विखे सह खासदार सर्वश्री सदाशिव लोखंडे,  गिरिष बापट, डॉ.अमोल कोल्हे,  हेमंत गोडसे, इम्तीयाज जलिल, ना.नितीन गडकरी, सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते खा.शरद आदींना निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अक्षत कांदोलकर ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये चमकला

    वेब टीम नगर : अक्षत अमित कांदोलकर या सहा वर्षाच्या मुलाने सूर्यमालेविषयी ज्ञानाच्या जोरावर ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नुकतेच नाव नोंदविले आहे. त्याने सूर्यमालेशी निगडीत ६० प्रश्‍नांची उत्तरे अवघ्या तीन मिनिट४०सेकंदात देत हे रेकॉर्ड  स्वत:च्या नावे केले.

     अक्षत याने सूर्यमालेविषयी पुस्तक, ऑनलाईन व्हिडिओ व अवकाशाचे निरिक्षण अशा वेगवेगळ्या स्तरावरुन ज्ञान संपादन केले. या चिमुकल्याने ‘नन्हा ग्यान फाऊंडेशन’च्या फेसबुक पेजवर नुकतेच ३० मिनिटाचे व्याख्यान सुद्धा दिले आहे.

     अक्षत सध्या बचपन प्ले स्कूल या प्राथमिक शाळेत युकेजीमध्ये शिकत आहे. त्याच्या रेकॉर्डबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मुस्कान सचदेव व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. अक्षतचे वडिल अमित कांदोलकर हे इन्फोसिस, पुणे येथे कार्यरत आहेत तर आई सीमा कांदोलकर या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आंबी खालसा येथे काळीआई ताबा पडताळणी सत्यबोधी सुर्यनामा

दहशतीने आदिवासी बांधवांची जमीन बळकावणार्‍यांच्या विरोधात : सेवानिवृत्त आरटीओ व जलसंधारण कृषी अधिकारी दहशतीने जागा बळकावत असल्याचा आरोप

वेब टीम नगर: दहशतीने आदिवासी बांधवांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणार्‍या सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्‍यांवर  कारवाई करण्याच्या मागणीसह आंबी खालसा (ता. संगमनेर) येथील पिडीत आदिवासींना न्याय मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने काळीआई ताबा पडताळणी सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.  

आंबी खालसा येथील गट नं. ४७९ व ४८४ मध्ये नाथा गावडे, पुन्हाजी गावडे व शिवाजी गावडे हे तिन्ही भाऊ व त्यांचे दोन पुतणे सुभाष व राजेंद्र गावडे यांच्या ताब्यातील १५ एकर जमीनी मधील पाच एकर जमीनीचा ताबा गावातील सेवानिवृत्त आरटीओ व जलसंधारण कृषी अधिकारी असलेल्या दोन्ही भावांनी दहशतीने घेण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. गावडे यांचे शेजारी असलेले अण्णासाहेब मते, बाळासाहेब मते व अरुण मते यांच्या जमीनीतील अडीच एकर जमीन देखील घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सदरील सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्‍यांनी भ्रष्टाचाराने कोट्यावधीची संपत्ती कमवली आहे. तर त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर अनेक जमीनी घेतल्या असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

आदिवासी बांधवांच्या शेतजमीनीत डाळिंब बाग व गव्हाचे उभे पिक असताना कायदा हातात घेऊन सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी सर्वसामान्य आदिवासी बांधवांच्या जमीनीवर दहशतीने कब्जा प्रस्थापित करु पाहत आहे. तसेच मते यांच्या जमीनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आदिवासी बांधवांची जमीन दहशतीने बळकावणार्‍यावर कारवाई करुन पिडीतांना न्याय मिळण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी व संगमनेर प्रांत व तहसिलदारांना पाठविण्यात आले आहे. आंबी खालसा येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये दि. १४ मार्च रोजी काळीआई ताबा पडताळणी सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रदुषण नियंत्रणासाठी सीएनजी अ‍ॅटो रिक्षा एक चांगला पर्याय 

