मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना, आरोग्य आहार (मकर संक्रांत विशेष)

 मूलमंत्र आरोग्याचा 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 

 त्रिकोणासन 


भूमिका -या आसनात शरीराची अवस्था काहीशी त्रिकोणा प्रमाणे होते म्हणून याला त्रिकोणासन असे म्हटले आहे. 

क्रिया- आसनस्थिती 

पूर्वस्थिती- दंडस्थिती 

१) डावा पाय उचलून जास्तीत जास्त डावीकडे नेऊन ठेवा. 

२) डाव्या पायाचा व डावीकडे श्वास घ्या. 

३) विश्वास सोडून डावा गुडघा दाखवा व डाव्या हाताचा तळवा डाव्या पायाच्या पाठीच्या बाजूने पूर्णपणे जमिनीवर टेकवून ठेवा. 

४) उजवा हात व उजव्या कानावरून सरळ पुढे न्या व श्वसन संथपणे चालू ठेवा 

आसनस्थिती सोडणे 

१) श्‍वास सोडा व श्‍वास घेत उजवा हात पूर्वस्थितीत आणा

 २) डावा गुडघा सरळ करून डावा हात पूर्वस्थितीला आणा

३)डावा पाय सरळ करा

४) डावा पाय जवळ आणून दंड स्थिती घ्या 

टीप -याप्रमाणे उजवा पाय उजव्या बाजूला लांब ठेवून हे आसन  करा त्यावेळी आवश्यक ते बदल करून घ्या 

आसनस्थिती- या आसनात उजवा हात मध्यम शरीर व उजवा पाय हे तीनही एका रेषेत सरळ ठेवून उजव्या हाताचा तळवा जमिनीकडे ठेवणे जरुरीचे आहे मान व कंबर या दोन्ही गोष्टी न वाकवता सरळ ठेवल्या पाहिजेत उजव्या हाताचा दंड उजव्या कानाजवळ राहील अशा पद्धतीने सरळ ठेवा यावेळी डावा गुडघा साधारणपणे काटकोनात वाढवावा लागतो.  डावा हात मात्र सरळ ठेवून त्याचा तर तळवा पुर्णपणे जमिनीवर टेकलेला ठेवा या अवस्थेत डाव्या  हातावर शरीराचा भार टाकला तरी चालेल किंबहुना तो भार डाव्या हातावरच येतो.  हे आसन  उजव्या बाजूला केले तरी हेच वर्णन लागू होते मात्र डाव्या उजव्या चा फरक करून घ्यायला हवा. 

 कालावधी -हे आसन  तसे सोपे आहे अर्थात याचे फायदे पण मर्यादित आहेत  हे आसन बराच वेळ सहज ठेवता येणे शक्‍य असले तरी तसे करणे फारसे फायदेशीर नाही.  साधारणपणे प्रत्येक बाजूस एक मिनिट पर्यंत हे असं स्थिर ठेवावे. 

 विशेष दक्षता 

या आसनात पाठीच्या कण्याचे व कमरेचे  विकार असणाऱ्यांनी याचा अभ्यास करण्यापूर्वी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार (मकर संक्रांत विशेष) 

भोगीची भाजी 

साहित्य :वांगी,गाजर, वालपापडी सर्व पाव किलो, २ शेवग्याच्या शेंगा,१ बटाटा,पावट्याचे दाणे आणि मटार १-१ वाटी, १ कांदा, २ टी स्पून लाल तिखट,२ टी स्पून काळा मसाला, २ टे.स्पून पांढरे तीळ भाजून कुटलेले,२ टे.स्पून भाजून कुटलेला सुक्या खोबऱ्याचा किस, २ डाव तेल,थोडी चिंच कोळून, चवीनुसार मीठ व गूळ. 

कृती : वांग्याचे व गाजराचे मोठे तुकडे करावेत.वालपापडी निवडून चिरून घ्यावी. कांदा बारीक चिरावा. पातेलीत २ डाव तेलाची,मोहरी,हिंग,हळद घालून खमंग फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांडा परतून घ्यावा व त्यात वांग, बटाटे व गाजराचे तुकडे घालून परतून घ्यावे.मटार व पावट्याचे दाणे घालावेत. शेवग्याच्या शेंगा सोलून २-२ इंची तुकडे करून घालावेत. पातेलीवर पाण्याचे झाकण ठेऊन भाजीला २ वाफा द्याव्यात.भाज्यांमध्ये चिंचेचा कोळ,मीठ,गूळ,लाल तिखट, काळा मसाला, कुटलेले तीळ व खोबरे घालावे. २ वाट्या पाणी घालावे. भाजी शिजे पर्यंत उकळू द्यावी. 

टीप :

* हि भाजी भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्याची प्रथा आहे. 

* आवडत असल्यास मटारऐवजी ओले हरभरे सोलून घालावेत. सुक्या खोबऱ्या सोबत ७-८ लसणाच्या पाकळ्या कुटून घालाव्यात.             

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गुळाची पोळी 

साहित्य : ४ वाट्या उत्तम पैकी किसलेला गूळ,१ वाटी डाळीचे पीठ,२ वाट्या तेल,अर्धे जायफल व ७-८ वेलदोड्याची पूड , अर्धी वाटी तीळ, ६ वाट्या  कणिक , चिमूटभर मीठ, १ वाटी मैदा, तांदळाची पिठी. 

कृती : तीळ खमंग भाजून कुटून घ्यावा.१ वाटी डाळीचे पीठ अर्धी वाटी तेलात भाजून घेणे.एका परातीत गुल,तिळाची पूड,गार झालेले भाजलेले डाळीचे पीठ, जायफळ,वेलदोड्याची पूड सर्व एकत्र करून चांगले मळून गोळा तयार करणे. 

६ वाट्या कणिक व १ वाटी मैदा, १ टे स्पून डाळीचे पीठ चाळून त्यात तेलाचे कडकडीत मोहन घालून घट्ट भिजवावे.कणिक २ तास भिजवल्यावर परत माळून घेणे व कणकेच्या पुरीपेक्षा मोठ्या लाट्या करणे. कणकेपेक्षा मोठी तयार गुळाची लाटी घेऊन कणकेच्या २ लाट्यात भरून कडेने दाबून घेणे.तांदळाच्या पिठीवर पोळी लाटून घ्यावी. 

सपाट तव्यावर मध्यम आचेवर पोळी दोन्ही बाजूने चांगली भाजावी. प्रत्येक पोलोई भाजण्या आधी तवा कापडाने किंवा कागदाच्या बोळ्याने पुसून  घ्यावा.पोळी तव्यावर हलक्या हाताने उलटावी. पोळीला कडा जास्त राहिल्या तर करंजीच्या कातण्याने कापून टाकाव्यात. 

टीप :

 कणकेत डाळीचे पीठ व मैदा घातल्याने पोळी खुसखुशीत होते. 

कणिक सैल असली तर पोळी चिवट होऊन नंतर मऊ पडते,शक्यतो गुल व कणिक सारख्याच प्रमाणात मऊ असावी.                 

               


Post a Comment

0 Comments