पत्रकार हा जनता व प्रशासनामधील महत्वाचा दुवा - जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

 पत्रकार हा जनता व प्रशासनामधील महत्वाचा दुवा - जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

पत्रकार दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन व प्रेस क्लबच्यावतीने आरोग्य तपासणी शिबीर सप्ताहाचा शुभारंभ

वेब टीम नगर :  पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून जनता आणि प्रशासनामधील महत्वाचा दुवा आहे. प्रशासन आणि पत्रकार यांचा समन्वय चांगला असेल तर अनेक समस्यांचे निराकरण होते. पत्रकार दिनाचे औचित्य साधून अहमदनगर प्रेस क्लबने आरोग्य शिबीर सप्ताहाचे आयोजन करत राज्यात दिशादर्शक उपक्रम राबविला असून, या उपक्रमातून आगामी काळात अनेक पत्रकारांना फायदा होईल. मनातील भिती जाण्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर महत्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केले.

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन आयोजित शिबीर सप्ताहाचे मॅककेअर हॉस्पिटल मध्ये आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हापोलिस अधिक्षक मनोज पाटील, आ.संग्राम जगताप, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, रोटरीचे अध्यक्ष क्षितीज झावरे, दिगंबर रोकडे, जिल्हा माहिती अधिकारी दिपक चव्हाण, मॅक केअर हॉस्पिटलचे डॉ.सतीश सोनवणे,  डॉ.माजिद, डॉ. प्रशांत पठारे, डॉ. मदन काशिद, उपाध्यक्ष अरुण वाघमोडे, अशोक झोटिंग, निशांत दातीर, जयंत कुलकर्णी, खजिनदार ज्ञानेश दुधाडे, इलेक्ट्रॉनिक मिडिया असोसिएशचे अध्यक्ष उमेर सय्यद, सचिव लैलेश बारगजे, तसेच प्रेस फोटोग्रार व पत्रकार उपस्थित होते.

जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील म्हणाले की, मागील वर्ष कोरोना महामारीत संकटात गेले. या कोरोना महामारीच्या काळातही पत्रकार, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, पोलिस सर्वांनी जनतेला दिलासा देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र या काळात अनेकांना अनेक गोष्टी शिकायला मिळाले. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला सुरु केली असून या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर प्रेस क्लबने आयोजित केलेल्या शिबीर सप्ताहाचा उपक्रम निश्‍चितच स्वागतार्ह असून या उपक्रमाचे राज्यातील इतर पत्रकार संघटनांनी अनुकरण करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

आ.संग्राम जगताप म्हणाले, अहमदनगर प्रेस क्लबची  आरोग्य तपासणी शिबीर हा उपक्रम आदर्शवत असून, यापुढील काळात आरोग्याबाबत प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना काळात प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असून, प्रत्येकजण व्यायामाला प्राधान्य देत आहे. आरोग्य जागृती होत असून, या आरोग्य सप्ताहातून प्रत्येक पत्रकाराने निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.प्रारंभी प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी या उपक्रमाची माहिती देत आगामी सात दिवसांतील वेगवेगळ्या आरोग्य शिबीरांची सविस्तर माहिती दिली. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना प्रशासनाची बंदी असल्याने आरोग्य शिबीर सप्ताहाच्या माध्यमातून पत्रकार दिन साजरा करणारे अहमदनगर प्रेस क्लब ही राज्यातील एकमेव संघटना असून, वर्षभरात अनेक उपक्रम राबवत पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांसाठी अहमदनगर प्रेस क्लबने दिलासा दिला आहे.

रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितीज झावरे म्हणाले की, पत्रकार दिनानिमित्त आयोजित शिबीर सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येक पत्रकाराचे साधारणपणे १७ हजार रुपयांची तपासणी करण्यात येणार असून, हा एकत्रित खर्च १७ ते १८ लाख रुपयांचा आहे. रोटरी क्लबच्या सदस्यांना पत्रकार दिनानिमित्त शिबीर सप्ताहाची संकल्पना समजून सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ मंजूरी देत पत्रकार विषयी असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे. भविष्यात पत्रकार व रोटरी क्लब संयुक्त विद्यमाने अनेक उपक्रम राबविणार असून, या उपक्रमासाठी सर्व पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांनी सहकार्य करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष अरुण वाघमोडे यांनी केले तर आभार दिगंबर रोकडे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments