वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार

 वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार 

वेब टीम मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या २ डिसेंबरला झालेल्या बैठकीत वाड्यावस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात फिरतांना अनेक गावात शहरांमध्ये कुभारवाडा, चांभारपुरा, सुतारगल्ली, ब्राम्हणआळी, ही वस्त्यांची नावं दिसून येतात. मात्र आता राज्यातल्या या वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

"राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्यात येतील. अशा वाड्यावस्त्यांना नवीन नावं देण्यात येणार आहेत," असा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटने घेतला आहे.महाविकास आघाडी सरकारचा हेतू वाड्यावस्त्यातून अस्तित्वात असलेली जातीवाचक ओळख पुसण्याचा असल्याचं सांगितलं जात आहे.राज्यातील वाड्यावस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाने तयार केला होता. या प्रस्तावाला बुधवारी  कॅबिनेटने मान्यता दिली आहे.

कॅबिनेटने दिलेल्या मंजूरीबाबत बोलताना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंयज मुंडे म्हणाले, "समाजिक क्रांती आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. महाराष्ट्रात वस्त्यांना जातीवाचक नावं देण्याची प्रथा हद्दपार करण्यात आली आहे. वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची नावं देण्यात येतील."राज्यातील वस्त्यांना देण्यात येणारी जातीवाचक नावं पुरोगामी राज्याला भूषणावह नाहीत हा विचार करून सामाजिक न्याय विभागाने हा प्रस्ताव तयार केला होता, असं त्यांचं म्हणणं आहे."या निर्णयामुळे राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व शहरं आणि ग्रामीण भागात वस्त्यांची जातीवाचक नावं बदलून त्या वस्त्यांना महापुरूषांची नावं देण्यात येतील," असं मुंडे पुढे म्हणाले.


Post a Comment

0 Comments