नगरटुडे बुलेटीन २७-०१-२०२१

नगरटुडे बुलेटीन २७-०१-२०२१ 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पतसंस्थांना जिल्हा बँकेत प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे

 काका कोयटे : जिल्हा बँकेसाठी वसंत लोढा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

    वेब टीम  नगर : नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये सहकारी पतसंस्थांचा २५ टक्क्यांहून अधिक सहभाग आहे. मात्र अद्याप सहकारी पतसंस्थांना जिल्हा बँकेमध्ये प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. पतसंस्थांना प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी पतसंस्था चळवळी मधील उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.

     अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी बिगर शेती मतदार संघातून नाशिक पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या उपस्थितीत निवडणुक निर्णय अधिकारी उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, भाजपाचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, सचिन पारखी, अ‍ॅड.विवेक नाईक, महेश नामदे आदि उपस्थित होते.

     यावेळी वसंत लोढा म्हणाले, राज्यातील व जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशन, स्थैर्यनिधी सहकारी संघ व नाशिक पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून सातत्याने आंदोलनात्मक भुमिका घेऊन शासन दरबारी पाठपुरावठा करत आहेत. केलेल्या आंदोलनामुळे पतसंस्थांचे बहुतांशी प्रश्‍न मार्गी लागले आहेत. जिल्हा बँक आणि सहकारी पतसंस्था यांचे अतुट नाते आहे. मात्र अद्याप जिल्हा बँकेमध्ये पतसंस्थांना एकदाही प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. यासाठीच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी करण्याचा निर्णय घेत बिगर शेती मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.वसंत लोढा यांनी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती करुन उमेदवारी अर्ज दाखल केला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महेश सातपुते यांच्या पर्यावरणपुरक पेन्सिलचे खा.शरद पवारांच्या हस्ते लॉचिंग

   वेब टीम नगर : शहरातील सिव्हिल इंजिनिअर तसेच उद्योजक महेश सातपुते यांनी कागद व वेलवेट पासून वहीवर लिहिण्याची पेन्सिल तयार करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. नुकतेच नगरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते अक्षर नंदिनी एंटरप्राइजेस अंतर्गत नंदिनी पेन्सिलचा लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी  पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, दादाभाऊ कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

     अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात असा प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे. या पेन्सिलच्या उपयोग लोअर केजी पासून सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्ट यांना अत्यंत उपयोगी पडणारी व गरजेची वस्तू बनवण्याचा अभिनव प्रयोग सिव्हिल इंजिनिअर महेश सातपुते यांनी यशस्वी केला आहे. स्वतः महेश सातपुते हे सिव्हिल इंजिनिअर आहेत. कागद वेलवेट पासून पेन्सिल तयार केल्यामुळे प्रदूषण चांगले राहण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. कागदापासून पेन्सिल तयार केल्यामुळे वृक्षतोड थांबेल व प्रदूषण कमी होईल असं त्यांचं मत आहे. या पेन्सिलमध्ये विविध प्रकार आहेत पॉलिमर पेन्सिल, वेलवेट पेन्सिल अशा प्रकारचे विविध प्रकारचे व्हरायटीज आहेत, पण त्यांनी प्रदूषण थांबण्यासाठी कागद पेन्सिल बनवण्याचा ध्यासच घेतला होता.

     याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या पर्यावरणपूरक पेन्सिलचे कौतुक करुन अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाचा र्‍हास थांबून नवनवीन उद्योगांना चालना मिळेल, असे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हा बँकेत शिवसेनेचे संचालक असणे आवश्यक

 सदाशिव लोखंडे : जिल्हा बँकेसाठी शिवसेनेचे  उमेदवारी अर्ज दाखल

वेब टीम नगर : नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये कायमच शिवसेनेच्यावतीने सहकार्य केले आहे. शेतकर्‍यांची बँक म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. त्यामुळे शिवसेनेने कधीही या बँकेबाबत राजकारण केले नाही. राज्यात शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतही शिवसेनेचे संचालक असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या कारभारात आता शिवसेनाही सक्रीय आहे. त्यासाठीच आता शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. या उमेदवारांना अनेकांचे पाठबळ मिळणार असल्याने ते विजयी होतील, असा विश्‍वास शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.

     जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने खा.सदाशिव लोखंडे यांनी अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून, सौ.अनिता रमाकांत गाडे यांनी महिला राखीव मतदार संघातून, माजी महापौर भगवान फुलसौंदर इतर मागासवर्गीय मतदार संघातून तर पारनेर सेवा सोसायटी मतदार संघातून रामदास भोसले यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी दिग्वीजीय आहेर यांच्याकडे दाखल केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, जि.प.सदस्य संदेश कार्ले, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, अनिल शिंदे, संतोष गेनप्पा, गणेश कवडे, काशिनाथ दाते, दत्ता जाधव आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

     याप्रसंगी प्रा.शशिकांत गाडे म्हणाले, राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आहे. राज्य सरकारच्या अनेक योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांपर्यंत पोहचविल्या जातात. ग्रामीण भागातील नागरिकांचा  शिवसेनेला पाठिंबा मिळत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेने भरघोस यश मिळविलेले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे.

     याप्रसंगी भगवान फुलसौंदर म्हणाले, शेतकर्‍यांचे, नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शिवसेना कायमच तत्पर असते. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले गेले. त्यामुळेच शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली होती. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा बँकेत शिवसेनेचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे, त्यासाठी या निवडणुकीत शिवसेना सक्रिय उतरली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संविधानाने दिलेले अधिकार काढून घेण्याचा मोदी सरकारचा डाव देशवासीय हाणून पाडतील

 किरण काळे  : प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस कार्यालयात झेंडावंदन संपन्न

वेब टीम नगर : सबंध भारतात प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडत असताना दिल्लीमध्ये शेतकरी बांधवांनी आंदोलनाला आज तीव्र स्वरूप दिले. भारतीय संविधानाने दिलेले अधिकार काढून घेण्याचा मोदी सरकारचा डाव देशातील शेतकरी आणि देशवासीय एकजुटीने हाणून पाडतील, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष काळे यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडले. यावेळी ते बोलत होते. झेंडावंदनापूर्वी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, माजी महापौर दीप चव्हाण, शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, काँग्रेसचे नेते फारुख शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. 

काळे म्हणाले की, भारताला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी लाखो-करोडो देशवासीयांनी बलिदान दिले. ब्रिटिशांची राजवट उलथवून लावली. पण सध्या मोदी सरकार हे आपल्या स्वकिय शेतकरी बांधवांच्या जीवावर उठले आहे. मागील सुमारे दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवरती काळे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी जगाचा पोशिंदा आपला शेतकरी बांधव तळ ठोकून आहे. 

अनेक शेतकऱ्यांचे यामध्ये प्राण गेले आहेत. आज मात्र शेतकऱ्यांचा बांध तुटला आणि दिल्लीमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आंदोलन हाताळत असताना मोदी सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी केलेली अमानुष मारहाण ही देशवासीयांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे, असे भावनिक उदगार यावेळी काळे यांनी काढले.

काँग्रेस पक्ष सुरवातीपासूनच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नगर शहरात देखील काँग्रेस पक्षाचे वतीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वेळोवेळी निदर्शने, आंदोलने, सत्याग्रह करण्यात आला आहे. संविधान हे सर्वोच्च असून त्याची कोणत्या परिस्थितीत पायमल्ली होऊ द्यायची नाही ही जबाबदारी काँग्रेस कार्यकर्ते समाजाला बरोबर घेऊन पार पाडतील, असा विश्वास यावेळी काळे यांनी व्यक्त केला.

सेवादल काँग्रेसच्यावतीने झेंडावंदन कार्यक्रमाचे संचलन कॅप्टन रिजवान शेख यांनी केले. यावेळी महिला सेवादलच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, एनएसयुआय शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, निजाम जहागीरदार, खलील सय्यद, अनंतराव गारदे, रियाज शेख, आय.जी. शहा, मोहनराव वाखुरे, सुजित जगताप, साहिल शेख, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, प्रा.डॉ.बाळासाहेब पवार, नलिनीताई गायकवाड, नीता बर्वे, सुनिता बागडे, जरीना पठाण, उषा भगत, शबाना सय्यद, शिक्षक काँग्रेसचे प्रसाद शिंदे, दानिश शेख, ॲड.चेतन रोहकले, ॲड.अजित वाडेकर, अन्वर शेख, मुबीन शेख, गणेश आपरे, प्रशांत वाघ, शंकर आव्हाड, सिद्धेश्वर झेंडे, ॲड. सुरेश सोरटे, डॉ.साहिल सादिक, नासिर बागवान, अजय मिसाळ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मनुष्यास ऑक्सिजनरूपी जीवन देण्याचे कार्य वृक्ष करतात 

डॉ. अनिल बोरगे : हरित, स्वच्छ शहर व मतदार जागृतीवर कार्यशाळा युवक-युवतींमध्ये जागृती

वेब टीम नगर : मनुष्यास ऑक्सिजनरूपी जीवन देण्याचे कार्य वृक्ष करतात. सजीवसृष्टीत वृक्ष पर्यावरण समतोल साधण्याचे कार्य करतात. वृक्षांची कत्तल झाल्याने निसर्गाचा समतोल ढासळला असून, वृक्ष रोपण व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. स्वच्छता व वृक्ष संगोपन ही एकमेकांना पूरक संकल्पना आहे. कोरोना महामारीच्या सद्यस्थितीत स्वच्छता हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. स्वच्छतेमुळे अनेक आजारांवर मात करता येते. स्वच्छ शहर, सुंदर हरित शहर (गाव) ही संकल्पना सर्वांच्या सहभागाने यशस्वी होणार आहे. यासाठी सर्व नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी केले.

नेहरू युवा केंद्र, अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जय युवा अकॅडमी, जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) आयोजित बुरुडगाव रोड येथील आयटीआय महाविद्यालयात हरित शहर स्वच्छ शहर (गाव) व राष्ट्रीय मतदार जागृतीवर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. बोरगे बोलत होते. रोपांना पाणी देऊन या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने, कासाचे प्रकल्प अधिकारी सुनील गायकवाड, आयटीआयचे प्राचार्य सुनील शिंदे, उपप्राचार्य व्ही.एम. प्रभूणे, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी आर.वाय. पवार, उदय सूर्यवंशी, मनपा वृक्ष अधिकारी उद्धव म्हसे, हरियालीचे सुरेश खामकर, मनपाचे मतदार दूत मंजू नवगिरे, पिचड, नागापुरे, आधारवडच्या अ‍ॅड. अनिता दिघे, पोपट बनकर, रजनी ताठे, डॉ.धीरज ससाणे, नयना बनकर, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, आरती शिंदे, अ‍ॅड. सुनिल तोडकर आदी उपस्थित होते.

मनपा मतदार दूत मंजू नवगिरे यांनी उपस्थित सर्वांना मतदार जागृतीची शपथ दिली. हरियालीचे सुरेश खामकर यांनी झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम राबविली तरच निसर्गाचा समतोल साधला जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीचे मूळ कारण वृक्षांची झालेली कत्तल आहे. चोवीस तास ऑक्सीजन स्वरुपात जीवन देण्याचे कार्य करणारे झाडांना जगविणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. सुनील गायकवाड यांनी 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीयांनी मतदार म्हणून नोंदणी करून मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. मतदानासाठी युवावर्गाने स्वतःहून पुढाकार घेतला तर खर्‍या अर्थाने लोकशाही सदृढ होणार आहे. चारित्र्यसंपन्न चांगल्या उमेदवारांना निवडून दिल्यास विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयटीआयचे उदय सूर्यवंशी यांनी युवकांनी कौशल्य विकास प्रशिक्षणबरोबर समाजातील सर्व चांगल्या घडामोडींमध्ये सहभाग घेऊन ज्ञान आत्मसात करण्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. अनिता दिघे यांनी केले. आभार अ‍ॅड.महेश शिंदे यांनी मांनले. कार्यशाळेसाठी केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्‍वर खुरांगे, रमेश गाडगे आदींचे मार्गदर्शन लाभले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पाणी प्रश्‍नी बिशप लॉईड कॉलनीच्या नागरिकांचा महापालिकेत ठिय्या

 युवक काँग्रेसच्या पुढाकाराने रिकामे हंडे घेऊन महिलांची निदर्शने

वेब टीम नगर : सावेडी येथील बिशप लॉईड कॉलनीत पाणी प्रश्‍न गंभीर बनला असताना स्थानिक नागरिकांनी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने महापालिकेत रिकामे हंडे घेऊन येऊन ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयुर पाटोळे, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, डॉ. रिजवान शेख, युवक काँग्रेसचे गणेश भोसले, योगेश काळे, देवेंद्र कडू, शिवाजी जाधव, रोहन काकडे, अमित थोरात, संगीता क्षेत्रे, पुष्पा जाधव, कांचन वाघमारे, सुनील वाघमारे, बी.बी. पगारे, रेखा अल्हाट, पुष्पा जाधव, कांचन वाघमारे आदींसह नागरिक उपस्थित होते.

बिशप लॉईड कॉलनीत पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असताना, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका या प्रश्‍नाकडे दखल घेत नसल्याने युवक काँग्रेसच्या पुढाकाराने स्थानिक नागरिकांनी आंदोलन करुन महापालिकेत जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी मनपा प्रशासन, नागरिक आणि कार्यकर्त्यांचा समन्वय साधून सदर प्रश्‍नावर लवकरच बैठक घेऊन पाणी प्रश्‍न सोडविण्याचे स्पष्ट केले. उपायुक्त प्रदीप पठारे यांनी निवेदन स्वीकारून पाणी प्रश्‍न सुटत नाही, तोपर्यंत सदर भागाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नेताजींनी प्रतिकुल परिस्थितीत दिलेला लढा प्रेरणा देणारा 

डॉ. महेश मुळे : निमगाव वाघात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

वेब टीम नगर : निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ. महेश मुळे यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, काशीनाथ पळसकर, दत्तात्रय जाधव, रामेश्‍वर चेमटे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, तुकाराम खळदकर, मयुर काळे, लहानबा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, नवनाथ फलके आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. महेश मुळे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा व योगदान अद्वितीय आहे. शत्रूंना जशास तसे उत्तर देण्यासाठी त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीत दिलेला लढा प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी नेताजींचा आदर्श समोर ठेऊन युवक-युवतींनी देश सेवेसाठी सैन्यात दाखल होण्याचे आवाहन केले. पै. नाना डोंगरे म्हणाले की, नेताजींच्या विचारातून ज्वाजल्य देशभक्तीची प्रेरणा मिळते. त्यांच्या रुपाने देशाला एक नेतृत्व मिळाले होते. इंग्रजांना देशातून पळवून लावण्यात त्यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका पार पाडली असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन चरित्रावर भाषण व कविता सादर केल्या.


Post a Comment

0 Comments