तू थांबू नकोच....२०२०

 तू थांबू नकोच .....

      सरत्या वर्षाला आम्ही आज पर्यंत त्या-त्या वर्षाच्या कडू-गोड आठवणी स्वीकारत निरोप देत होतो...हवंसं वाटणं आणि निघून जाणं यात एक हुरहूर असतेच असते... कारण खूप काही आठवणी मनात घर करून राहातात....त्या जपायच्याही असतात...पण तुझ्या कोणत्या आठवणी आहेत....त्या नकोच वाटतात.....म्हणून तू थांबुच नको २०२०....

    प्रत्येक शतकात निसर्ग संतुलन राखण्यासाठी काही तरी आपत्ती घडवून आणतोच असं म्हणतात....त्यात त्याचाही दोष नाही....त्याचा ऱ्हास आम्हीच केलाय ना....तू फक्त निमित्त झालास २०२०....तुला आता जबाबदारी म्हणून हे स्वीकारावेच लागेल आणि आम्हालाही.....

    जगणं-मरणं हे चक्र आहे....पण मरणापेक्षा मरणाची भीती खूप जीवघेणी असते....त्याही पेक्षा जास्त भीतीदायक असते ते आपल्या माणसांनी सोडून जाणे....अनेकांनी ते अनुभवलंय....कोणालाच असं अचानक निरोप द्यायचा नव्हता आम्हाला ...काही गोष्टी हव्या हव्याश्या वाटतात पण तू नको आहेस आम्हाला....म्हणून तू थांबूच नको २०२०....

        संपत आलेल्या अनेक वर्षांना अलविदा, गुड बाय म्हणत आम्ही वाट मोकळी करून दिली...आनंदाचे काही क्षण,काही घटना थांबून राहाव्यात असे वाटतेच रे....पण तू नको आहेस आम्हाला .....खरंच तू थांबू नको २०२०.....

       तू दाखवलंस आम्हाला लॉकडाऊन, सोशल डिस्टन्स, कॉरंटाईन आणि या शब्दांचे नवीन संदर्भही दिलेस.....पण आमच्या माणसा माणसातल्या नाते संबंधात तू प्रेमाचा दुरावा नाही निर्माण करू शकला....

     कोरोना महामारीत निगेटिव्ह अहवाल धीर देत असला तरी पॉझिटिव्ह थिंकिंग आम्ही सोडली नाही....कारण तो आमचा स्थायीभाव आहे.... तू आम्हाला निसर्गाला जपायला,त्याचं संवर्धन करायला शिकवलं...पण त्या बदल्यात खूप काही हिरावून घेतलंस....


एक मात्र खरं आहे

तू शिकवलंस आम्हाला

पैसा जोडण्यापेक्षा माणसं जोडणं

केव्हाही चांगलं...

संपत्ती, बडेजाव, काहीच

कामाला येत नाही....

जीवन नश्वर आहे....

हेच शिकवलंस तू आम्हाला...

संस्कृती जपलीच पाहिजे

 आणि जपल्या पाहिजेत 

आपल्या परंपरा....

पूर्वजांनी आखून दिलेले नियम

रीती रिवाजाचं महत्व कळलंय

आता आम्हाला...

माझं माझं असं काहीच नसतं

असतात ती फक्त नाती

आणि असतो प्रेम,जिव्हाळा

हा धडा मात्र आम्ही

कायम स्मरणात ठेऊ....

तरीही....कटू आठवणी 

खूप आहेत...

म्हणून तू थांबू नकोस २०२०

चल निघ.....चालता हो...पुन्हा तोंड दाखवू नकोस असं म्हणायची आमची संस्कृती नाही....तू गुमान आपल्या वाटेने निघून जा....पण तू काही आता थांबू नकोस २०२०.....

       तुला निरोप देताना होप २०२१ म्हणतच स्वागत होईलच नवीन वर्षाचं....

   पण २०२१ तू काही २०२० *सारखा मानवतेचा शत्रू होऊन* येऊ नकोस बाबा.... तुझ्याकडे आशेने डोळे लावून बसलोय आम्ही.....

शशिकांत नजान

Post a Comment

0 Comments