आ.संग्राम जगताप : बजाजच्या सीएनजी अ‍ॅटो रिक्षाचे वितरण

वेब टीम नगर : प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीकोनाने नव्याने आलेल्या बजाजच्या सीएनजी अ‍ॅटो रिक्षाचे वितरण नगर औरंगाबाद महामार्ग, शेंडी-पोखर्डी येथील बजाजच्या जीत मोटर्स शोरुममध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी शोरुमचे संचालक अभिमन्यू नय्यर, इंद्रजीत नय्यर, अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायतचे अध्यक्ष वैभव जगताप, राष्ट्रवादीचे युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, जनक आहुजा, राजीव बिंद्रा, अनिश आहुजा, जतीन आहुजा, अनुज बिंद्रा, रितेश नय्यर, सागर पवार, आफ्रिदी सय्यद, गुलाम दस्तगीर, सागर काळभोर, विजय शेलार, फैरोज तांबोली आदी उपस्थित होते.

संग्राम जगताप म्हणाले की, प्रदुषण नियंत्रणासाठी सीएनजी अ‍ॅटो रिक्षा एक चांगला पर्याय पुढे आला आहे. नगर शहरात सीएनजी पंम्प देखील सुरु होत आहे. पेट्रोलचे भाव गगनाला भिडत असताना डिझेल देखील महाग होत आहे. महागाईत पर्याय म्हणून सीएनजी कमी दरात उपलब्ध होणार असून, मायलेज अधिक असल्याने रिक्षा चालकांची एकप्रकारे बचत देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शोरुमचे संचालक अभिमन्यू नय्यर म्हणाले की, पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहता सीएनजी अ‍ॅटो रिक्षांना चांगली मागणी आहे. अधिक मायलेज व कमी प्रदुषण होत असल्याने ही रिक्षा चांगला पर्याय म्हणून समोर आली आहे. सीएनजी मध्ये बजाज आरई व बजाज मॅक्सिमा झेड हे दोन मॉडेल उपलब्ध असून, दोन्ही मॉडेलचे अंदाजे ४३ ते ४५ प्रति कि.मी. मायलेज आहे. या अ‍ॅटो रिक्षांना एक आकर्षक लूक उपलब्ध करुन अद्यावत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तीन वर्षाची वॉरंटी कंपनीने दिली आहे. रिक्षा पाहण्यासाठी शोरुममध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खड्डेमय शहराची प्रतिमा बदलण्यासाठी रस्त्यांचे काम सुरु

आ. संग्राम जगताप : राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या शहर सरचिटणीसपदी शाहरुख शेख यांची नियुक्ती

वेब टीम नगर : अल्पसंख्यांक समाजाला प्रवाहात आनण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरु आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन, युवकांना दिशा देण्याबरोबर शहराच्या विकासात्मक दृष्टीकोनाने कार्य सुरु आहे. खड्डेमय शहराची प्रतिमा बदलण्यासाठी विकास आराखड्यातील सर्व रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले असून, नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध होणार आहे. राष्ट्रवादीत युवकांची शक्ती एकवटली असून, शहराचा विकासात्मक बदल घडणार असल्याची भावना आ.  संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शहर सरचिटणीसपदी शाहरुख करीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार जगताप यांच्या हस्ते शाहरुख शेख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, ओबीसी सेलचे अमित खामकर, राजेश भालेराव, नीलेश इंगळे, सिध्दार्थ आढाव, शहानवाझ शेख, वसीम शेख, अब्दुल खोकर, सुफीयन शेख, सरफराज कुरेशी, सलमान शेख, नदीम शेख, अन्वर शेख, सोहेल सय्यद, सिराज शेख, शाहरुख शेख, जैद सय्यद, इमरान शेख, सलमान शेख, अबुजर राजे, ईस्माइल शेख, अस्लम सय्यद आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार म्हणाले की, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाजातील प्रश्‍न सोडविण्यास कटिबध्द आहे. विकासात्मक व्हिजन व युवकांना काम करण्याची संधी मिळत असल्याने शहरासह जिल्हा पातळीवर युवक राष्ट्रवादीशी जोडला जात आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरातील युवक विकास हा अजेंडा समोर ठेऊन कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नूतन पदाधिकारी शाहरुख शेख म्हणाले की, नेतृत्व सक्षम असल्यास विकासाला चालना मिळते. नेतृत्वाअभावी शहराचा विकास खुंटला होता. संग्राम जगताप यांच्या रुपाने विकासाला चालना मिळाली. नगरकरांना एक चांगले विकासाचे व्हिजन असलेला नेता मिळाला असून, शहराची विकासात्मक दृष्टीने वाटचाल सुरु आहे. तर युवकांना काम करण्याची संधी देखील मिळत असल्याची भावना व्यक्त केली. या नियुक्तीबद्दल शाहरुख शेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इंधन दरवाढीला केंद्र सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार 

दिलीप सातपुते : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

बैलगाडीत रस्त्यावर येऊन केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल

वेब टीम नगर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बैलगाडीवर येऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर इंधन दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करुन मोदी प्रणित केंद्रातील भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, श्याम नळकांडे, संदेश कार्ले, मदन आढाव, अमोल येवले, गिरीश जाधव, भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, गणेश बोरूडे, गणेश कवडे, दत्ता जाधव, शरद झोडगे, संजय आव्हाड, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दिलीप सातपुते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे अवाजवी पद्धतीने दरवाढ केली आहे. सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत असताना इंधन दरवाढीने आनखी महागाईचा भडका उडाला आहे. कोरोनाच्या संकटातून सावरताना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात विष कालवण्याचे पाप केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये इंधन दरवाढीचा भाव पन्नास टक्के होऊन खाली कोसळला असताना देखील भारतात पेट्रोल, डिझेलचे भावन गगनाला भिडले आहेत. इंधन दरवाढीला केंद्र सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर प्रमुख पदाधिकार्‍यांनी देखील आपल्या भाषणात केंद्रातील भाजप सरकारवर निशाना साधून, पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या खेळाडूची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड

वेब टीम नगर:  येथील अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा खेळाडू ओम बाबासाहेब करांडे याची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकतीच वेरुळ (जि. औरंगाबाद) येथे महाराष्ट्र राज्य सायकलिंग फेडरेशनच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत करांडे याने 16 वर्षाखालील गटात रौप्य पदक पटकाविल्याबद्दल त्याची दि.५ ते ८ मार्च दरम्यान पनवेल (मुंबई) येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

करांडे याने राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत २० किलोमीटरचे अंतर २९ मिनिटे ४३ सेकंदात पार केले. त्याला क्रीडा शिक्षक अरविंद आचार्य यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक संजय पडोळे, पर्यवेक्षक रवींद्र लोंढे, सुवर्णा वैद्य, अभिमन्यू डुबल यांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले. तर पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महापुरुषांच्या पुतळ्यांच्या विटंबनेचे प्रकार थांबविण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे लावावे

अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी

वेब टीम नगर : महापुरुषांच्या पुतळ्यांचे विटंबनेचे प्रकार महाराष्ट्रात घडत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्या जवळ सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, उपाध्यक्ष तालेवर गोहेर, महासचिव अ‍ॅड. सिद्धार्थ सोळंकी, जिल्हासचिव राहुल लखन, सामाजिक कार्यकर्ते पवन सेवक, विक्की करोलिया, विक्की वाणे, विनोद दिवटे आदि उपस्थित होते.

राष्ट्रीय महापुरुष हे देशाचे धरोवर आहेत. त्यांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांपासून नागरिकांना एक प्रकारे प्रेरणा मिळत असते. शहरात अनेक ठिकाणी विविध महापुरुषांचे पुतळे आहेत. महाराष्ट्रात सध्या काही समाजकंटक समाजात द्वेष पसरविण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करीत आहे. हे टाळण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्या जवळ सीसीटिव्ही कॅमेरे लावल्यास अशा समाजकंटकांना सहज पकडता येणार आहे. तर अशा प्रकाराला अळा बसणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्या जवळ सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments