नगरटुडे बुलेटिन 07-01-02

 नगरटुडे बुलेटिन 07-01-02

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अक्षय बहिरवाडे यांनी राज्यपालांची भेट घेऊन वंचित मुलांच्या शिक्षण कार्याची दिली माहिती

  वेब टीम नगर :  भटक्या समाजातील मुला-मुलींना मोफत शिकता यावे यासाठी काम करणार्‍या ज्ञानज्योती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अक्षय सिदाप्पा बहिरवाडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेऊन अनाथांसाठी सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, गणेश दहिंडे, विशाल भागानगरे, योगेश चवांडके आदि उपस्थित होते.

     मुंबई येथील राजभवनात अक्षय बहिरवाडे यांनी राज्यपालांना ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या कार्याविषयी माहिती देतांना सांगितले की, आज परिस्थितीमुळे अनेक गरीब घरातील तसेच भटक्या जमातीतील मुला-मुली शिक्षणापासून वंचित राहत आहे. त्यांना मोफत शिकता यावे व कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी आपण ज्ञानज्योती संस्थेच्या माध्यमातून कार्य करत आहोत. हे करत असतांना या मुला-मुलींना शिक्षण घेत असतांना येणार्‍या अडी-अडचणी व त्यावर पर्याय या विषयी माहिती संकलन केली आहे. या मुला-मुलींचे भविष्य शिक्षण मिळाल्यास उज्वल होऊ शकते. त्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरकार अशा मुलांसाठी अनेक योजना राबवते परंतु सरकारी यंत्रणेतील उदासिनता, तांत्रिक मुंद्यांमुळे ही मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याबाबत आपण एक अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला असून, त्या माध्यमातून शासन आणि नि:स्वार्थ सामाजिक संस्थेच्या एकत्रित प्रयत्नातून या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता येऊ शकते. त्यासाठी नियमात शिथिलता आणि सामाजिक संस्थांवर विश्‍वास व जबाबदारी देऊ शकतो. अशा महत्वपूर्ण मुद्यांवर राज्यपालांना अक्षय बहिरवाडे यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. तसेच  गवळी समाजाच्या विविध प्रश्‍नांसंदर्भात अभ्यासपूर्ण माहिती संकलन केली असून, गवळी समाजाची सद्य परिस्थितीही त्यांनी राज्यपालांसमोर मांडून याबाबत आपण ठोस पावले उचलावित अशी विनंती केली.

     राज्यपालांनी त्यांचे सर्व मुद्दे व्यवस्थित ऐकून घेतले. वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या अभ्यासपूर्ण अहवाल आणि संस्थेच्यावतीने सुरु असलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन याबाबत आपण माहिती घेऊन पुढील काळात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

     अक्षय बहिरवाडे यांच्या शिक्षणापासून वंचित मुलांसाठी करत असलेल्या कामाची दखल राज्यपालींनी घेऊन संस्थेच्या कार्याची कौतुक केलेल्याबद्दल अनेकांनी अक्षयचे अभिनंदन केले. अक्षय हा नगरमधील दूध व्यवसायिक सिदाप्पा बहिरवाडे यांचे चिरंजीव आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आदिनाथ गायकवाड यांची भोयरे गांगर्डा ग्रा.पं.सदस्य बिनविरोध निवड

गावाच्या विकासात युवकांचे मोठे योगदान राहिल -बाळासाहेब बोराटे

          वेब टीम नगर - गावाच्या विकासासाठी आता युवक पुढाकार घेऊ लागले आहेत, त्यामुळे गावातील समस्या सोडविण्यासाठी युवकांचे योगदान मोठे राहणार आहे. सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीने अनेक गावात गट-तटाचे राजकारण सुरु झाले आहे. परंतु भोयरे गांगर्डा गावातील युवकांनी पुढाकार घेऊन ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करुन इतर गावांपुढे एक आदर्श ठेवला आहे. यात बिनविरोध निवड झालेले आदिनाथ गायकवाड गावाच्या विकासात मोठे योगदान देऊन गावाचा विकास करतील, असे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.

            भोयरे गांगर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत सावता परिषदेचे कार्याध्यक्ष आदिनाथ गायकवाड यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, डॉ.सुदर्शन गोरे, जालिंदर बोरुडे, सुनिल निकम, बाळासाहेब भुजबळ, मंगल भुजबळ, नितीन डागवाले आदि उपस्थित होते.

            यावेळी गणेश बनकर यांनीही आदिनाथ गायकवाड हे सावता परिषदेच्या माध्यमातून समाजातील प्रश्‍न सोडवत असतात. त्यामुळेच त्यांच्या या कार्याची पावती म्हणून भोयर गांगर्डा ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या कार्यात सावता परिषदे पाठबळ देऊ, असे सांगून शुभेच्छा दिल्या.

            सत्कारास उत्तर देतांना आदिनाथ गायकवाड म्हणाले, सावता परिषदेच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागात काम करत आहोत. त्याचबरोबर गावाच्या विकासासाठी आ.निलेश लंके, भाऊसाहेब भोगाडे, दौलतराव गांगड व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध केली. आज केलेल्या सत्कारामुळे आपणास काम करण्यास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.

            शेवटी अशेाक तुपे यांनी सर्वांचे आभार मानले. आदिनाथ गायकवाड यांच्या निवडीबद्दल सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे, प्रदेश महासचिव मयुर वैद्य, प्रदेशाध्यक्षा मनिषा सोनमाळी, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, सावता परिषदेचे उपाध्यक्ष सुदाम लोंढे, सरचिटणीस गुलाब गायकवाड, सुनिल गायकवाड, पृथ्वीराज कोल्हे, श्रीकांत देंडगे, संदिप गाडीलकर आदिंनी अभिनंदन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने  एस.टी.वर ‘संभाजीनगर’चे  चिटकविले फलक

   वेब टीम नगर : औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्‍न गाजत असतांना आज नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने औरंगाबादला जाणार्‍या एस.टी.बसवर छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक चिटकविण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, अनिकेत शियाळ, संकेत जरे, सुमित शिर्के, हामजा शेख, दिपक मगर, योगेश चंगेडिया, प्रमोद जाधव आदिंसह मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

     याप्रसंगी सुमित वर्मा म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारही बोटचेपीची भुमिका घेत आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करता संभाजीनगर  हे नाव होणे गरजेचे आहे. आज अनेक योजनांना, चौकांना सत्ताधारी व विरोधक आपआपल्या नेतृत्वाचे नाव देत आहेत, परंतु नागरिकांच्या भावनांचा आदर करुन ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नामांतर होणे गरजेचे आहे.  याबाबत मनसेने वेळोवेळी पाठपुरवठा केला परंतु त्याबाबत कोणताही निर्णय होत नाही. म्हणून आज नगरमध्ये औरंगाबादला जाणार्‍या गाड्यांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ नावाचे फलक चिकटविले आहेत. याची दखल घेऊन लवकरात लवकर नामांतर व्हावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी सुमित वर्मा यांनी दिला.

     यावेळी कार्यकर्त्यांना नगरधून औरंगाबादला जाणार्‍या एस.टी.बसेसवर संभाजीनगरचे फलक लावून. छत्रपती संभाजी महाराज की जय च्या घोषणा दिल्या.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बुर्‍हाणनगर ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल : माजी आ.शिवाजीराव कर्डिले

   वेब टीम  नगर :  विरोधासाठी विरोध म्हणून ही निवडणूक होत आहे. या वर्षी ही निवडणुक बिनविरोध झाली असती पण, केवळ मला श्रेय मिळू नये म्हणून तांत्रिकदृष्ट्या ती लादली गेली असली तरी ७ जागांसाठी होणार्‍या बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

     बुर्‍हाणनगर येथे ग्रामस्थ, कार्यकर्ते व बाणेश्‍वर ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना मार्गदर्शन करतांना कर्डिले बोलत होते. यावेळी प्रकाश पाटील कर्डिले, अक्षय कर्डिले, दत्ता ताकपिरे, हभप मोहिते महाराज उपस्थित होते.

 कर्डिले पुढे म्हणाले, गेली ३०  ते ३५  वर्षे बुर्‍हाणनगर ग्रामपंचायत बिनविरोध होत, पण मी केलेला विकास विरोधकांना बघवत नाही. केवळ विरोध म्हणून निवडणूक लादली. विधानसभेला माझा परावयाचा आनंद फक्त पुढार्‍यांना झाला, पण सर्वसामान्यांना मात्र दु:ख झाले होते. विकास कामात माझा कोणीच हात धरु शकत नाही. संपूर्ण तालुक्यासह बुर्‍हाणनगरच्या हद्दीतील उपनगरांमधील पाणीप्रश्‍न, विजेचा प्रश्‍न, रस्ते अशा मुलभुत सुविधा सोडविल्या आहेत. जनता पाठिशी असल्याने मला पराभवाची भिती नाही. या ग्रामपंचायत निवडणुकीत सातही उमेदवार विजयी होतील तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

     यावेळी हभप मोहिते महाराजांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची माहिती दिली ते साहेब असले तरी साहेबांप्रमाणे राहत नाही. बाकी पुढारी मात्र नसतांना साहेबांप्रमाणे राहतात. अपयश त्यांनी माहित नव्हते, पण २५ वर्षांनंतरचा पराभव म्हणजे त्यांना दृष्ट लागली, असे वाटते. पुढील निवडणुकीत त्यांचा मोठा विजय होईल, असा आशिर्वाद त्यांनी दिला.

     यावेळी दत्ता ताकपिरे, बाळासाहेब कर्डिले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

     बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतच्या८ जागा बिनविरोध करण्यात माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांना यश मिळाले. यामध्ये वृषाली तापकिरे, मंगल कर्डिले, मंदा साळवे, सुषमा साळवे, वैभव वाघ, राजू पाखरे, रावसाहेब कर्डिले, सुनिता तरवडे यांचा समावेश आहे. यावेळी ग्रामविकास पॅनेलचे ७ उमेदवार उपस्थित होते.

     शेवटी प्रकाश पाटील कर्डिले यांनी सर्वांचे आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. वरद सप्तर्षी यांचे दंत वैद्यकीय पदव्युत्तर परिक्षेत यश

    वेब टीम  नगर : नगरमधील मागील पिढीतील प्रसिध्द वकील कै.गजानन तथा भाऊसाहेब सप्तर्षी व कै. प्रमिलाबाई सप्तर्षी यांचा नातू डॉ.वरद सप्तर्षी यांनी नुकतेच दंत वैद्यकीय पदव्युत्तर परिक्षेत संपूर्ण देशात ४३३ वा क्रमांक मिळवून लक्षणीय यश संपादन केले आहे. या वर्षी तब्बल २५ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.

      डॉ. वरद  सप्तर्षी यांनी यापूर्वीही बी.डी.एस. पदवी करत असताना दर वर्षी पहिल्या ३ क्रमांकांमधे स्थान पटकावले, तर ५ वर्षात ९ विषयात डिस्टिंक्शन म्हणजेच विशेष श्रेणी प्राप्त केली, पहिल्या वर्षात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील कुलगुरू यांचे मेरिट अवॉर्ड मिळवले, अंतिम वर्षात इंडियन अकॅडमी ऑफ ओरल मेडिसिन अँड रेडियोलॉजी चे अवॉर्ड व सलग ३ वर्षेकोलगेट स्कॉलरशिप, ई. असे खूप यश त्यांना प्राप्त झाले आहेत.

     राजेंद्र व प्राची सप्तर्षी हे कलाकार दांपत्य कर्णबधिर असूनही त्यांचा मुलगा डॉ.वरद यशाच्या शिखरावर कुणाचेही मार्गदर्शन नसताना पोहोचला त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नामांतर करणार्‍यांनो कोरोनाच्या संकट काळात कोणत्या बिळात गेला होता?

पीपल्स हेल्पलाईन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा सवाल

वेब टीम नगर : जी मंडळी कोरोनाच्या संकट काळात बिळात जाऊन लपून बसली, कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर विकासाला चालना देण्याऐवजी अशा लोकांनी आता आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी औरंगाबाद, अहमदनगर शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे केला असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईन व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जातीचा व पैशाचा वापर करून ही मंडळी सत्तेमध्ये आली. तर लोककल्याण, विकास व विवेकापासून दूर असून, ही मंडळी तमास चेतनेच्या गर्तेत सापडली आहे. गरिबांचे आश्रू पुसण्याऐवजी ही मंडळी तमसचेतनाधारी वृत्तीने समाजातील गरीबी, अशिक्षितपणाचा फायदा घेऊन सत्ता राबवू पाहत असल्याचे स्पष्ट करुन, शहर नामांतराची मागणी करणार्‍यांचा संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.

इंग्रजांनी भारतात ज्या पद्धतीने तोडा-फोडा आणि राज्य करा. या सूत्राचा अवलंब करुन ही मंडळी सत्ता उपभोगण्यासाठी दोन समाजात दुही पसरवण्याचे काम करत आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या हक्कापासून व विकासापासून वंचित ठेऊन धार्मिक व जातीयवादाला खतपाणी घालणारा मुद्दा उपस्थित करणे हे एकप्रकारे जनतेचे शोषण आहे. कोरोनाचे संकट संपत असताना जलद गतीने बेरोजगारांना रोजगार देणे, उद्योग-व्यवसायाला चालना देणे, आर्थिक संकटात सापडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी लोकप्रतिनिधी व काही मंडळी समाजात आग लावण्याचे धंदे करीत असल्याचा आरोप अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी केला आहे.

शहरांचा इतिहास माहीत नसणार्‍यांच्या कामाचे ऑडीट होणे गरजेचे आहे. जे व्यक्ती शहर नामांतराचा मुद्दा पुढे करत आहे. त्यांचे शहरासाठी व विकासाकरिता योगदान काय? हे देखील तपासण्याची गरज आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहरांच्या नामांतरास केलेला विरोधा जनतेच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. चुकीच्या गोष्टींना सर्वसामान्य जनतेने विरोध करुन चांगल्या विचारांना समर्थन देण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ अदवैत गिते  यांची डी . एम.(नयूरॉलॉजि) साठी निवड

 नीटस मेडिकल सुपर स्पेशालिटी परीक्षेत भारतात २१८वा क्रमांकाने  उत्तीर्ण 

वेब टीम नगर : डॉ . अद्वैत  गिते यांची डी . एम.(नयूरॉलॉजि) साठी निवड झाली असून .नगरचे प्रसिद्ध बालरोग तज्ञे व बालिकाश्रम  रस्त्यावरील अक्षय या बालकांच्या हॉस्पिटलचे संचालक  डॉ ,अनिरुद्ध गिते   व स्त्रीरोग तज्ञ    डॉ.  उर्मिला गिते यांचे चिरंजीव डॉ अद्वैत  गिते यांची डी .एम (नयूरॉलॉजि) (मेंदू विकार तज्ञे )या कोर्से साठी निवड झाली आहे .त्यात नगरकरांच्या दृष्टीकोनातून       अभिमानाची बाब म्हणजे डॉ अद्वैत  गिते यांनी नीटस या अखिल भारतीय मेडिकल सुपर स्पेशालिटी परीक्षेत भारतात २१८वा क्रमांक मिळवला आहे .त्यामुळे त्यांची डी . एम.          (नयूरॉलॉजि )  सुपर स्पेशालिटी कोर्से साठी डी .वाय.पाटील मेडिकल कॉलेज पुणे येथे निवड झाली असून तेथे ते रुजू झाले आहेत   .  डॉ.  अद्वैत  गिते यांनी एम. बी. बी. एस.हि पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेज मधून तर एम डी.(मेडिसिन) हि पदवी प्रवरा मेडिकल  कॉलेज(श्रीरामपूर ) मधून संपादित केली आहे त्यांच्या या निवडी बद्धल त्याचे अभिनंदन होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

   शहर काँग्रेस तर्फे पवार,सटाणकर,आळकुटे या त्रिमूर्तींचा सत्कार

वेब टीम नगर :  नगर शहर काॅंग्रेस उपाध्यक्ष शशिकांत पवार यांची ६१ वी आणि शहापूर-केकती (ता.नगर) ग्रा.पं सदस्यपदी बिनविरोध ठरलेल्या सौ.किरण आळकुटेसह पत्रकार दिनाचे औचित्यसाधून पत्रकार राजेश सटाणकर अशा तिघांचा सत्कार शहर काॅंग्रेसच्या तांगेगल्लीतील कार्यालयात करण्यात आला.

"राजकारणातून समाजकारण करण्याचाआपण प्रयत्न करतो"असे पवार यांनी यावेळी सांगितले तर ग्रामविकासाला महत्व देण्याचे वचन आळकुटे यांनी दिले. समाजसुधारणेच्या योगदानात पत्रकारांचाही सहभाग असून पत्रकारितेतील बदल राजेश सटाणकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. पवार,आळकुटे यांच्या कार्याचा आणि सटाणकर यांची ४१वर्षापासूनची आदर्श पत्रकारितेचा उल्लेख यावेळी करण्यात आला.                                                                       

   शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि भिंगार काॅंग्रेसचे अध्यक्ष ॲड.आर.आर.पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या यासोहळ्यात अल्पसंख्याकं प्रदेश सरचिटणिस फिरोज शफी खान,पक्षाचे शहर जिल्हा उपध्यक्ष बाळासाहेब भंडारी,प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर,अरुण धामणे,हरिभाऊ डोळसे,नागेश शिंदे,अभिजित कांबळे,रवी सुर्यवंशी ,भिंगार महिला अध्यक्षा मार्गरेट जाधव, श्रीमती रजनी ताठे आदिंची समयोचित भाषणे झाली.                                                                                                                            

 शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ म्हणाले कि,आज राजकारण,समाजकारण व पत्रकारिता अश्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा सत्कार काँग्रेस तर्फे होत आहे.पत्रकार राजेश सटाणकर यांनी ४१ वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून शहराचे विविध प्रश्न व समस्या मांडून योगदान दिले आहे.निस्वार्थपणे अविरतपणे ते पत्रकारितेत समाजच्या उन्नतीसाठी सांस्कृतिक,सामाजिक,राजकीय, धार्मिक,क्रीडा,साहित्य अश्या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य ते करीत आहेत.तसेच सौ किरण आळकुटे यांचे निवडी बद्दल अभिनंदन व शशिकांत पवार यांना चांगले आरोग्य लाभो.व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या स्नेहमेळाव्याचे रुपांतर ६ जानेवारीमुळे पत्रकार दिनात झाले.शेवटी कवी विवेक येवले यांनी आभार मानून कार्यक्रमाला पूर्णविराम दिला. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  नेहरू पुतळ्या समोरील होर्डिंग्ज काँग्रेस जिजाऊ जयंतीदिनी बुलडोझरने स्वतः हटविणार

जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची घोषणा ; मनपात काँग्रेसचे जोरदार ठिय्या आंदोलन

वेब टीम नगर : विद्यार्थी काँग्रेसने लालटकी येथील पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला झाकून टाकणारे होर्डिंग काढून टाकण्यासाठी महानगरपालिकेला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. सात दिवस लोटले तरी देखील जातीयवादी भाजपची सत्ता असणाऱ्या मनपाने जाणीवपूर्वक होर्डिंग्ज हटविले नसल्याचा आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निषेधार्थ मनपामध्ये काळे यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार ठिय्या आंदोलन केले. 

पंडित नेहरू अमर रहेचे फलक हातात धरत यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यामुळे संपूर्ण मनपामध्ये आणि शहरामध्ये काँग्रेस आंदोलनाची चर्चा सर्वत्र सुरू होती. 

यावेळी बोलताना काळे म्हणाले की, मनपा प्रशासन दबावाखाली काम करत आहे. जातीयवादी असणाऱ्या भाजपची महापालिकेत सत्ता आहे यामुळेच हा सर्व प्रकार सुरु आहे. या सत्तेत स्थानिक राष्ट्रवादी भागीदार आहे. त्यांनी देखील या बाबतीत काही भूमिका घेऊन नये ही काँग्रेससाठी खेदाची बाब आहे. अशी टीका काळे यांनी केली.

पं.नेहरू हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. देशाचे पहिले पंतप्रधान होते. पुतळ्याच्या परिसराची दैनावस्था मनपाच्या गलथान कारभारामुळेच झालेली आहे. ही बाब काँग्रेस कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत. पं. नेहरू हा विषय काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आस्था आणि श्रद्धेचा आहे हे मनपाने विसरू नये. एका बाजूला नगर शहराच्या विकासाचा पुरता बोजवारा उडालेला आहे. नागरिक हवालदिल झालेले आहेत. चांगलं काही करण्यामध्ये मनपातील सत्ताधारी पूर्णता अपयशी आहेतच पण त्याचबरोबर पंडित नेहरू पुतळा आणि परिसराची दैनावस्था करून त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखण्याचे पाप जाणीवपूर्वक केले आहे असे काळे म्हणाले.

यावेळी फारुख भाई शेख, खलिल सय्यद, एनएसयूआयचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, विद्यार्थी काँग्रेसचे सुजित जगताप यांची भाषणे झाली. 

मागासवर्गीय काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट,  अनंतराव गारदे, कौसर खान, नीताताई बर्वे, क्रीडा काँग्रेसचे प्रवीण गीते पाटील, चेतन रोहोकले, डॉ. रिजवान शेख, प्रमोद अबुज, अमित भांड, अजित वाडेकर, शरीफ सय्यद, विकी करोलिया, आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

जिजाऊ जयंतीदिनी काँग्रेस स्वतः होर्डिंग्ज हटविणार

मनपाने काँग्रेसच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वतः १२ जानेवारीला जिजाऊ आणि विवेकानंद जयंतीदिनी जिजाऊ, विवेकानंद पुतळ्याला अभिवादन करून बुलडोझरने स्वतः होर्डिंग्ज हाटवतील, अशी घोषणा आंदोलनाच्या समारोप प्रसंगी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी मनपा जबाबदार असेल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. पक्षाच्या या भूमिकेची माहिती जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिली जाणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले.  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

व्हीआरडीई बचाओ आंदोलन खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी शिष्टमंडळासह चर्चा करणार- संभाजी कदम

    वेब टीम  नगर - व्हीआरडीई संरक्षण संस्था स्थलांतरीत होणार असल्याच्या हालचाली सुरु झाल्याने त्यास विरोध करण्यात यावा, यासाठी कर्मचारी शिष्टमंडळाने शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांना निवेदन दिले व व्हीआरडीई बचाओ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी डी.डी.गाडेकर, एस.व्ही.वर्पे, एस.एस.बनकर, ए.एम.जाधव, पी.जी.गवळी, बी.आर.बिने, एस.के.मेश्राम, के.बी.करोशिया आदि उपस्थित होते.

     यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या सैन्याला लागणारे अत्याधुनिक शस्त्रास्त्र बनविण्यात महत्वाची भुमिका ही नगरच्या व्हीआरडीईची राहिलेली आहे. यामध्ये वैज्ञानिक, अधिकारी व कर्मचारी, कामगार असे जवळपास १००० हजार जण कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटूंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्याचप्रमाणे या १००० कुटूंबाला लागणार्‍या  जीवनावश्यक वस्तू व इतर गरजांवर अनेक व्यवसायिक अवलंबून आहेत. येथे तयार होणार्‍या शास्त्रस्त्रासाठी लागणार्‍या छोट-मोठ्या तांत्रिक कामांवर येथील एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे.

     वरिष्ठ पातळीवरुन व्हीआरडीई हलविण्याचे दिलेले संकेत हे नगरकरांसाठी मोठे हानिकारक ठरेल, त्याचप्रमाणे नगरमधून मोठा रोजगार स्थलांतरीत होईल. नगरच्या औद्योगिक विकासाला खीळ बसणारा आहे. स्थानिक व्यवसायिकांना फटका बसेल, त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थावरही परिणाम होईल. एकदरीत नगरच्या बाजारपेठेवर विपरित परिणाम होईल. गेल्या 20-25 वर्षांपासून संस्थेत काम करणारे नगरमध्येच स्थायिक झाले असल्याने कौटूंबिक वाताहात होईल. अहमदनगरचे आर्थिक, सामाजिक व मानसिक नुकसान थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे.

     संभाजी कदम म्हणाले,  व्हीआरडीई संरक्षण संस्थेचे नगरमधून स्थलांतर होणे, नगरकरांसाठी चांगली गोष्ट नाही.  व्हीआरडीईचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित्य येतो. याबाबत शिवसेना खा.डॉ.श्रीकांत शिंदे हे केंद्रीय संरक्षण समिती सदस्यपदी असल्याने त्यांच्याशी याबाबत माझे बोलणे झाले असून, त्यांनी व्हीआरडीईचे शिष्टमंडळ भेटीसाठी बोलावले असल्याने लवकरच याबाबत तोडगा निघेल. हा विषय महत्वाचा असून, याबाबत  आपण सहकार्य करु. याबाबत वेळप्रसंगी आंदोलनचीही भुमिका घेण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments