नगरटुडे बुलेटीन 24-01-2021

 नगरटुडे बुलेटीन 24-01-2021

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाळासाहेब ठाकरे यांनी समाजात परिवर्तन घडून आणले

 सुरेखा कदम : स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने माळीवाडा येथे अभिवादन 

    वेब टीम  नगर : बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत होते. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आत्मसन्मान जागृत करुन मानाचे स्थान मिळवून दिले. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढून त्यांचे हक्क मिळवून दिले. कोणत्याही सत्तेची लालसा न बाळगता, गोर-गरीबांचे प्रश्‍न सोडवा हा त्यांचा आदेश होता. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेकजण शिवसेनेशी जोडले गेले. सर्वसामान्यांची, सर्वसामान्यांसाठी अशी शिवसेनेची ओळख निर्माण करुन समाजात एक परिवर्तन घडून आणले. महिलांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले. आज मराठी माणूस जो ताठमानेने जगतो, ही त्यांचीच देण आहे. आपण त्यांचे हे ऋण कधीही विसरु शकत नाही, असे प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम  यांनी केले.

     हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे शिवसेनेच्यावतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर सुरेखा कदम, संभाजी कदम, दिलीप सातपुते, अनिल शिंदे, अभिषेक कळमकर, संजय शेंडगे, गणेश कवडे, योगीराज गाडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, श्याम नळकांडे, संग्राम शेळके, मदन आढाव, संतोष गेनप्पा, दत्ता कावरे, अमोल येवले, संग्राम कोतकर, सुनिल लालबोंद्रेे, दत्ता जाधव, दिपक खैरे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी अनिल शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे समस्त हिंदू समाजाचे हिंदूहृदय सम्राट होते. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मराठी अस्मिता जागृत करुन मराठी माणसाला मानाचे स्थान मिळवून दिले. शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. सर्वात जास्त काळ मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे बाळासाहेब ठाकरे होते. त्यांनी शिवसैनिकाची मोठी फळी तयार करुन तळगाळातील लोकांना मानाचे स्थान मिळवून दिले,

     याप्रसंगी दिलीप सातपुते, अभिषेक कळमकर, संतोष गेनप्पा आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. माळीवाडा येथे सजावलेल्या स्टेजवर बाळासाहेब ठाकरे यांची मोठी प्रतिमा लावून पूजन करण्यात आले. सर्वश्री  बबन शिंदे, सुरेश तिवारी, प्रकाश फुलारी, संजय छजलानी, रवी लालबोंद्रे, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, अ‍ॅड. संतोष गायकवाड, सागर गायकवाड, प्रविण बेद्रे, विष्णू थोरात, सागर शहाणे, आकाश हुच्चे आदिंसह अनेक नागरिकांनीही यावेळी या थोर नेत्यास अभिवादन केले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाळासाहेब ठाकरे हक्कासाठी लढण्याचे बळ देणारे प्रेरणास्थान

अशोकराव तुपे : श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने अभिवादन

   वेब टीम   नगर : महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय क्षेत्राबरोबरच मराठी मनावर दिर्घकाळ राज्य करणारे व्यक्तीमत्व म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणापेक्षा समाजकार्यावर भर देऊन त्यांनी समाजात होत असलेल्या अन्याया विरुद्ध लढा देऊन जनमाणसात चेतना जागविली. आपण करत असलेल्या कार्यातून समाजाचे भले झाले पाहिजे, त्यातून गरजूंना आधार मिळाला पाहिजे, ही शिकवण त्यांनी दिली. त्यामुळे धाडसी नेतृत्व म्हणून त्यांची मोठी ख्याती निर्माण झाली. आपल्या हक्कासाठी लढण्याचे बळ देणारे प्रेरणास्थान म्हणजे बाळासाहेब ठाकरे होय, असे प्रतिपादन श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे यांनी केले.

     श्री संत सावतामाळी युवक संघाच्यावतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, प्रदेश सोशल मिडिया प्रमुख दिपक साखरे, समता परिषद महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, डॉ.सुदर्शन गोरे, शरद कोके, शिवाजी जाधव, तुषार डागवाले, सुरेश इवळे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी दत्ता जाधव म्हणाले, बाळासाहेब ठाकरे म्हणजे धगधगती ज्वाला होती, त्यांचे विचार जहाल असले तरी समाजात जागृती करणारे होते. अशा थोर व्यक्तीमत्वाने आपले आयुष्य सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी वेचले. मराठी माणसाला मानाचे स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आज अनेक सामाजिक संस्था या त्यांच्या आदर्शनुसार काम करत आहेत. त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक राहतील.

     याप्रसंगी उपस्थितांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्यातील विविध प्रसंग सांगितले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पोपटराव पवार आदर्शपण जपणारे असे व्यक्तीमत्व 

 नितीन भुतारे :  मनसेच्यावतीने पद्मश्री पोपटराव पवार यांचा सत्कार

   वेब टीम नगर : देशातील खासदारांना मार्गदर्शन करण्याचा लाभ नगरच्या पोपटराव पवारांना मिळाला ही नगरकरांसाठी मोठी अभिमानास्पद बाब आहे. पोपटराव पवारांनी ग्राम विकासात जी क्रांती घडविली ती देशासाठी मार्गदर्शक अशी आहे, त्यामुळेच ते देशातही अशाप्रकारची क्रांती घडून गावे आदर्श व्हावीत, ही भुमिका आहे. आदर्श गावांची संकल्पना आपल्या गावातून सुरु करुन देशातील - राज्यातील गावांना मार्गदर्शन करुन गावे आदर्श करणारे पोपटराव पवार यांची जिद्द व मेहनत सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. निवडणुकीत आदर्शपण जपणारे अशा  व्यक्तीमत्वांचा सन्मान करुन त्यांच्या कार्यात आपण सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केले.

     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पद्मश्री पोपटराव पवार यांची हिवरे बाजारच्या ग्रामपंचायत  सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सचिव नितीन भुतारे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड.अनिता दिघे,  परेश पुरोहित आदि उपस्थित होते.

     सत्काराला उत्तर देतांना पोपटराव पवार म्हणाले, गावाचा विकास झाला पाहिजे या ध्येयाने आपण करत असलेले काम प्रामाणिकपणे सुरु केले, या कामात गावकर्‍यांनी साथ दिली, अशी एक-एक माणसे जोडत गेलो आणि पहाता पाहता गावाचा विकास झाला. इतर गावांनी आमच्या गावाचा आदर्श घेऊन आपआपली गावे आदर्शवत करत आहे. ही चळवळ अधिक व्यापक व्हावी, गावे स्वयंपूर्ण होऊन विकसित व्हावी, यासाठी आपला प्रयत्न आहे. निवडणूकीतील जय-पराजय हा आम्हा गावकर्‍यांसाठी महत्वाचा नसून गावातील प्रत्येक घटना ही इतरांना मार्गदर्शक व्हावी, अशा दृष्टीने काम करत आहोत. या कार्यात युवकांना पुढे यावे व आपला गावाच्या विकासात योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिवरे बाजार गावाचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी 

 संभाजी कदम : शिवसेनेच्यावतीने पोपटराव पवार यांचा सत्कार

  वेब  टीम नगर : आज कोणतीही निवडणुक म्हटली की चुरस ही आली, त्यातून होणारे हेवे-दावे, आरोप-प्रत्यारोप यातून मूळ विकासाचा मुद्दाच गायब होतांना दिसत आहे. परंतु पोपटराव पवार यांनी अनेक वर्षांपासून या सर्व गोष्टींना दूर ठेवून गावाचा विकास केला. गावातील प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास करुन त्यादृष्टीने नियोजन करुन एक आदर्श गांव निर्माण केले. या गावाचा बोलबाला जगभर झाला. अनेक मान्यवरांनी गावास भेट देऊन येथील आदर्श घेऊन गेले. अशा गावातील निवडणुकही आदर्शवतच झाली. हाच आदर्श इतर गावांनी घेऊन गावाच्या विकासात योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

     शिवसेनेच्यावतीने पद्मश्री पोपटराव पवार यांची हिवरे बाजार ग्रामपंचायतच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, दत्ता कावरे, शिवाजी कदम, विष्णू थोरात, प्रविण बेद्रे, संतोष तनपुरे, गणेश पादीर, दिपक पवार, दयानंद वाबळे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी पोपटराव पवार म्हणाले, गावातील प्रत्येकाच्या हाताला काम पाहिजे असते, परंतु निसर्ग आणि भौतिक अडचणीमुळे गावाच्या विकासाला खिळ बसत असते. परंतु या गोष्टीचा अभ्यास करुन त्यादृष्टीने पावले टाकून हिवरे बाजाराला सर्व गावकरांच्या साथीने आदर्शवत बनविले आहे. ही किमया एका दिवसात झाली नाही, तर सातत्य महत्वाचे होते. निवडणुक हा तात्पुरता भाग आहे. ती लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे. त्यादृष्टींचे ही निवडणुक झाली. विजय झालेले आणि सर्वच हे गावाच्या विकासात योगदान देणारे आहेत. या सत्कारामुळे आमच्या कार्यास बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमास सुरज देवतरसे, सागर पिंपळे, दिलीप हजारे, दिपक थोरात आदि उपस्थित होते. \

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चिंतामणी प्रेरणा पर्वात भारतश्री शशिकांत खिस्तींशी २५ रोजी संवाद

    वेब टीम  नगर : जगणं समृद्ध करणारा अनुभव... या अभुतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या ‘चितामणी आर्ट गॅलरी’, एमआयडीसीच्या ‘प्रेरणा’च्या दुसर्‍या पर्वाअंतर्गत सातवी मुलाखत होत आहे. लॉकडाऊनच्या नंतर पुन्हा प्रारंभ होत असलेल्या या उपक्रमात नगरच्या मातीतील सुपूत्र व नगर जिल्ह्यातील पहिले भारतश्री शरीर सौष्ठवपटू शशिकांतजी खिस्ती यांची प्रकट मुलाखतीचे आयोजन २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वा. एमआयडीसी येथील चिंतामणी आर्ट गॅलरी येथे संपन्न होणार असल्याचे संचालक चिन्मय सुकटनकर यांनी दिली.

     प्रतिकूल परिस्थितीत १९९१ साली शशिकांतजी खिस्ती यांनी आपल्या प्रचंड मेहनतीतून नगर जिल्ह्यात पहिल्या ‘भारतश्री’ खेचून आणला होता. हेच सातत्य त्यांनी पुढे चालू ठेवत खिस्ती हेल्थ क्लबच्या माध्यमातून हजारो युवकांना घडवित हे व्रत पुढे चालू ठेवले आहे. त्यांच्या अनुभवावर आधारित या प्रकट मुलाखतीत रसिक नगरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजिका शिल्पा रसाळ व संजय दळवी यांनी केले आहे.

     प्रेरणा अंतर्गत आजपर्यंत अनेक मान्यवरांच्या मुलाखती झाल्या आहेत. त्यामध्ये मिलिंद शिंदे, गिरिष कुलकर्णी, पवन नाईक, भुपाली निसळ, डॉ.अरुण मांडे, प्रमोद कांबळे, राजेंद्र व सुचेता धामणे, दत्तू भोकनळ, शेख शमिम  यासारख्या असंख्य नगरच्या मातीतून जगभरात आपले कर्तुत्व सिद्ध करणार्‍या मान्यवरांनी प्रेरणा व्यासपीठ समृद्ध झाले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च व होप फॉर चिल्ड्रेन या संस्थेच्यावतीने
भिंगार मध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत

     वेब टीम नगर : भिंगार येथील बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च व होप फॉर चिल्ड्रेन या संस्थेच्या संयुक्त विद्यमान गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. महिला पोलिस कर्मचारी पूनम पंडित व सुनिता आव्हाड यांच्या हस्ते या मुलांना वह्या देण्यात आल्या. यावेळी रेव्ह.फादर मनिष गायकवाड, होप फॉर चिल्ड्रेन संस्थेचे महेश रावत, जयेश परमार, अरूण साळवे, फादार बेनिइप्पन आदी उपस्थित होते.

     रेव्हरंड मनिष गायकवाड म्हणाले की, बिशप डॉ.के.पी.योहान्नन यांच्या मार्गदर्शनाखाली बिलिव्हर्स चर्च गोर-गरीब गरजूंना नेहमीच मदतीचा हात देत असते.  शालेय शिक्षण हे मुलांसाठी अतिशय महत्त्वाचे असते. त्यांच्या शिक्षणात अडचण येऊ नये, गरजू मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांना शालेय साहित्याची मदत देण्याचा हा उपक्रम राबविला, असल्याचे त्यांनी सांगितले.

     महेश रावत म्हणाले की, होप फॉर चिल्ड्रेन संस्थेने लॉकडाऊन काळात संपूर्ण देशभरात ६० हजारांहून अधिक गरजू मुलांना आधार देण्याचे काम केले. महाराष्ट्रातही २५ हजार मुलांना या काळात किराणा किट तसेच शालेय साहित्य देवून त्यांना उमेद देण्याचे काम केले आहे. जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्याचे उद्दीष्ट समोर ठेवून संस्था कार्यरत आहे.

     विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शालेय साहित्यामुळे त्यांच्या चेहर्‍यांवर समाधान झळकले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करुन, अशा उपक्रम नियमित होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 बेशिस्त वाहतुकी संदर्भात शिव राष्ट्र सेना  प्रजासत्ताकदिनी  पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार

     वेब टीम नगर : शहरातील राष्ट्रीय महामार्गातील अंतर्गत रस्ते यापासून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत चाललेला असून, शहरातील चौकातील बंद पडलेले सिग्नल व अनधिकृत थांबलेले वाहणे दिवसेंदिवस शहर विद्रुपीकरण करत असून, शहर एक मोठे खेडे दिसून येत आहे. याला संपूर्ण ट्राफिक डिपार्टमेंट जबाबदार आहे. त्यामुळे येत्या २६ जानेवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार असल्याबाबतचे निवेदन शिव राष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी पोलिस अधिक्षक यांना दिले आहे.

     या निवेदनात म्हटले आहे की, शहर सुरक्षा सप्ताह हा वाहतुक शाखेकडून राबविलेला जात आहे. परंतु वाहतुकीबाबत शहराची दैयनिय अवस्था झालेली आहे.  जी फोर व्हीलर वाहणे खरेदी करताना व त्याची पासिंग करताना वाहन मालकास आरटीओ ऑफिस वाहन धारकास ७/१२ उतारा मागते की त्याची फोर व्हीलर पार्किंग करत असतांना त्याच्या स्वत:च्या जागेत पार्किंग करावे या करीता. परंतु शहरात सर्रासपणे ट्रकापासून छोट्या वाहनांपर्यंत भर बाजारात व मोठ-मोठ्या ट्राफिक सिग्नलपाशी ही वाहणे दिमाखात उभी असतात. यांच्यावर ट्राफिक पोलिस कुठलिही कारवाई करत नाही. हे मोठे आश्‍चर्य आहे. गोर-गरीब नागरिकांना फक्त नियम दाखवून पावत्या फाडायचे काम चालू असते.

     तसेच  जड वाहतुकीला प्रवेश नसतांना सुद्धा ट्राफिक पोलिस ही वाहने दिवसा शहरात सोडतात व त्यामुळे आतापर्यंत ७०० ते ८०० बळी या वर्षाअखेर घेतलेले आहेत ही मोठी शहराची शोकांतिका आहे. तसेच शहरात मोठ-मोठ रस्त्यावर व चौकातील सिग्नलवर मोकाट, भटकी जनावरे एखाद्या लग्नाच्या वर्‍हाडा सारखी उभी असतात. त्यामुळे दुर्घटना होतात. ट्राफिक पोलिस हे फक्त बघ्याची भुमिका घेतात हे आश्‍चर्य आहे.

     तसेच शाळकरी मुलांची वाहतुक करणारे रिक्षा व बससे यांना कोणताच नियम नसून, मोठ्या संख्येने ही वाहतुक चालेली असते. तसेच हायवेच्या ठिकाणी मोठ-मोठी चाय स्पॉट व हॉटेल्स व गॅरेज हायवेला झालेले असून, याची सर्व पार्किंग रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, यामुळे सामान्य नागरिकाला जीव गमवावा लागत आहे. यासर्व गोष्टींमुळे शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने २६जानेवारी रोजी पालकमंत्र्याना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अल करम व हलीमा क्लिनिक तर्फे प्रजास्ताक दिना निमित रक्तदान शिबिराचे आयोजन

वेब टीम नगर : अल करम सोशल अँण्ड एज्युकेशन सोसायटी , अलकरम लँब मँटर्निटी अँण्ड नर्सिंग होम (डिलेव्हरी हाँस्पीटल) व मुकुंदनगर येथील हलीमा क्लिनिक यांच्या संयुक्त विधमाने प्रजास्ताक दिना निमित नालबंद खुट चौक येथे सकाळी ९ ते५ वाजे पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

लॉकडाऊन काळात रक्तदान शिबीरांची संख्या फार कमी झाली होती.पण रक्ताची मागणी तशिच होती. व गरजुंना फार अडचण होत होती. तयामुळे शासना तर्फे वारंवार रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. म्हणुन आपली जवाबदारी समजुन प्रजास्ताक दिनाच्या शुभ अवसर वर जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे. अधिक माहितीसाठी तौफिक तांबोळी यांच्याशी ९८६०७०८०१६ या क्रमांकावर संपर्क करुन किंवा समक्ष नांव नोंदणी करावी. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'टंगळ-मंगळ मोदी अन कारभार अनागोंदी'ची घोषणा

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने : भाजप प्रणित मोदी सरकार देशातील ज्वलंत प्रश्‍नांकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप

वेब टीम नगर : देशात बेकारी, महागाई, जातीय विषमता, महिलांवर वाढते अत्याचार व शेतकर्‍यांचे प्रश्‍न गंभीर स्वरुप धारण करीत असताना, या सर्व ज्वलंत प्रश्‍नांकडे डोळेझाक करणार्‍या केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकार विरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने टंगळ-मंगळ मोदी अन कारभार अनागोंदीची घोषणा देण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

घोषणांचे पाऊस पाडून केंद्रात भाजप सरकार दुसर्‍यांदा सत्तेवर आले मात्र केलेल्या घोषणांची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी झालेली नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर संघटनांनी त्यांना पाठिंबा दर्शवीत ही घोषणा केली आहे. केंद्रातील भाजप सरकारने शेतकर्‍यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली मात्र त्याची अंमलबजावणी केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात केली. मात्र जनतेच्या मनातील प्रश्‍न जाणून घेतला नाही. देशात शेतकर्‍यांचे आत्महत्या थांबविण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीवर आधारित शेतकरी संरक्षण कायदा असतित्वात आनण्याची गरज होती. कृषी दारिद्रय हटविण्याचा देशापुढे प्रमुख उद्दिष्ट असताना, प्रत्यक्षात काही कृती झाली नाही. दिल्ली येथे देशातील शेतकरी नवीन पारित करण्यात आलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करीत आहे. मात्र केंद्र सरकार त्यांची दखल घेण्यास तयार नाही. शेतकरी नेत्यांना फक्त चर्चेला बोलावून तारखा देण्यात आले. त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याने दोन महिन्यापासून हे आंदोलन सुरु आहे. देश प्रजासत्ताक झाला मात्र त्याची प्रचिती सर्वसामान्यांना आली नाही. देशात जनमताला किंमत दिली जात नसून, सत्ताधारी मनमानीपणे कारभार करीत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर वयाच्या ८३ व्या वर्षी आंदोलन करण्यास भाग पाडणे हा राज्यकर्त्यांचा पराभव असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्र सरकार ज्वलंत प्रश्‍न सोडून धार्मिक मुद्दा उपस्थित करीत नागरिकांच्या भावनेशी खेळत आहे. केंद्रातील सर्वच मंत्री आपल्या कामातून सर्वसामान्यांना न्याय न देता टोळवाटोळवी करीत आहे. एकंदरीत केंद्रातील मोदी सरकार टंगळ-मंगळ सरकार असल्याने देशात अनागोंदी माजली असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अमेरिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्पप्रमाणे देखील मोदींची गच्छंती अटळ असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. टंगळ-मंगळ मोदी अन कारभार अनागोंदीचा सुर्यनामा करण्यासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, वीरबहादूर प्रजापती, अशोक भोसले, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रजासत्ताकदिनी शहरातून निघणार ट्रॅक्टर तिरंगा रॅली



गावा-गावात  रॅलीचे आयोजन

वेब टीम नगर : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी अहमदनगरमधे ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढून दिल्ली किसान आंदोलनात सहभाग नोंदविण्याचा निर्णय अ.भा.किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आला. शनिवारी (दि.२३ जानेवारी) हमाल पंचायत येथे झालेल्या बैठकित ट्रॅक्टर तिरंगा रॅलीच्या तयारीचा आढावा घेऊन रॅलीचे नियोजन करण्यात आले. तर जिल्ह्यातील गावा-गावात ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढून व शेतकरी स्वत:च्या ट्रॅक्टरवर तिरंगा ध्वज लाऊन या आंदोलनात सहभाग घेणार आहे.

हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकिस संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाचे अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे, कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे, नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, आर्किटेक अर्शद शेख, संध्या मेढे, रामदास वागस्कर, बाळासाहेब सागडे, वैभव कदम, रविंद्र फुलसौंदर आदी उपस्थित होते.

दिल्ली येथे भारतभरातील शेतकरी संघटना आपल्या न्याय्य हक्कासाठी २६ नोव्हेंबर पासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे, वीज बिल विधेयक २०२० तसेच कामगार विरोधी संहिता रद्द होण्यासाठी ट्रॅक्टर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅलीचे मंगळवार दि.२६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ होऊन, पत्रकार चौकातील शहिद भगतसिंग स्मारक येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. या बैठकित सदर रॅलीसंदर्भात नियोजन करण्यात आले असून, या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याची माहिती अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे यांनी माहिती दिली.

दिल्ली येथील आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारबरोबर अकरा फेर्‍यांमध्ये चर्चा केली. मात्र केंद्र सरकारच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे हा प्रश्‍न सुटण्यास तयार नसल्याने दिल्लीसह देशाच्या विविध ठिकाणी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात १४७ आंदोलक शेतकर्‍यांचे बलिदान गेले आहे. त्यामुळे देशातील शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, भाजप वगळून सर्व राजकीय पक्ष, शेतकरी संघटनांनी या आंदोलनास सक्रीय पाठिंबा दिलेला आहे. या रॅलीत सहभागी होऊन दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांचा सत्कार

वेब टीम नगर : हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श गाव हिवरे बाजारचे प्रवर्तक तथा आदर्श गाव संकल्प व कार्य समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल विजयी झाल्याबद्दल प्रतिष्ठानतर्फे मन्सूर शेख यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अकलाख शेख, आफताब शेख, प्रियंका धारवाले, निलेश आगरकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोपट पवार म्हणाले की, आतापर्यंत हिवरे बाजारला निवडणुका बिनविरोध होत होत्या. या वेळी लोकांची इच्छा पाहून निवडणूका होऊ दिल्या. यामध्ये लोकांनी विकासाला शिक्कामोर्तब केले यातून आत्मपरीक्षण करता आले. या विजयाने पुढील कामाची दिशा निश्‍चित करण्यास मदत होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निमगाव वाघात विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेची जागृती

नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम : विद्यार्थ्यांना मास्क तर शाळेला सॅनीटायझरची भेट

वेब टीम नगर : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या जनजागृतीसाठी नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन मास्कचे वाटप करण्यात आले. तर शाळेला सॅनीटायझरची भेट देण्यात आली.

डॉ. महेश मुळे यांनी विद्यार्थ्यांना सदृढ व निरोगी आरोग्याचे महत्त्व पटवून, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. तर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनेची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, काशीनाथ पळसकर, दत्तात्रय जाधव, रामेश्‍वर चेमटे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, तुकाराम खळदकर, मयुर काळे, लहानबा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, नवनाथ फलके आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी शाळा सुरु होत असताना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. पै.नाना डोंगरे यांनी कोरोनाला न घाबरता त्याचे संक्रमण रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना लस आली असली तरी गाफील राहून चालणार नाही. ही महामारी हद्दपार करण्यासाठी जागृती व सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ पळसकर यांनी केले. आभार उत्तम कांडेकर यांनी मानले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वातंत्र्यासाठी नेताजींचा तर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्व. बाळासाहेबांचा लढा स्फुर्ती देणारा 

जालिंदर बोरुडे : 27 नागरिकांचा अवयवदानाचा संकल्प , फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

वेब टीम नगर : दुसर्‍यांसाठी जगणारी माणसे अजरामर होतात. नेताजी सुभाषचंद्र भोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर राष्ट्रभक्ती आजच्या पिढीला दिशादर्शक आहे. या महान व्यक्तींनी आपले आयुष्य इतरांसाठी वेचले.  देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेताजींचा तर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्व. बाळासाहेबांचा लढा स्फुर्ती देणारा असल्याची भावना फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी व्यक्त केली.

नेताजी सुभाषचंद्र भोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी बोरुडे बोलत होते. यावेळी जितेंद्र आढाव, वैभव दानवे, बाबासाहेब धीवर, किरण कवडे, सौरभ बोरुडे, तुषार मरकड, विठ्ठल राहिंज आदी उपस्थित होते.

नेताजी सुभाषचंद्र भोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबीरात फाऊंडेशनच्या वतीने नेत्रदान व अवयवदानबद्दल जनजागृती करण्यात आली. 27 नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला. त्यांचा फाऊंडेशनच्या वतीने अवयवदानाचे अर्ज भरुन घेण्यात आले. या शिबीरास परिसरातील ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. शिबीर यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सामाजिक आणि आर्थिक  प्रश्नांवर  तरुणाईने संघर्ष करावा : अण्णा हजारे.

वेब टीम नगर : आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी मागील २ महिन्यांपासून देशातील शेतकरी  रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे करोनाच्या  लॉकडाउन कालखंडात देशातील बालविवाह-मुली आणि स्त्रियांवरील अत्याचार , तरुणांची बेरोजगारी व्यसनाधीनतेसह त्यांचे मानसिक आरोग्याचे  वाढलेले जटील प्रश्न, यामुळे  देशातील  असंतोष शिगेस पोहोचला आहे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी अण्णा हजारे यांनी आज व्यक्त केले.या परिस्थितीला प्रतिसाद देत समग्र व्यवस्था परिवर्तनासाठी  अराजकीय स्वरूपाचा  सत्याग्रह तरुणाईने छेडावा, असे आवाहन श्री. हजारे यांनी तरुणाईला केले. अनाम प्रेम संस्थेच्या सत्यमेव जयते ग्राम प्रकल्पात २८व्या श्रमसंस्कार छावणी चा प्रारंभ आज हजारे यांच्या हस्ते झाला.

यावेळी जिनीव्हा (स्वित्झर्लंड) येथे जागतिक आरोग्य संघटनेसोबत  गेली २ दशके समर्पित कार्य करणाऱ्या सीमा उपळेकर, आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात पायाभूत योगदान देणारे पुणे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते विनायकराव खंडकर, पाणी फाउंडेशन चे नगर आणि नाशिक जिल्ह्याचे प्रमुख विक्रम फाटक , महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे माजी सदस्य संतोष शिंदे , आदी उपस्थित होते.या सर्वांनी विविध सत्रात तरुणाईशी संवाद केला.

राज्यस्तरीय श्रम संस्कार छावणीत १६ जिल्ह्यातून २२७ युवा कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तरुणाईला वाढते बालविवाह,मानसिक आरोग्य आणि समृद्ध गाव अभियान,या  विषयी च्या कार्यप्रेरणा देण्यासाठी संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले. २६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या छावणीत निम्मा दिवस सामूहिक श्रमदान केले जाते. छावणीत बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख ,बाल हक्क कार्यकर्ते आणि लेखक  हेरंब कुलकर्णी,  रस्त्यांवरील भटक्या बेवारस मनोरुग्णांवर उपचार आणि पुनर्वसन करणाऱ्या स्नेह-श्रद्धा प्रकल्पाचे प्रमुख डॉ. निरज आणि दीप्ती करंदीकर , पर्यावरण तज्ञ डॉक्टर विश्वंभर चौधरी, अ‍ॅड. शाम असावा, आदी  तरुणाईशी  संवाद करणार आहेत .

अनामप्रेम, अहमदनगर जिल्ह्याची  बाल कल्याण समिती , अहमदनगर चाईल्ड लाईन ,बाल विवाह रोखण्यासाठी कार्यरत सर्व सामाजिक सामाजिक संस्थांचे उडान अभियान ,श्रीगोंदा येथील विद्यार्थी सहाय्यक समिती, शेवगाव येथील उचल फाउंडेशन, कर्जत येथील स्नेहप्रेम, आदी संस्थानी एकत्र येऊन  या शिबिराचे आयोजन केले आहे. सेवाकार्यात प्रत्यक्ष वेळ देण्याची तयारी असलेल्या आणि शिबिर सहभागासाठी ऑनलाईन आवेदन देणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना  मुलाखत,संवाद अशा प्रक्रियेतून या शिबिरासाठी निवडले गेले.संपूर्ण राज्यात या बद्दलचा कृती कार्यक्रम या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबविला जाणार आहे.

यावेळी  सीमा उपळेकर यांनी अनुवादित केलेल्या मानसिक आरोग्य मार्गदर्शक ,या पुस्तकाचे विमोचन अण्णांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.अहमदनगर जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा अंतर्वेध घेणारे उडान, हे पुस्तक देखील या वेळी प्रकाशित करण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments