नगरटुडे बुलेटीन २१-०१-२०२१

 नगरटुडे बुलेटीन २१-०१-२०२१ 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गावे आदर्श करण्यावर लक्ष केंद्रित करणार

 पोपटराव पवार : श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने हिवरे बाजारच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

   वेब टीम नगर : हिवरे बाजारकडे आम्ही केवळ एक गाव म्हणून पाहत नाही तर अन्य गावांना दिशा देणारे ते केंद्र आहे.  त्यामुळे गावातील प्रत्येक घडणार्‍या घटनांना महत्व असते. १९९० पासून गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरु झाली. तेव्हा पासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही, मात्र यंदा प्रथमच गावकरी निवडणुकीला सामोरे गेले. यावेळी निवडणूक बिनविरोध होऊ शकली नसली, तरी निवडणूक कशी असावी, याचाही आदर्श घालून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. सर्वजण एकत्रित राहून गावाच्या विकासासाठी पुढाकार घेऊन योगदान देतील. त्याचबरोबर आता राज्यातील अन्य गावे आदर्श करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. श्री विशाल गणेशाच्या दर्शनाने एकप्रकारे त्याचा शुभारंभ करत असल्याचे प्रतिपादन आदर्शगांव हिवरे बाजारचे नवनिर्वाचित सदस्य पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

     आदर्श गाव हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांनी श्री विशाल गणेश मंदिर आरती करुन दर्शन घेतले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी नवनिर्वाचित सदस्य पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह सर्व सदस्यांचा देवस्थानच्यावतीने सत्कार केला. याप्रसंगी पुजरी संगमनाथ महाराज, देवस्थानचे विश्‍वस्त रामकृष्ण राऊत, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, ज्ञानेश्‍वर रासकर, चंद्रकांत फुलारी,  सौ.शोभाताई पवार आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, गाव कसे आदर्श असावे, याचे उत्तम उदाहरण म्हणून हिवरे बाजारकडे पाहिले जाते. हे गाव आदर्श बनविण्यात पोपटराव पवारांचा मोठा वाटा आहे. गेल्या ३०-३५वर्षांपासून गावात विकास कामांची गंगा आणून गावाचा चेहरा-मोहरचा बदलून टाकला आहे. आज अनेक देश-विदेशातील राजकीय, प्रशासकीय अधिकारी, पर्यटक या गावात झालेले विकास कामे पाहण्यासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे पोपटराव पवार यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराने नगर जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली आहे. या गावात झालेले निवडणुकही आदर्श लोकशाहीचे उदहारण होते. इतर गांवानी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या गावांचा विकास करावा, असे आवाहन केले.

     यावेळी रोहिदास पवार, स.या.पवार, एस.टी.पादीर, आर.के.चत्तर, मिना गुंजाळ, विमल ठाणगे, सुरेखा पादीर, रंजना पवार, मंगल पादीर, बबलू रोहोकले, रंगनाथ रोहोकले, राजेंद्र सातपुते आदिंचा देवस्थान विश्‍वस्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पाणी चोर तुपाशी नागरिक मात्र उपाशी !

अनाधिकृत नळ कनेक्शन त्वरित काढा : प्रभाग 2 मधील नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी

      वेब टीम नगर : नगर - औरंगाबाद रोडवरील वसंतनगर, रेणुकानगर, तवलेनगर, अभियंता कॉलनी, सूर्यनगर, एस.टी.कॉलनी, हिंमतनगर, लक्ष्मीनगर भागात पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीवर कमर्शियल व घरगुती नळ कनेक्शन अनाधिकृतपणे घेतल्याने प्रभाग २ मधील उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असून, बर्‍याच भागात पाणीच येत नाही. पाणी चोर तुपाशी व नागरिक मात्र उपाशी अशीच परिस्थिती सध्या आहे.

     याबाबत नागरिकांनी प्रभाग २ च्या नगरसेवकांना माहिती दिली असून, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार आदिंनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंता आर.जी.सातपुते यांची नागरिकांसमवेत बैठक घेऊन निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

     यावेळी एकनाथ खिलारी, नानासाहेब दातीर, सूर्यकांत झेंडे, वसंत सरमाने, प्रसाद कदम,  प्रसाद कराळे यांनी चर्चेत भाग घेऊन लक्ष्मीनगरसह उपनगरातील पाणी प्रश्‍न हा मुख्य जलवाहिनीवरील अनाधिकृत नळ कनेक्शनमुळे निर्माण झाला असून, तातडीने ही कनेक्शन काढा. आठ दिवसात जर कनेक्शन काढली नाही तर रस्तारोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.

     निवेदनाच्या प्रती मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह नगरसेवकांना दिल्या. अभियंता आर.जी.सातपुते यांनी याबाबत तातउीने पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. माजी नगरसेवक निखिल वारे यांनी मनपाने नागरिकांच्या मागण्या विचारात घेऊन त्वरित दखल घ्यावी, अन्यथा नागरिकांबरोबर आम्हाला देखील तीव्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल. प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणार्‍या लोकांना पाणी मिळालेच पाहिजे. पाणी चोरांवर कठोर कारवाई साठी मनपाने पावले उचलावी, असेही ते म्हणाले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

न्यायालयीन कामकाज, निकाल जास्तीतजास्त मराठी भाषेत देणार  

 न्यायाधीश नेत्रा कंक :  कौटुंबिक न्यायालयात मराठी संवर्धन कार्यशाळा उत्साहात संपन्न

वेब टीम  नगर : मराठी भाषेचा वापर कमी होत असल्यानेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व जागृती कार्यशाळेचे आयोजन करावे लागत आहे. मराठी आपली मातृभाषा असतानांही मराठीतून बोलण्यास आपल्याला न्यूनगंड का वाटावा ? इतर राज्य आपापल्या भाषांबद्दल अभिमान बाळगतात. मराठी भाषा आपण व्यवहारात वापरत नाही हे आपले दुर्दैव आहे. आपल्या लवचिक व सोप्या मराठी भाषेच्या संवर्धनाचे महत्व ओळखून सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीतजास्त वापर करावा, असे आवाहन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्रा कंक यांनी करून न्यायालयीन कामकाजात व निकाल देण्यात जास्तीतजास्त मराठीचा वापर व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले.         

          मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त येथील कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा जागृती कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानाहून न्यायाधीश नेत्रा कंक बोलत होत्या. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. भूषण बऱ्हाटे, न्यूआर्टस् कॉमर्स महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.मच्छिंद्र मालुंजकर, केंद्र सरकारचे वकील सुभाष भोर, अॅड. कल्याण पागर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

          ॲड. भूषण बऱ्हाटे म्हणाले, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयात बरेच कामकाज मराठी भाषेतून करण्यात येत आहे. आपल्या मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जवाबदारी आपलीच आहे. कौटुंबिक न्यायालयात झालेल्या जागृती कार्यशाळेत वक्त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले आहे.

प्रा.डॉ.मच्छिंद्र मालुंजकर यांनी मराठी भाषेचा इतिहास सांगून म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी बऱ्याच वर्षा पासुन प्रयत्न चालू आहेत. मराठी भाषेवर इतर भाषांनी केलेले अतिक्रमण थोपवण्याची जवाबदारी आपलीच आहे. न्यायमंदिरात मराठी भाषा संवर्धन व जागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबवला गेला आहे.

यावेळी  ॲड. कल्याण पागर यांचे मराठी भाषेचा न्यायालयीन वापर या विषयावर व्याख्यान झाले.  ॲड.सुभाष भोर यांचे मराठी भाषा संवर्धन व जागृती या विषयावर व्याख्यान झाले.

कार्याक्रमचे सुत्रसंचलन  ॲड. वृषाली तांदळे यांनी केले, आभार  ॲड. अभय राजे यांनी मानले. यावेळी पॅनल सदस्य  ॲड. शिवाजी कराळे,  ॲड.अनुराधा येवले,  ॲड.अशोक बऱ्हाटे,  ॲड. सुनील तोडकर,  ॲड.अनिता दिघे,  ॲड.भानुदास होले,  ॲड.प्रज्ञा हेंद्रे, कौटुंबिक न्यायालयाचे अधिक्षक नवाज शेख आदींसह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रभुरामाच्या मंदिर निर्मितीसाठी हिंदसेवा मंडळाचा खारीचा वाटा : जेष्ठ नेते ब्रिजलाला सारडा

 वेब टीम नगर : राष्ट्र एकात्मतेचे प्रतिक असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराशी देशातील कोट्यवधी जनतेच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. करोडो देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभुरामाच्या मंदिराचे काम सुरु झाले आहे. हिंदसेवा मंडळाने खारीचा वाटा उचलत मंदिर निर्माण कार्यात छोटासा हातभार लावला आहे, असे प्रतिपादन जेष्ठनेते ब्रिजलाला सारडा यांनी केले.

          अयोध्या येथील प्रभुरामाच्या भव्य मंदिर उभारणीच्या कामासाठी नगरच्या हिंदसेवा मंडळाच्या वतीने ५१ हजार रुपयाचा धनादेश श्रीराम मंदिर न्यास समितीचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाला सारडा, सह सचिव अशोक उपाध्ये, सुमतिलाल कोठारी, प्रा.मकरंद खेर, डॉ.पारस कोठारी, अनिल देशपांडे, मधुसूदन सारडा, रणजीत श्रीगोड, सचिन मुळे आदी उपस्थित होते. यावेळी मंडळाने दिलेल्या मदतीबद्दल गोविंदगिरी महाराजांनी समाधान व्यक्त केले.

          यावेळी प्रा. शिरीष मोडक म्हणाले, राष्ट्र भावनेने काम करणारी हिंदसेवा मंडळ ही शैक्षनिक संस्था राष्ट्र उभारणीच्या कार्यात हातभार लावत आहे. देशात राज्यात आलेल्या प्रत्तेक आपत्तीत मदत करत आहे.  अयोध्येतील प्रभूरामाचे मंदिर आता प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे या ईश्वरी कार्यात  मंडळ सहभागी होत मंदिर उभारणीस मदत केली आहे.

          सचिव संजय जोशी म्हणाले, हिंदसेवा मंडळाच्या माध्यमातून ज्ञान दानाचे कार्य करतांना विविध सामाजिक कार्यातही संस्थेचा उत्फूर्त सहभाग कायम असतो. प्रभुरामचे मंदिर होणे ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांची कोविड-19 आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आयोजन करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर अ.ए.सो.च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची कोविड-१९ आरटीपीसीआर तपासणी विद्यालयात करण्यात आली. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, लॅब इन्चार्ज डॉ.रश्मी पोखरणा, तसेच देविदास शेंडे, संजय वाकचौरे, प्रवीण अहिवाळे, विनायक इदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक संजय पडोळे, पर्यवेक्षक रवींद्र लोंढे, सुवर्णा वैद्य, अभिमन्यू डुबल आदिंसह अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ज्ञान व कौशल्य हीच खरी संपत्ती 

अ‍ॅड. धर्मा जपकर : नेप्ती विद्यालयात रंगली निबंध व चित्रकला स्पर्धा
व्याख्यानातून युवकांना प्रेरणा राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम

वेब टीम नगर : ज्ञान व कौशल्य हीच खरी संपत्ती असून, युवकांनी ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. विविध व्याख्यानातून युवकांना आपले ज्ञान वाढविता येते व स्वत:चा विकास साधता येतो. युवकांनी ध्येय समोर ठेऊन त्या दिशेने वाटचाल केल्यास यश निश्‍चित मिळणार असल्याचे प्रतिपादन श्री स्वामी अण्णा-हजारे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. धर्मा जपकर यांनी केले.

जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, नर्मदा फाउंडेशन व जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त श्री स्वामी अण्णा-हजारे शिक्षण संस्था संचलित नगर तालुक्यातील नेप्ती विद्यालयात निबंध व चित्रकला स्पर्धेसह व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अ‍ॅड. जपकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, नर्मदा फाउंडेशनचे अध्यक्ष ह.भ.प. सुनिल महाराज तोडकर, उडाण फाऊंडेशनच्या आरती शिंदे, द युनिव्हर्सलचे सागर अलचेट्टी, नयना बनकर, किरण सातपुते, प्रा. अश्‍विनी अनाप, रजनी ताठे, शाहीर कान्हू सुंबे, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, पोपट बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जपकर पुढे म्हणाले की स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ सर्वांसमोर आदर्श व प्रेरणादायी असून, या महान व्यक्तींचे विचार आत्मसात केल्याने बदल घडणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांसह युवकांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच व्याख्यानाच्या माध्यमातून युवकांमध्ये जागृती करण्यात आली. ह.भ.प. सुनिल महाराज तोडकर यांनी स्पर्धेमुळे युवकांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होऊन आपली क्षमता कळते. स्पर्धा या व्यक्तिमत्त्वाला चालना देण्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे आपली आकलन क्षमता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, बाबा भोर, तुळसा कदम, राधाताई वामन या शिक्षकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निबंध व चित्रकला स्पर्धेचे परीक्षण अ‍ॅड. भानुदास होले व प्रा. अश्‍विनी अनाप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण दळवी यांनी केले. आभार आरती शिंदे यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी जॉगिंग ट्रॅक खुले व्हावे

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने : भुईकोट किल्ला परिसरासह जॉगिंग ट्रॅकची साफ-सफाई करण्याची मागणी

वेब टीम नगर :  येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरासह जॉगिंग ट्रॅकची साफ-सफाई करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा अध्यक्ष अमोल भंडारे, मच्छिंद्र गांगर्डे, संतोष उदमले, अमित गांधी, दीपक गुगळे, शहबाज शेख, संतोष त्रिंबके, सुशील साळवे, लक्ष्मण साळे, बाळासाहेब धीवर, शाहिद सय्यद, वसीम शेख, श्रीपाद वाघमारे, किरण जावळे, संतोष टेमक आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भुईकोट किल्ला परिसरातील जॉगिंग ट्रॅक नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. सध्या क्रीडा मैदाने व इतर सार्वजनिक ठिकाण नागरिकांसाठी खुले झाले आहेत. भुईकोट किल्ला येथील जॉगिंग ट्रॅकचे निसर्गरम्य ठिकाण असून, येथे शहर व उपनगरातील नागरिक सकाळ-संध्याकाळ फिरण्यास व व्यायामासाठी येतात. सदर जॉगिंग ट्रॅक अनेक दिवसापासून बंद असल्याने त्याच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी या सर्व भागात गवत व झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले असून, ट्रॅकची मोठी दुरावस्था झाली आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सदर जॉगिंग ट्रॅक त्वरीत उघडण्याची गरज आहे. तत्पुर्वी भुईकोट किल्ला परिसरासह जॉगिंग ट्रॅकची साफ-सफाई करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अण्णा हजारे यांच्या आंदोलनात भारतीय देशभक्त पार्टी उतरणार : अ‍ॅड. शिवाजी डमाळे

वेब टीम नगर : शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी अण्णा हजारे यांनी दि.३० जानेवारी पासून आंदोलन करण्याची घोषणा केली असून, या आंदोलनास भारतीय देशभक्त पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी असलेल्या या आंदोलनात देशभक्त पार्टी सक्रीयपणे उतरणार असून, या संदर्भात अण्णा हजारे यांना पत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती देशभक्त पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी वायू सैनिक अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांनी दिली आहे.

 माजी सैनिक व देशभक्तांनी एकत्र येऊन सदर राजकीय पार्टीची स्थापन केली आहे. भारतीय देशभक्त पार्टीने राजकारणातील घराणेशाही व प्रस्थापितांविरोधात बंड केला असून, मागील अनेक वर्षापासून संघटनेच्या वतीने बौध्दिक चळवळ सुरु आहे. अण्णा हजारे यांच्या दिल्ली येथे लोकपालच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनास व राळेगणसिध्दी येथे झालेल्या आंदोलनात देखील पाठिंबा देऊन सक्रीय सहभाग घेतला होता. अण्णांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर पुकारलेल्या या जन आंदोलनास देशभक्त पार्टी उतरणार असून, दिल्ली येथून पार्टीचे अध्यक्ष माजी कर्नल परमार, कॅप्टन अरुण कदम, अ‍ॅड.योगेश जोशी यांनी देखील या आंदोलनास पाठिंबा दर्शविला असल्याचे अण्णांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे.

राजकारणातील बहुतेक राजकीय पक्षात अनेक गुंड व भ्रष्टाचारी प्रवृत्ती असल्याने जनहिताच्या प्रश्‍नासाठी प्रत्येक वेळी आंदोलन व संघर्ष करावा लागत आहे. सज्जन व निष्कलंक व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याकरिता व राजकारणातील स्वच्छता होण्यासाठी पार्टी प्रयत्नशील आहे. चांगले व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यास जनहिताच्या मागणीसाठी नेहमीच संघर्ष करावा लागणार नसल्याचे अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांनी म्हंटले आहे. तर शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीचा समावेश असलेला कायदा आनण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पार्टीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोनात मंदिर-मस्जिद बंद असताना माणुसकी धर्म प्रत्येकाने जपला 

अ‍ॅड. प्रणाली चव्हाण  : हळदी-कुंकू कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधात्मकतेची जनजागृती महिलांना वाण म्हणून मास्कचे वाटप 

वेब टीम नगर : हळदी-कुंकू कार्यक्रमात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेची जनजागृती करुन, महिलांना वाण म्हणून मास्कचे वाटप करण्यात आले. नुकताच बुरुडगाव रोड येथील सौरभ कॉलनीत महिलांचा हा पारंपारिक सोहळा एकमेकींच्या आरोग्याची काळजी घेत पार पडला. यावेळी अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, मनिषा भळगट, स्विटी लोढा, बजाज, सुनिता थिटे, दुर्गावती चव्हाण, निलीमा पाटकर,  आंधळे, मुथा, सोनाली गांधी, जिया सिंग, कदम, सातपुते, अ‍ॅड. सामलेटी, संध्या चव्हाण, डॉ.गौरी चव्हाण आदींसह महिला उपस्थित होत्या.

अ‍ॅड. प्रणाली चव्हाण म्हणाल्या की, कोरोनाने माणुसकी जागृक ठेऊन एकमेकांना सहकार्य करण्याचे शिकवले. मंदिर-मस्जिद बंद असताना माणुसकी धर्म प्रत्येकाने जपला व माणसात देव शोधण्यात आला. प्रत्येक सांस्कृतिक व धार्मिक कार्यास सामाजिक उपक्रमाची जोड असणे आवश्यक आहे. मराठी संस्कृती जपत व इतरांच्या आरोग्याची काळजी घेत हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित महिलांना कोरोना संक्रमण रोखण्यासाठी बचावात्मक उपाय योजनेसाठी मार्गदर्शन करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून मास्क ही अत्यावश्यक गोष्ट बनली असताना, महिलांना वाणच्या स्वरुपाता मास्कचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गावती चव्हाण यांनी केले. आभार डॉ. गौरी चव्हाण यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती उत्तर महाराष्ट्र मार्गदर्शक पदी कौसर शेख याची निवड.    

वेब टीम नगर : माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाउंडेशन अंतर्गत असलेल्या माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती च्या उत्तर महाराष्ट्र मार्गदर्शक म्हणून कौसर हुसेन बाबाकादरी शेख यांची निवड करण्यात आली

    राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे व राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे (देवा) यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाउंडेशन चे कार्य संपुर्ण भारतामध्ये सुरू आहे. सध्या महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये काम सुरू आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या फाउंडेशन अंतर्गत सध्या माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती, पोलीस मित्र समिती व चित्रपट कामगार समिती अशा तीन समिती चे काम चालू आहे.

     कौसर शेख हे अहमदनगर येथील आहे त्यांनी आतापर्यंत सर्व समाजातील तळागाळातील लोकांना एकत्र करून समाजाच्या अडीअडचणी सोडवत आहेत. मुळातच समाजसेवेची आवड आहे असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष महेश सारणीकर म्हणाले.

    उत्तर महाराष्ट्र मार्गदर्शक कौसर शेख याची निवड झाल्यानंतर अहमदनगर जिल्हाच नाही तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव आणि अहमदनगर जिल्ह्यात संघटन मजबूत करणार असल्याचे सांगितले व शेख यांच्या नेतृत्वाखाली लवकरच अहमदनगर जिल्हा व शहर कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे व निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेश सारणीकर, उपाध्यक्ष उमेश काशीकर, पुष्कर सराफ, तुळशीराम जांभूळकर, सरचिटणीस सखाराम कुलकर्णी, सचिव इद्रीस सिद्दिकी, संपर्कप्रमुख सुभाष भोसले, समन्वयक चांद शेख, मार्गदर्शक निजाम पटेल, पोलीस मित्र समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वजीर शेख आदींनी अभिनंदन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments